संरक्षण मंत्रालय
भारत-जर्मनी यांच्यातल्या सामरिक संरक्षण भागीदारीला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री यांच्यात बर्लिन इथे चर्चा
Posted On:
22 APR 2026 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बर्लिन इथे जर्मनीचे संरक्षण मंत्री, बोरिस पिस्तोरियस यांच्याशी आज 22 एप्रिल 2026 रोजी द्विपक्षीय चर्चा केली. जर्मनीसोबतच्या संरक्षणविषयक सामरिक भागीदारीला चालना देण्याविषयी ह्या बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी दोन्ही मंत्र्यांमधे, द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षणविषयक विस्तृत चर्चा झाली, यात, संरक्षण उपकरणांची सहनिर्मिती आणि सहविकास, विशेषतः काही मर्यादित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याविषयी चर्चा झाली. तसेच, सामरिक भागीदारीचा महत्वाचा स्तंभ म्हणून, लष्करी सहकार्य वाढवण्याविषयीची कटिबद्धताही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीत, संरक्षण औद्योगिक सहकार्य आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता राखीव प्रशिक्षणातील सहकार्यासाठी अंमलबजावणी करारावर स्वाक्षऱ्या होऊन त्यांची देवाणघेवाण करण्यात आली. हा जर्मनी दौरा, सखोल मैत्री, समन्वय आणि विश्वासाचे प्रतीक असल्याचे, राजनाथ सिंह, यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत संरक्षण सहकार्याला लक्षणीय गती मिळाली असून, विशेषतः बोरिस पिस्तोरियस यांनी जर्मनीचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या भागीदारीत अधिक वेग आला आहे.
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात नुकतीच झालेली सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी, सामूहिक सहभाग अधिक सखोल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. दोन्ही मंत्र्यांनी या भागीदारीचा, द्विपक्षीय तसेच व्यापक युरोपीय संदर्भात उपयोग करून ठोस परिणाम साधण्यावर सहमती दर्शवली. यामुळे प्रादेशिक स्थैर्य बळकट होईल, संयुक्त क्षमता वाढतील आणि भारत-जर्मनी धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतील.

जागतिक अनिश्चिततेच्या काळात, भारत आणि जर्मनी या देशांनी, जागतिक अर्थव्यवस्थेला अत्यंत आवश्यक असे स्थैर्य आणि ताकद दिली आहे, असेही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. दहशतवादाच्या प्रश्नावर बोलतांना, दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा, एकमुखाने, स्पष्ट शब्दांत निषेध करायला हवा, त्यात कुठलाही किंतू किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
या वर्षी सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या एक्स -तरंग शक्ती च्या पुढच्या आवृत्तीत, जर्मनीच्या हवाई दलाची तुकडी सहाभगी होईल, अशी अपेक्षा संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली.



* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254699)
अभ्यागत कक्ष : 9