वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भांडवल वितरण प्रक्रियेत सुलभता आणण्याच्या उद्देशाने उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीने 10,000 कोटी रुपयांच्या स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 च्या अंमलबजावणीचे नेतृत्व भारतीय लघु उद्योग विकास बँकेकडे (SIDBI), व्याप्तीचा विस्तार आणि क्षमता वृद्धीसाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग करणार अतिरिक्त संस्थेची नियुक्ती
Posted On:
25 APR 2026 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2026
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 साठी कार्यान्वयनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेत भांडवलाचा ओघ अधिक कार्यक्षमतेने होत राहावा हा यामागचा उद्देश आहे. त्या अंनुषंगाने या मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत 10,000 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण, प्रशासन आणि देखरेखीसाठी एक सुनियोजित मार्गदर्शक आराखडा आखून दिला गेला आहे.
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या श्रेणी एक आणि श्रेणी दोन अंतर्गतच्या पर्यायी गुंतवणूक निधीबाबतच्या वचनबद्धतेच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर हा निधी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये गुंतवला जाणार आहे. या पद्धतीमुळे शिस्तबद्ध भांडवल वाटप सुनिश्चित होईल, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल तसेच विविध क्षेत्रांसाठी, विविध टप्प्यांनुसार आणि भौगोलिक क्षेत्रांमधील स्टार्टअप्सना निधी सुलभतेने उपलब्ध करून देता येईल अशी अपेक्षा आहे.
याअंतर्गत, भारतीय लघु उद्योग विकास बँकेकडे (SIDBI) प्राथमिक अंमलबजावणी संस्था म्हणून जबाबदारी असेल, ते या पर्यायी गुंतवणूक निधीच्या निवड आणि देखरेखीसंबंधीच्या सुनियोजित प्रक्रियेनुसार ही योजना अमलात आणतील. या योजनेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी, प्रत्येक क्षेत्राअंतर्गतच्या कौशल्यांमध्ये वृद्धी घडवून आणण्यासाठी तसेच अशा योजनांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने संस्थात्मक क्षमता निर्माण करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीने आणखी एका अतिरिक्त अंमलबजावणी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्राधान्यक्रमावरच्या क्षेत्रांमध्ये सह गुंतवणूकदार म्हणून, तसेच इतर स्वरुपात योगदान देण्याबद्दलची तरतूदही करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अनुभवाच्या आधारे, त्या त्या वेळी लवचिक धोरण अवलंबता येण्याची तरतूदही या आराखड्याअंतर्गत केली गेली आहे. त्यामुळे स्टार्टअप व्यवस्थेच्या त्या त्या वेळच्या गरजांनुसार बदल करणे शक्य होणार आहे.
स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ची आखणी सुनियोजित पद्धतीने केली गेली असल्याने देशांतर्गत व्हेंचर कॅपिटलची व्याप्ती आणि गुणवत्ता वाढेल, नवोन्मेषी उद्योगांना पाठबळ मिळेल तसेच, जागतिक स्टार्टअप केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.
Link to the operational guidelines for Startup India FoF 2.0:
https://www.dpiit.gov.in/static/uploads/2026/04/8949d8e0dabf11cb9291b00ec1d1f727.pdf
* * *
राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255578)
अभ्यागत कक्ष : 16