सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लडाखमध्ये विविध दुग्ध पायाभूत सुविधा आणि सहकारी उपक्रमांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
Posted On:
01 MAY 2026 7:51PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लडाखमधील लेह येथे विविध दुग्ध पायाभूत सुविधा आणि सहकारी उपक्रमांचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या सहकारी मॉडेलअंतर्गत, लडाखमध्ये एकाच वेळी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. कारगिलसारख्या उंच प्रदेशात आज 10 टीएलपीडी (प्रतिदिन 10,000 लिटर) क्षमतेच्या दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली असून या दुग्ध प्रकल्पाद्वारे कारगिलमधील महिला आपल्या जीवनात समृद्धी आणू शकतील, आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील, असे ते म्हणाले. पुढे शाह म्हणाले की ते अशा प्रदेशातील आहेत जिथे महिलांनी अशाच लहान दुग्ध उपक्रमांच्या माध्यमातून 1,25,000 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. लडाख महिलांमध्येही त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याची क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा नवीन 25 कोटी रुपयांचा प्रकल्प कारगिलमधील माता आणि भगिनींसाठी एक वरदान ठरेल, हे त्यांनी अधोरेखित केले. लेहमध्ये आधीपासूनच कार्यरत असलेल्या दूध प्रकल्पात दैनंदिन उत्पादन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
लडाखमध्ये भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) आणि लष्कर हे प्रमुख खरेदीदार असून, सीमाभागात सुमारे 18,000 सैनिक तैनात आहेत, असेही शाह यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे सैनिकांची दूध, दही आणि पनीरची गरज पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 45 लाख रुपये खर्च करून एक मोबाईल प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात आली असून या प्रयोगशाळेमुळे दुधाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, अँड्रॉइड-आधारित एएमसीएस ॲप देखील सुरू केल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना एकाच व्यासपीठावर त्यांच्या दुधाच्या हिशोबावर पारदर्शकपणे लक्ष ठेवता येईल, आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढेल, हे त्यांनी अधोरेखित केले. आज सन्मानित करण्यात आलेले पाच पशुपालक शेतकरी हे कारगिल आणि लेह येथील सर्व पशुपालक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील असे शाह यांनी सांगितले.
लडाख मिल्क फेडरेशन आणि मदर डेअरी यांनी एका करारावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे लडाख राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाईल, हे त्यांनी लक्षात आणून दिले. लडाखच्या सेंद्रीय उत्पादनांना दिल्लीच्या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला (NDDB) नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेडसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार सुलभ करण्याचे आवाहन केले. येथे मदर डेअरीची उत्पादने विकली जावीत, त्याचबरोबर मदर डेअरी आणि इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरात लडाखच्या उत्पादनांच्या विपणनाची व्यवस्था देखील केली जावी, यावर त्यांनी भर दिला.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2257425)
अभ्यागत कक्ष : 8