युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विकसित भारत 2047 च्या उभारणीत युवावर्ग केवळ लाभार्थी नव्हे, तर भागीदार असला पाहिजे : डॉ. मनसुख मांडविय
तळागाळातील संवादापासून ते राष्ट्रीय कृतीपर्यंत, युवकांच्या आवाजाने धोरणांना आकार दिला पाहिजे : रक्षा खडसे
प्रविष्टि तिथि:
24 APR 2026 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2026
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांचे तीन दिवसीय चिंतन शिबिर आज श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात (एस के आय सी सी) सुरू झाले. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

“संवाद से समाधान” या संकल्पनेवर आधारित पहिल्या दिवशी, ‘माय भारत’च्या माध्यमातून युवा सहभाग चौकट मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये धोरणात्मक सुसंवाद, संस्थात्मक एकत्रीकरण आणि परिणाम-केंद्रित कार्यक्रम यावर भर देण्यात आला.
आपल्या मुख्य भाषणात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्वसमावेशक आणि सहभागी प्रशासनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “प्रत्येक तरुणाचा आवाज निर्णय प्रक्रियेत आणून त्याचा वैयक्तिक सहभाग सुनिश्चित करणे, हा या चिंतन शिबिराचा दृष्टिकोन आहे.”
भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय सामर्थ्यावर भर देताना ते म्हणाले, "भारताकडे जगातील सर्वात मोठा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे आणि 'विकसित भारत 2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी, अंतिमतः त्यांच्याच फायद्याची ठरणारी धोरणे ठरवण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे.”

सहयोगी राष्ट्रउभारणीच्या गरजेवर जोर देताना ते पुढे म्हणाले, "आपण तरुणांना केवळ योजनांचे लाभार्थी न बनवता, 2047 ची उद्दिष्टे साध्य करण्यातील समान भागीदार बनवले पाहिजे.”
संस्थात्मक यंत्रणांवर प्रकाश टाकत ते पुढे म्हणाले, “जिल्हा युवा अधिकाऱ्यांच्या (डीवायओ) माध्यमातून युवकांचे योग्य संगोपन साधता येते, जे तळागाळातून उदयास येणाऱ्या कल्पनांना प्रभावीपणे योग्य दिशा देऊ शकतात.”
राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी नमूद केले की, चिंतन शिबिर हे अर्थपूर्ण संवाद आणि कृतीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्या म्हणाल्या, “हे चिंतन शिबिर देशातील युवकांसाठी महत्त्वाचे मुद्दे ओळखण्याच्या आणि कृतीयोग्य धोरणे विकसित करण्याच्या फलदायी चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.”
सहभागी शासनावर जोर देत त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत तरुणांचा सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे.”

तळागाळातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत त्या पुढे म्हणाल्या, "चर्चांचा प्रवाह तळागाळापासून जिल्हा युवा अधिकाऱ्यांमार्फत ( डी वायओ ) राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे; जेणेकरून धोरणांमध्ये लोकांच्या खऱ्या गरजा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल.”
पुढील दोन दिवस चालणाऱ्या चिंतन शिबिरात आंतर-शिक्षण, धोरणात्मक सुसंवाद आणि कृती-आधारित परिणामांवर भर दिला जाईल, जे 'विकसित भारत@2047' अंतर्गत एक सक्षम युवा परिसंस्था उभारण्याच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये योगदान देईल.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255442)
आगंतुक पटल : 45