पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारताच्या यजमानपदाखाली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स परिषदेचे येत्या 1 आणि 2 जूनला नवी दिल्लीत आयोजन
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते आयबीसीए शिखर परिषद 2026 च्या लोगो आणि संकेतस्थळाचे उद्घाटन
मार्जार कुळातील हिंस्त्र प्राणी असलेल्या देशांनी आणि अद्याप आयबीसीए मध्ये सहभागी न झालेल्या देशांनी या प्रजातीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी यामध्ये सहभागी होण्याचे भूपेंद्र सिंह यांचे आवाहन
Posted On:
06 MAY 2026 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2026
मार्जार कुळातील हिंस्त्र प्राणी संरक्षण-संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट सहकार्य म्हणजेच, आयबीसीएची पहिली शिखर परिषद भारताच्या यजमानपदाखाली होणार असून, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत या परिषदेसाठीचे संकेतस्थळ आणि लोगोचे उद्घाटन केले. तसेच या परिषदेसाठी बनवण्यात आलेल्या विशेष फिल्मचेही त्यांनी प्रकाशन केले. यावेळी बिग कॅट सहकार्यमध्ये सहभागी असलेल्या देशांचे राजदूत, वन आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी आणि आयबीसीए चे अधिकारी उपस्थित होते.

आयबीसीए ही आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना असून, तिचे मुख्यालय भारतात आहे. जगातील मार्जार प्रजातीत येणारे सात प्राणी- म्हणजे सिंह, वाघ, बिबटे, हिम बिबटे, चित्ते, जग्वार अणि पुमा यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी ही त्याची स्थापना करण्यात आली आहे.
या संघटनेची पहिली शिखर परिषद भारतात, येत्या 1 आणि 2 जून रोजी होणार असल्याची माहिती भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिली. या परिषदेला, विविध देश/सरकार यांचे प्रतिनिधि आणि निरीक्षक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. यंदाच्या पहिल्याच परिषदेची संकल्पना “मार्जार प्रजातींचे संरक्षण, मानवतेचे संरक्षण, परिसंस्थेचे संरक्षण” अशी आहे. या परिषदेत, 400 पेक्षा अधिक वन्यजीव संवर्धक, धोरणकर्ते, वैज्ञानिक, बहुराष्ट्रीय संस्था, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट प्रमुख आणि जगभरातील विविध समुदायांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

भारतातील मार्जार प्रजातींच्या संवर्धनाचा प्रवास, निसर्गप्रतीची बांधिलकी, नवोन्मेष, शास्त्रीय व्यवस्थापन, संस्थात्मक सहकार्य आणि समुदायाच्या सहभाग अशा विविध घटकांचा एकत्रित प्रवास असल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले. पर्यावरण संवर्धन आणि विकास हे एकत्रितपणे साध्य होऊ शकतात हे भारताने सिद्ध केले आहे, असे त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठीच्या प्रकल्पाच्या यशाचा तसेच सिंह, बिबट्या, हिमबिबट्या आणि चित्ता संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले. संवर्धनातून परिसंस्था मजबूत करणे, उपजीविका निर्माण करणे, निसर्गासोबतचे सहजीवन आणि हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यात मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेचे फलित म्हणजे या मार्जार प्रजातींच्या संवर्धनासाठीचा पहिला वहिला जागतिक जाहीरनामा स्वीकारणे ही असेल, त्याला, ‘दिल्ली जाहीरनामा” म्हटले जाईल, असे त्यांनी सांगितले. या जाहीरनाम्यात, सामाईक प्राधान्यक्रम, सीमापार सहकार्य वाढवण्यावर भर आणि या प्रजातीच्या संवर्धनासाठी, भूप्रदेश आधारित दृष्टिकोनाला प्रोत्साहन, अशा गोष्टींचा समावेश असेल.
शिखर परिषदेत, एक आणि 2 जून 2026 रोजी तांत्रिक सत्रेही आयोजित केली जातील, ज्यामध्ये मार्जार प्रजातींचा अधिवास असलेल्या 95 देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि भागीदार संस्था सहभागी होतील. शिखर परिषदेदरम्यान एक विशेष प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येईल.
आयबीसीए शिखर परिषदेचे संकेतस्थळ या विषयाचा प्रसार, सहभाग आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी,एक समर्पित जागतिक मंच ठरेल, असेही यादव यांनी यावेळी सांगितले.

तर शिखर परिषदेचा लोगो समरसता, संतुलन आणि परस्परसंबंधित परिसंस्थांचे प्रतीक आहे. या लोगोच्या केंद्रस्थानी मार्जार प्रजातीतील सात मोठे प्राणी दाखवण्यात आले आहेत. या विषयातील एकवाक्यता आणि सामाईक जबाबदारीचे ते प्रतीक आहेत, तसेच पंच महाभूतांचे प्रतिनिधित्व करणारे, कमळाच्या आकाराचे रेखाचित्रही या लोगोवर असल्याचे यादव यांनी सांगितले.
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258557)
अभ्यागत कक्ष : 10