दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे स्वयं सहाय्यता गट बचत खात्याचा आरंभ

Posted On: 30 APR 2026 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2026

 

संचार मंत्रालयाच्या टपाल सेवा विभागाच्या अखत्यारीतील इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) या 100% भारत सरकारची मालकी असलेल्या संस्थेने आज आपल्या स्वयं सहाय्यता गट (एसएचजी) बचत खात्याचा आरंभ करण्यात येत असल्याचे जाहीर केले. ग्रामीण भारतातील आर्थिक समावेशनाच्या प्रयत्नांमध्ये आणखी पुढे जाऊन महिलांच्या-नेतृत्वाखालील बचत गटांना सक्षम बनविण्याच्या खास उद्देशाने ही खाती सुरू करण्यात आली आहेत.

या खात्यांच्या आरंभाविषयी बोलताना आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विश्वेश्वरन म्हणाले: “आयपीपीबीमध्ये, प्रत्येक भारतीयासाठी बँकिंग सुलभ आणि समावेशक करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. एसएचजी बचत खाते हे महिलांच्या-नेतृत्वाखालील बचत गटांना विश्वासार्ह आणि किफायतशीर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. आमच्या डोअर स्टेप बँकिंग मॉडेलसोबतच डिजिटल पायाभूत सुविधांचा उपयोग करून, बचत गटांना औपचारिक आर्थिक परिसंस्थेमध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम बनवून शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे हे आमचे ध्येय आहे.”

आयपीपीबी एसएचजी बचत खात्याची रचना पुढील निकषांवर करण्यात आली आहे:

  1. हे खाते परडवण्यायोग्य असावे यासाठी त्याकरिता शिल्लक रक्कम, शुल्क अशी कोणतीही अट नाही.
  2. डिजिटल प्रणालीद्वारे सुलभपणे व्यवहार करणे शक्य होईल.
  3. टपाल कार्यालये आणि पोस्टमन/ग्रामीण डाक सेवक यांच्या विस्तृत जाळ्यामार्फत वितरित करता येऊ शकेल.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. किमान प्रारंभिक ठेव रकमेची आवश्यकता नाही.
  2. ठराविक मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) रक्कम असण्याची आवश्यकता नाही.
  3. खात्यावर  कमाल  ₹2,00,000 पर्यंतची रक्कम ठेवण्याची मुभा.
  4. बचतीवर लागू असलेल्या व्याज दरांनुसार त्रैमासिक व्याजाची रक्कम मिळण्याची सोय.
  5. रोख रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  6. दर महिन्याला व्यवहारांच्या तपशीलाचे मोफत छापील पत्रक मिळणार.
  7. खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  8. क्यूआर कार्ड जारी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

आयपीपीबी एसएचजी बचत खाती खास करून स्वयं सहाय्यता  गटांसाठी (एसएचजी) तयार करण्यात आली असून त्याद्वारे सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत उपजीविकेच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत अशी सोपी, सुलभ आणि विना-शुल्क बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257056) अभ्यागत कक्ष : 23