कृषी मंत्रालय
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार पूर्णपणे दक्ष: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरीपाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
18 APR 2026 5:37PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज कृषी क्षेत्राची सद्यस्थिती आणि आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा उच्चस्तरीय आढावा घेतला. त्यांनी कृषी सचिव आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत हवामान अंदाज, पाण्याची उपलब्धता, पिकांची स्थिती, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांची व्यवस्था, राज्यांची तयारी आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कल्याणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि सरकार एल निनोच्या (El Nino) संभाव्य प्रभावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, यावर आढावा बैठकीदरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी भर दिला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2026 मध्ये नैऋत्य मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामध्ये देशभर हंगामी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) सुमारे 92 टक्के राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. मान्सूनच्या हंगामात 'एल निनो'ची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही सूचित करण्यात आले, अंतिम आणि सुधारित मूल्यांकन मे 2026 च्या शेवटच्या आठवड्यात जारी केले जाईल. हवामानाशी संबंधित अंदाजांना गांभीर्याने घेत केंद्र सरकार पूर्ण तयारीने पुढे जात आहे आणि शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, असे या आढावा बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले.
सध्या देशातील जलाशयांमधील पाणीसाठा समाधानकारक आहे आणि एकूण साठा नेहमीच्या सर्वसामान्य स्तरापेक्षा चांगला आहे, या महत्त्वाच्या वस्तुस्थितीवर या बैठकीत भर देण्यात आला. उपलब्ध अंदाजानुसार, जलाशयांमधील साठा या कालावधीसाठीच्या सामान्य पातळीच्या 127.01 टक्के इतका आहे, ज्यामुळे खरीप हंगामात सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोलाची मदत होईल आणि ओलाव्याच्या कमतरतेचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. या आधारावर बैठकीत असे वर्तविण्यात आले की एल निनोचा संभाव्य प्रभाव असूनही, कृषी क्षेत्रावर होणारा त्याचा परिणाम मागील प्रसंगांच्या तुलनेत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

सर्व राज्यांनी कोणत्याही प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी ठेवावी आणि जिल्हा स्तरापर्यंत आपत्कालीन योजना कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींपासून वाचवण्यासाठी देखरेख यंत्रणा सक्रीय असून परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे, असे चौहान यांनी स्पष्ट केले.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2253425)
आगंतुक पटल : 65