दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आपत्तीचा इशारा जलदगतीने देण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची देशव्यापी चाचणी सुरू
चाचणीच्या काळात मोबाईल फोनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील संदेश प्राप्त होऊ शकतात; संदेशानुसार कोणतीही कारवाई न करण्याचे नागरिकांना आवाहन
Posted On:
29 APR 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026
नागरिकांपर्यंत आपत्ती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाईल-आधारित आपत्ती संचार प्रणाली अधिक सक्षम करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) ने विकसित केलेली एकात्मिक इशारा प्रणाली (सॅशे) एनडीएमए ने यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली सध्या भारतातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित क्षेत्रांमधील मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित इशारे पोहोचवते.
या प्रणालीचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. या प्रणालीमुळे नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळांच्या वेळी 19 हून अधिक भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत 134 अब्जाहून अधिक एसएमएस इशारे प्रसारित करणे शक्य झाले आहे.
त्सुनामी, भूकंप, वीज कोसळणे तसेच गॅस गळती किंवा रासायनिक धोके यांसारख्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींसारख्या वेळेच्या दृष्टीने महत्त्वाच्या परिस्थितीत सूचनांचा प्रसार अधिक मजबूत करण्यासाठी, एसएमएस सोबत सेल ब्रॉडकास्ट (सीबी) तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. सेल ब्रॉडकास्ट प्रणालीमध्ये एका निश्चित भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी इशारे प्रसारित केले जातात. यामुळे इशारे त्याच क्षणी पोहोचण्याची खातरजमा होते.
संपूर्ण भारतभर या प्रणालीचा विस्तार आणि सेल ब्रॉडकास्ट (सीबी) सुविधेच्या प्रारंभाचा एक भाग म्हणून प्रणालीचे औपचारिक उद्घाटन आणि राष्ट्रसमर्पण करण्यापूर्वी या प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी सध्या देशव्यापी चाचण्या आणि प्रयोग सुरू आहेत. या चाचणी कालावधीत नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये चाचणी संदेश येऊ शकतात.
हे “चाचणी संदेश” केवळ सेल ब्रॉडकास्ट चाचणी चॅनेल सक्षम असलेल्या मोबाइल उपकरणांवरच प्राप्त होतील (वापरकर्ते त्यांच्या मोबाइल उपकरणांवरील खालील मेनू मार्गाद्वारे इशारे चालू किंवा बंद करू शकतात: सेटिंग्ज → सुरक्षा आणि आपत्कालीन → वायरलेस आपत्कालीन इशारे → चाचणी इशारे). संपूर्ण मोबाइल नेटवर्क प्रणालीची योग्य कार्यक्षमता तपासण्यासाठी नागरिकांना एकापेक्षा अधिक चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात.
हे संदेश एका नियोजित देशव्यापी चाचणी सरावाचा भाग असून नागरिकांकडून कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही.
दूरसंचार विभागाने नागरिकांना या महत्त्वपूर्ण चाचणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले असून या कालावधीत प्राप्त होणारे सर्व संदेश केवळ प्रणाली पडताळणीसाठी असून नागरिकांकडून कोणतीही कृती अपेक्षित नाही, असे स्पष्ट केले आहे.
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256763)
अभ्यागत कक्ष : 11