कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2025-26 मधील गहू उत्पादन स्थितीबाबत सरकारचे स्पष्टीकरण; हवामानातील बदलांनंतरही पीकांची स्थिती समाधानकारक


मुख्य कीड किंवा रोगांचा कोणताही प्रादुर्भाव नोंदलेला नाही; खरेदीच्या प्रवृत्तीमुळे चांगल्या उत्पादनाचे संकेत

Posted On: 26 APR 2026 11:10AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026

2025–26 या वर्षातील गव्हाच्या उत्पादन स्थितीबाबत काही माध्यमांमध्ये आलेल्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट करण्यात येते की, चालू हंगाम मिश्र असला तरी सक्षम राहिला आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि शेतकऱ्यांनी योजलेले प्रभावी उपाय यांचा यावर परिणाम झाला आहे.

देशात अंदाजे 33.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या गव्हाच्या पिकात या हंगामात कीड किंवा रोगांचा कोणताही प्रादुर्भाव आढळलेला नाही. देशात वेळेवर आणि लवकर पेरणी झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत क्षेत्रफळात वाढ झाली आहे.

हंगामाच्या उत्तरार्धात, फेब्रुवारी महिन्यात नेहमीपेक्षा जास्त असलेल्या तापमानामुळे पिकाला उष्णतेचा फटका बसला, त्यामुळे दाणे भरण्याचा कालावधी कमी झाला आणि उत्पादनावर परिणाम झाला. याशिवाय, काही भागांमध्ये पिक परिपक्व होत असताना झालेल्या अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे स्थानिक स्तरावर दाण्यांच्या गुणवत्तेला आणि उत्पादनाला हानी पोहोचल्याची शक्यता आहे.

तथापि, एकूण उत्पादनाचा अंदाज संयत आशावादी आहे कारण काही पूरक घटक यासाठी अनुकूल ठरत आहेत. यात

  • गव्हाच्या पिकात रोग किंवा कीड यांमुळे उत्पादनात घट झाल्याचे कोणतेही अहवाल प्राप्त झालेले नाहीत. तसेच, पिकाच्या वाढीच्या टप्प्यात तणांचा प्रादुर्भावही कमी होता. 
  • लवकर किंवा वेळेवर पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे दाणे भरण्याच्या टप्प्यातील शेवटच्या उष्णतेपासून पिकाचे संरक्षण होते. 
  • 2025-26 मध्ये अतिरिक्त 0.6 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील झालेल्या नुकसानाची काही अंशी भरपाई होण्याची अपेक्षा आहे. 
  • तसेच, वाण बदल दर वाढल्यामुळे उच्च उत्पादन देणारे, हवामानास तग धरणारे आणि रोगप्रतिकारक वाणांचा अवलंब वाढला आहे. हे वाण उष्णता आणि जैविक ताणांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात.

वरील बाबी लक्षात घेता, हवामानातील अनियमिततेमुळे झालेले प्रतिकूल परिणाम मोठ्या प्रमाणावर भरून निघतील, अशी अपेक्षा आहे. वाढीव क्षेत्रफळ, लवकर पेरणी आणि सुधारित वाणांचा अवलंब यामुळे 2024-25 च्या हंगामाच्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवरील गव्हाचे उत्पादन स्थिर राहण्यास मदत होईल.

खरेदी आणि आवक प्रवृत्ती

खरेदीच्या आकडेवारीनुसार प्रमुख राज्यांमध्ये उत्पादनाचे चांगले स्तर दिसून येतात:

  • हरियाणा राज्यातील मंड्यांमध्ये गव्हाची आवक 75 एलएमटी या सरकारी खरेदी लक्ष्यापेक्षा जास्त झाली असून, आतापर्यंत 56.13 एलएमटी खरेदी करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 9  एलएमटी ने खरेदी वाढली आहे.
  • मध्य प्रदेशात सुरुवातीचे खरेदी लक्ष्य 78 एलएमटी  होते; परंतु उत्पादनाच्या उच्च अंदाजामुळे राज्य सरकारच्या विनंतीनंतर ते अधिकृतपणे 100  एलएमटी पर्यंत वाढविण्यात आले आहे.
  • महाराष्ट्रातील 2025-26 साठी गव्हाचे उत्पादन सुमारे 22.90 लाख टन इतके अपेक्षित असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही स्थिर वाढ आहे. एप्रिल 2026 च्या उत्तरार्धात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागातून गव्हाचे आगमन सातत्याने सुरू आहे.

वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते की, काही ठिकाणी हवामानाशी संबंधित परिणाम दिसून आले असले तरी 2025–26 साठी गव्हाचे एकूण उत्पादन परिदृश्य स्थिर आणि सक्षम आहे. वाढीव क्षेत्रफळ, सुधारित कृषी पद्धती आणि उन्नत वाणांचा वाढता अवलंब यामुळे याला बळ मिळत आहे.


नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2255626) अभ्यागत कक्ष : 36