आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' च्या नियोजनासाठी आयुष मंत्रालयाकडून आंतर-मंत्रालयीन समितीच्या बैठकीचे आयोजन


योग ही आता निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणारी एक 'लोकचळवळ'बनली आहे : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026'ही सामूहिक आणि सर्वसमावेशक सहभागातून साकारणारी, खऱ्या अर्थाने 'संपूर्ण शासन आणि संपूर्ण समाज'यांचा सहभाग असलेली एक चळवळ ठरेल : जाधव

Posted On: 04 MAY 2026 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2026

'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' निमित्त आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांचे नियोजन आणि त्यांची समन्वित अंमलबजावणी यावर विचारविनिमय करण्यासाठी, आयुष मंत्रालयाने आज आंतर-मंत्रालयीन समितीची  एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. नवी दिल्ली येथे आज झालेल्या या बैठकीत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमधील वरिष्ठ अधिकारी, तसेच प्रख्यात योगगुरू आणि विविध योग संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. सर्वांगीण आरोग्य आणि सुस्थितीचे साधन म्हणून योगाचा जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील विस्तार अधिक बळकट करण्याबाबत सरकारची वचनबद्धता यातून अधोरेखित करण्यात आली.

हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या 'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' च्या 50-दिवसांच्या उलटगणना कार्यक्रमाचा संदर्भ देत प्रतापराव जाधव यांनी योगविषयी वाढता जन उत्साह आणि लोकांचा सहभाग याची नोंद घेतली. योग ही केवळ विशिष्ट सत्रांपुरती किंवा चटईपुरती मर्यादित असलेली एक कृती न राहता, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणारी एक व्यापक लोकचळवळ बनली आहे यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या जागतिक नेतृत्वावर प्रकाश टाकताना, मंत्र्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली, 2015 पासून 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चे आयोजन 190 हून अधिक देशांत पोहोचले आहे. यामुळे जगभरातील लक्षावधी लोकांना शारीरिक आरोग्य, मानसिक समतोल आणि आंतरिक शांतीसाठी योगाचा स्विकार करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

21 जून रोजी होणाऱ्या सामान्य योग प्रोटोकॉलचे पालन करताना जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करणे, शाळा, कामाची ठिकाणे आणि आरोग्य सेवा प्रणाली यांसारख्या संस्थात्मक चौकटींमध्ये योगाचा समावेश करणे, ग्रामीण आणि वंचित लोकसमूह तसेच सीमावर्ती आणि दुर्गम भागांमध्ये सर्वसमावेशकता राखणे, प्रसारासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे आणि विविध उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी तसेच अहवाल सादर करणे यांचा समावेश करत काही प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांनी सूचित केले.

सर्व मंत्रालये आणि इतर सर्व संबंधितांकडून, एका निश्चित कालमर्यादेत सहकार्य, समन्वय आणि सक्रिय सहभाग मिळण्यावर मंत्र्यांनी विशेष भर दिला.

परराष्ट्र मंत्रालय आपल्या परदेशातील दूतावास, वाणिज्य दूतावास आणि विविध मोहिमांद्वारे 'आंतरराष्ट्रीय योग दिन 2026' च्या जगभरातील आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य करेल असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी योगाच्या प्रसाराप्रती भारताच्या जागतिक वचनबद्धतेबाबत पुनरुच्चार करताना स्पष्ट केले.

भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असे योगाचे वर्णन आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात करताना हा घटक आता एका जागतिक आरोग्य चळवळीत रूपांतरित झाला आहे असे विषद केले.

या चर्चासत्रांमध्ये साद्यंत सरकारी दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ला व्यापक सहभाग आणि अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी संस्थात्मक जाळे, प्रसारमाध्यमांचे मंच आणि जनसहभाग यांचा प्रभावी वापर करण्यावर यात लक्ष केंद्रित करण्यात आले. युवकांचा सहभाग, डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक प्रसार आणि सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय आरोग्य आणि निरोगी जीवनशैली बाबत घेण्यात येत असलेल्या उपक्रमांशी योगाचे एकत्रीकरण या बाबींवरही विशेष भर देण्यात आला.


सुषमा काणे/संदेश नाईक/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2257915) अभ्यागत कक्ष : 11