इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय कृत्रिम प्रज्ञा प्रशासन धोरणाचे नेतृत्व करण्यासाठी सरकारने 'कृत्रिम प्रज्ञा प्रशासन आणि आर्थिक गट'(एआयजीईजी) केला स्थापन
धोरणात्मक समन्वय साधण्यासाठी, जबाबदार कृत्रिम प्रज्ञा नवोपक्रमाला चालना देण्यासाठी आणि कामगार बाजारावरील परिणामांचे निवारण करण्यासाठी स्थापन केली एक उच्च-स्तरीय आंतर-मंत्रालयीन संस्था
Posted On:
16 APR 2026 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2026
सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने कृत्रिम प्रज्ञा प्रशासन आणि आर्थिक गट (एआयजीईजी ) स्थापन केला आहे. ही एक उच्च-स्तरीय आंतर-मंत्रालयीन संस्था असून ही संस्था कृत्रिम प्रज्ञा प्रशासन धोरणांचा विकास आणि समन्वय साधण्यासाठी देशाची उच्चस्तरीय केंद्रीय संस्थात्मक यंत्रणा म्हणून कार्य करणार आहे.
‘एआयजीईजी’ गटाच्या स्थापनेमुळे, भारताच्या कृत्रिम प्रज्ञा प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणि आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलेल्या संस्थात्मक शिफारशींना एक औपचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
कृत्रिम प्रज्ञा प्रशासनाला एक शासकीय दृष्टिकोन देण्यासाठी या एका आंतर-मंत्रालयीन संस्थेची स्थापना करण्याची शिफारस आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आली होती. विविध मंत्रालये, विभाग, नियामक संस्था आणि सल्लागार संस्थांच्या कामकाजाला एका सुसंगत राष्ट्रीय धोरणाशी एकरूप करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे, आर्थिक सर्वेक्षणामध्ये अशा एका समन्वय साधणाऱ्या प्राधिकरणाच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे, हे प्राधिकरण या क्षेत्रातील कामगार बाजारातील वास्तव आणि सामाजिक स्थिरतेच्या दृष्टीने कृत्रिम प्रज्ञेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
‘एआयजीईजी’च्या अध्यक्षपदी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि उपाध्यक्षपदी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, तसेच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद आहेत. या समितीच्या इतर सदस्यांमध्ये धोरण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा आणि आर्थिक व्यवहार या क्षेत्रांतील सरकारमधील वरिष्ठ भागधारकांचा समावेश करण्यात आला आहे.
‘एआयजीईजी’ ही संस्था भारताच्या कृत्रिम प्रज्ञा प्रशासनाच्या संस्थात्मक संरचने अंतर्गत असलेली सर्वोच्च आंतर-मंत्रालयीन संस्था म्हणून काम करणार आहे. या संस्थेला तंत्रज्ञान आणि धोरण तज्ज्ञ समिती चेही सहकार्य मिळणार आहे. ही तज्ज्ञ समिती कृत्रिम प्रज्ञा धोरण आणि प्रशासनाशी संबंधित जागतिक घडामोडी, नव्याने येणारे तंत्रज्ञान, संभाव्य धोके, त्यांचे नियमन आणि इतर विकसित होत असलेल्या घडामोडींबाबत ‘एआयजीईजी’ समितीला सल्ला देईल.
‘एआयजीईजी’ची रचना आणि कार्यकक्षा यांविषयी सविस्तर माहितीसाठी जाणून घेण्यासाठी कृपया खालील दुव्यावर संपर्क साधावा - :
https://d12aarmt01l54a.cloudfront.net/cms/files/constitution-of-aigeg/1776346498.pdf
सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252795)
अभ्यागत कक्ष : 27