पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख क्षेत्रांसंबंधीची ताजी अद्ययावत माहिती


9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम्, चेन्नई, मथुरा आणि गुजरात इथल्या तेल शुद्धीकरण केंद्रांद्वारे रसायने, औषधनिर्माण आणि रंग उद्योग क्षेत्राला 10,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त प्रोपिलिन आणि 1200 मेट्रिक टनापेक्षा जास्त ब्युटाइल ॲक्रिलेटची विक्री

आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 24 तासांतील 30 जणांसह आतापर्यंत 2,922 पेक्षा जास्त भारतीय खलाशी सुरक्षित मायदेशी परतले

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आखाती आणि पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर सातत्याने लक्ष

Posted On: 02 MAY 2026 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2026

 

पश्चिम आशियातील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार समन्वित प्रतिसादात्मक उपाययोजना करत असून, त्याद्वारे प्रमुख क्षेत्रांमधील सज्जता आणि सातत्य सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. ऊर्जा पुरवठा, सागरी क्षेत्राशी संबंधित कार्यान्वयन आणि संघर्षग्रस्त प्रदेशातील भारतीय नागरिकांना मदत पुरवण्याच्या अनुषंगाने  उचललेल्या पावलांची माहिती खाली नमूद केली आहे.:

कच्च्या तेलासंबंधीची स्थिती आणि तेल शुद्धीकरण विषयक कार्यान्वयन

  • सर्व तेल शुद्धीकरण केंद्रांमध्ये कच्च्या तेलाच्या पुरेसा साठा उपलब्ध असून, ही केंद्रे उच्च क्षमतेने कार्यरत आहेत, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.
  • घरगुती वापरासाठीच्या पुरवठ्यासाठी मदत व्हावी यासाठी तेल शुद्धीकरण केंद्रांमधील घरगुती वापराच्या एलपीजीच्या उत्पादनात वाढ करण्यात आली आहे.
  • 9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम्, चेन्नई, मथुरा आणि गुजरात तेल शुद्धीकरण केंद्रांद्वारे  रसायने, औषधनिर्माण आणि रंग उद्योगासाठी 10,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त प्रोपिलिन आणि 1200 मेट्रिक टनापेक्षा जास्त ब्युटाइल ॲक्रिलेटची विक्री करण्यात आली आहे.

किरकोळ विक्री केंद्रांवरील इंधन उपलब्धता आणि किंमत नियंत्रणासाठीच्या उपाययोजना

  • देशभरातील सर्व किरकोळ विक्री केंद्रे सुरळीत सुरु आहेत.
  • मध्यपूर्व क्षेत्रात निर्माण झालेल्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अनपेक्षित वाढ झाली आहे, अशा परिस्थितीतही ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ₹10 इतकी कपात केली आहे.
  • केंद्र सरकारने 30 एप्रिल 2026 रोजी एक राजपत्रित अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेच्या माध्यमातून डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर ₹55.50 वरून ₹23 पर्यंत आणि विमान इंधनावरील शुल्क प्रति लिटर ₹42 वरून ₹33 पर्यंत कमी केल्याचे जाहीर केले आहे.
  • इंधनासंदर्भातील अफवांमुळे काही किरकोळ विक्री केंद्रांवर लोक भितीपोटी ताणात येऊन   खरेदी  करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नियमित किरकोळ किमतींत कोणताही बदल झालेला नाही, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या विक्री केंद्रांवरही कोणतीही दरवाढ झालेली नाही.

केरोसीनची उपलब्धता आणि वितरणासंबंधीच्या उपाययोजना

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या जात असलेल्या नियमित वाटपाव्यतिरिक्त 48,000 किलोलिटर केरोसीनचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केरोसीन वाटपासंबंधीचे आदेश जारी केले आहेत, तर हिमाचल प्रदेश आणि लडाखने कोणतीही गरज नसल्याचे कळवले आहे.

सागरी सुरक्षा आणि सागरी जल मालवाहतूक विषयक कार्यान्वयन

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पर्शियन आखातातील सागरी क्षेत्रासंबंधीच्या सद्यस्थितीविषयीची माहिती दिली. या प्रदेशातील भारतीय जहाजे आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील मंत्रालयाने दिला. त्यानुसार मंत्रालयाने दिलेली माहिती खाली नमूद केली आहे:

  • भारतीय खलाशांचे कल्याण आणि सागरी क्षेत्राशी संबंधित कार्यान्वयन विषयक क्रिया प्रक्रिया सातत्यपूर्णतेने सुरु राहतील याची सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी क्षेत्राशी संबंधित भागधारकांसोबत समन्वय राखून काम करत आहे.
  • या प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद झालेली नाही.
  • नौवहन महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) नियंत्रण कक्षाने, ते कार्यान्वित झाल्यापासून 8335 कॉल्स आणि 17,838 हून अधिक ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत 67 कॉल्स आणि 144 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.
  • नौवहन महासंचालनालयामार्फत मंत्रालयाने आतापर्यंत 2,922 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय केली आहे, ज्यात आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 24 तासांत परत आलेल्या 30 खलाशांचा समावेश आहे.
  • संपूर्ण भारतातील बंदरांवरील कामकाज सुरळीत चालले असून कोणत्याही प्रकारची गर्दी झाल्याचे वृत्त नाही.

या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, आणि या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. त्याबाबत दिलेली माहिती अशी :

  • माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि प्रयत्नांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहे.
  • भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास वेळेवर मदत पुरवण्यासाठी चोवीस तास हेल्पलाईन चालवत आहेत आणि नागरिकांना तात्काळ मदत करत आहेत. ते स्थानिक सरकारांशी देखील सातत्याने संपर्क ठेवून आहेत.
  • स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, वाणिज्य दूतावासाच्या सेवा आणि समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांशी संबंधित माहितीसह अद्ययावत सूचना जारी केल्या जात आहेत.
  • भारतीय दूतावास स्थानिक भारतीय समुदायासोबत सक्रिय संवाद साधत असून भारतीय संघटना, संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधत आहेत.
  • या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला सरकार उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत, ज्यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थांसोबत समन्वय साधणे, वाणिज्य दूतावासाची मदत आणि भारतात परत येण्याची विनंती करणाऱ्यांना साहाय्य करणे यांचा समावेश आहे.
  • या प्रदेशातून भारतातील विविध ठिकाणांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्याने एकूण विमानसेवेची परिस्थिती सुधारत आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये, विमान कंपन्या परिचालन आणि सुरक्षिततेच्या विचारांवर आधारित यूएई आणि भारतादरम्यान मर्यादित व्यावसायिक विमान उड्डाणे चालवत आहेत.
  • सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे सुरू आहेत.
  • कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले झाल्याने, कतार एअरवेज भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो यांनी कतारहून भारतासाठी विमान उड्डाणे सुरू केली आहेत.
  • कुवेतचे हवाई क्षेत्र खुले झाले आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजने कुवेतहून भारतासाठी मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत.
  • बहारिनचे हवाई क्षेत्र खुले झाले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आणि गल्फ एअर बहारिनहून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहेत. इंडिगो देखील आजपासून बहारिनहून भारतासाठी विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.
  • इराकचे हवाई क्षेत्र या प्रदेशातील ठिकाणांसाठी मर्यादित विमान उड्डाणांसाठी खुले झाले आहे, ज्याद्वारे भारताकडे पुढील प्रवास केला जाऊ शकतो.
  • इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले झाले आहे. भारतीय नागरिकांनी इराणला प्रवास करणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे आणि जे आधीपासूनच तेथे आहेत, त्यांना भारतीय दूतावासाच्या मदतीने भू-सीमा मार्गाने परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 2,490 भारतीय नागरिकांना भू-सीमा मार्गांने इराणमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे.
  • इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले झाले असून, या प्रदेशातील विविध ठिकाणांसाठी मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत, ज्याद्वारे भारताकडे पुढील प्रवास केला जाऊ शकतो.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257544) अभ्यागत कक्ष : 12