संरक्षण मंत्रालय
भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सराव ‘सिनबॅक्स- II 2026’ साठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना
Posted On:
03 MAY 2026 10:57AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2026
भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती ‘सिनबॅक्स-II 2026’ साठी भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे.
हा सराव 4 ते 17 मे 2026 या कालावधीत कंबोडियातील, कंम्पोंग स्पेयू प्रांतातील, टेको सेन फ्नोम थॉम म्रीस प्रॉव रॉयल कंबोडियन हवाई दल प्रशिक्षण केंद्रात आयोजित केला जाईल.
मित्र राष्ट्रांसोबत सुरू असलेल्या भारताच्या संरक्षण सहकार्यांतर्गत, जागतिक सुरक्षा आव्हानांच्या बदलत्या पार्श्वभूमीवर कंबोडियासोबतचा हा सिनबॅक्स-II सराव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा सराव संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील प्रकरण VII च्या चौकटीत राहून केला जाणार असून, त्यामध्ये निम-पारंपारिक वातावरणात लष्करी मोहिमा राबवण्यासाठी कंपनी स्तरावरील संयुक्त प्रशिक्षण दिले जाईल. भारतीय लष्कराच्या या तुकडीत 120 सैनिकांचा समावेश असून, त्यातील बहुतांश सैनिक ‘मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट’च्या एका बटालियनचे आहेत, तर कंबोडियाकडून ‘रॉयल कंबोडियन आर्मी’च्या 160 सैनिकांचा समावेश असेल.

हा संयुक्त सराव संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर आधारित असेल. यामध्ये शांतता सैनिकांना सध्या ज्या प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवायांना सामोरे जावे लागते, त्याचा सराव केला जाईल. विविध चर्चा आणि सामरिक सरावांच्या माध्यमातून हे ध्येय साध्य केले जाईल. शेवटी एका सर्वसमावेशक प्रमाणीकरण सरावाने या प्रशिक्षणाचा समारोप होईल. या सरावाचा भाग म्हणून ड्रोन ऑपरेशन्स, मोर्टार आणि स्नाइपर रणनीती यांसारख्या विशेष कौशल्यांचा सराव केला जाईल. दोन्ही देशांच्या तुकड्यांमधील परस्पर समन्वय, तांत्रिक सहकार्य आणि लष्करी ताळमेळ वाढवणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. हा सराव केवळ जागतिक शांतता राखण्यासाठीची दोन्ही देशांची क्षमता दर्शवणार नाही, तर निम-शहरी भागात शत्रू दलांविरुद्ध राबवलेल्या विविध मोहिमांतून मिळालेले अनुभव आणि सर्वोत्तम लष्करी पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी देखील मदत करेल. सिनबॅक्स-II 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कंबोडियामधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक असून, यामुळे प्रादेशिक सुरक्षा आव्हाने हाताळण्यासाठी परस्पर सामंजस्य वाढेल आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.
* * *
शिल्पा नीलकंठ/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257608)
अभ्यागत कक्ष : 14