संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय सुरक्षा हे एक सामूहिक कर्तव्य, राष्ट्रीय सुरक्षेची ताकद ही नागरिकांमधील एकजुटता, शिस्तबद्धता आणि जागरूकता या घटकांच्या आधारे होते निर्धारित : संरक्षण मंत्री
Posted On:
11 APR 2026 7:59PM by PIB Mumbai
देश विकसित भारताच्या दिशेने करत असलेल्या वाटचालीत राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे एक अविभाज्य स्तंभ असून, राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ संरक्षण दलांची एकमेव जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाचे सामूहिक कर्तव्य आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आज दि. 11 एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे झालेल्या एका कार्यक्रमाला राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. सैनिक म्हणजे संरक्षणाची पहिली फळी असते, मात्र तितक्याच प्रमाणात नागरिकांमधील एकजुटता, शिस्तबद्धता आणि जागरूकता या घटकांच्या आधारेही राष्ट्रीय सुरक्षा निर्धारित होत असते असे ते म्हणाले.

सद्यपरिस्थितीत आपल्यासमोरची आव्हाने सातत्याने बदलत आहेत, सध्या जागतिक पातळीवरही प्रचंड अनिश्चितता आहे अशावेळी कोणत्याही व्यक्तीला निष्क्रिय राहता येणार नाही ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर जनतेने कोणतीही कृती जबाबदारी आणि दृढ बांधिलकीच्या भावनेने करायला हवी असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज असते. नागरिकांनी कायद्याचे पालन करून, चुकीची माहिती नाकारून आणि वैयक्तिक लाभापेक्षा देशहिताला प्राधान्यक्रमावर ठेऊन राष्ट्रीय सुरक्षेत अर्थपूर्ण योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले. एक राष्ट्र म्हणून आपल्याला विविध शत्रूस्वरुप घटकांनी वेढलेले आहोत, हे लक्षात घेऊन, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनाचा पूरेपूर वापर केला जाईल, हे आपण सुनिश्चित केले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात माहिती हे एक शक्तिशाली साधन झाले आहे, चुकीची माहिती आणि अफवांमध्येही समाजात अस्थिरता निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळेच जनतेपर्यंत अचूक आणि जबाबदारीने पुरवलेली माहिती पोहोचेल हे सुनिश्चित करण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. माध्यमे म्हणजे केवळ बातम्या प्रसारित करण्याचे साधन नाही, तर ती जनमत घडवणारी एक शक्तिशाली संस्थात्मक रचना आहे असे ते म्हणाले. केवळ खळबळ माजवण्याच्या उद्देशाने जर का राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्दे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले तर त्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते याचे भान माध्यमांना बाळगायला हवे असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी दिला. माध्यमे ही राष्ट्राच्या जडणघडणीतला महत्वाचा घटक आहे आणि म्हणूनच आपण मांडत असलेला आशय राष्ट्र हितासाठी असेल, त्यातून अनावश्यक भीती किंवा गोंधळाला खतपाणी घातले जाणार नाही याची सुनिश्चिती करणे ही जबाबदारी देखील माध्यमांचीच असते असे ते म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर कोणतीही तडजोड करत हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केले. विकसित भारत@2047 च्या संकल्पाला अनुसरून लोककल्याणकारी उपाययोजनांसोबतच संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यालाही एकसमान प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपली संरक्षण दले ही भारतीय भूमीवर उत्पादित अत्याधुनिक शस्त्रास्त्रे / व्यासपीठे आणि मंचांनी सुसज्ज असावेत, अशा प्रकारची आत्मनिर्भरता साध्य करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

***
राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2251207)
अभ्यागत कक्ष : 9