आयुष मंत्रालय
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालयाच्यावतीने ‘’शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी’’ कार्यक्रम
“पुराव्यावर आधारित प्रगती आणि निरंतर संशोधन ही होमिओपॅथीला जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठीची गुरुकिल्ली”: प्रतापराव जाधव
“पायाभूत सुविधा, डिजिटल मंच आणि संशोधनाच्या माध्यमातून सरकारकडून आयुष परिसंस्था मजबुतीचे कार्य” — वैद्य राजेश कोटेचा
Posted On:
10 APR 2026 4:35PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाने “शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी” या संकल्पनेवर आधारित जागतिक होमिओपॅथी दिन 2026 साजरा केला. यानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये देशभरातले धोरणकर्ते, संशोधक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी एकत्र आले होते. हा कार्यक्रम डॉ. सॅम्युअल हॅनीमन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्वसमावेशक आणि शाश्वत आरोग्यसेवेचा प्रसार करण्यासाठी होमिओपॅथीच्या विस्तारशील भूमिकेवर भर देण्यात आला.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, "गेल्या काही वर्षांत, भारताने मजबूत संस्था आणि संशोधन संस्थांच्या पाठिंब्यातून एक सशक्त आणि विस्तारक्षम होमिओपॅथी कार्यशक्ती विकसित केली आहे. सीसीआरएच, एनसीएच आणि एनआयएच सारख्या संस्था संशोधन, शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा वितरणाद्वारे होमिओपॅथीचा वैज्ञानिक पाया, नियामक आराखडा आणि सार्वजनिक विश्वास सतत मजबूत करत आहेत, त्यामुळे देशातल्या सुलभ आणि किफायतशीर आरोग्यसेवेत अर्थपूर्ण योगदान मिळत आहे."
पुरावा-आधारित प्रगती, आंतरविद्याशाखीय सहयोग आणि निरंतर संशोधन हे होमिओपॅथीला औषधांची एक विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर संबंधित प्रणाली म्हणून अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे असे जाधव यांनी सांगितले. त्यांनी वैज्ञानिक अभ्यास वाढवणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि उच्च-गुणवत्तापूर्ण, रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्ते यांच्यात अधिक समन्वयाची गरज अधोरेखित केली. त्यांनी राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक आरोग्य उद्दिष्टांच्या अनुषंगाने सर्वांगीण आणि शाश्वत आरोग्य प्रारुपाला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले की, सरकार पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, सेवांचा विस्तार आणि पुरावा-आधारित आरोग्य सेवा वितरणाला पाठिंबा देण्यासाठी आयुष ग्रिड आणि एचएमआयएस सारख्या डिजिटल मंचाच्या माध्यमातून आयुष परिसंस्था मजबूत करत आहे. त्यांनी कुशल आणि भविष्यासाठी सज्ज कार्यशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला.
कोटेचा यांनी पुढे अधोरेखित केले की, मजबूत संस्थात्मक नेटवर्क आणि संशोधन तसेच प्रमाणीकरणावर भर दिल्यामुळे भारत होमिओपॅथीमध्ये जागतिक नेता म्हणून उदयाला आला आहे, आणि सुलभ आणि शाश्वत आरोग्यसेवेत योगदान देत आहे.
संस्थात्मक वाढ, प्रमाणीकरण आणि जागतिक प्रसार यावर अधिक भर देऊन भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये होमिओपॅथी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव अलार्मेलमंगाई डी. यांनी ठळकपणे सांगितले.
या निमित्ताने, सीसीआरएचचे नवीन अधिकृत बोधचिन्ह आणि कार्यक्रमाची स्मरणिका यासह महत्त्वाच्या प्रकाशनांची आणि ज्ञान स्रोतांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. या कार्यक्रमाने होमिओपॅथीला पुरावा-आधारित, सुलभ आणि रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवा प्रणाली म्हणून मजबूत करण्याच्या भारत सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली.





***
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250890)
अभ्यागत कक्ष : 27