नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी भारतीय विमान कंपन्यांच्या देशांतर्गत विमानसेवेसाठी दिलासादायक उपाययोजना केल्या जाहीर


जागतिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या ‘लँडिंग’ आणि ‘पार्किंग’ शुल्कात 25% कपात

Posted On: 08 APR 2026 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026

पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीने भारतीय विमान कंपन्यांसह जागतिक विमान वाहतूक परिचालनासमोर मोठी आव्हाने उभी केली आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून देशांतर्गत विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यापूर्वी सरकारने एटीएफ दरात केवळ आंशिक वाढ जाहीर केली होती. यामध्‍ये देशांतर्गत विमानसेवांसाठी ही वाढ केवळ 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती.

या उपायाचा उद्देश विमान कंपन्यांना परिचालन खर्चाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करणे आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या हवाई प्रवासाचे फायदे प्रवाशांपर्यंत पोहोचत राहतील हे सुनिश्चित करणे हा होता.

या घोषणेबद्दल बोलताना नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, “हवाई वाहतूक क्षेत्रातील प्रवास हा प्रवाशांसाठी अधिक परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय व्हावा,  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे.”

त्याचप्रमाणे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) देखील त्यांच्या सर्व लहान विमानतळांवरील ‘लँडिंग’ आणि ‘पार्किंग’शुल्क मंजूर दराच्या 25% ने कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व देशांतर्गत उड्डाणांसाठी ही कपात येत्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहील.

या उपाययोजनांमुळे तीन महिन्यांच्या कालावधीत प्रमुख विमानतळांवर विमान कंपन्यांना देय असलेल्या लँडिंग आणि पार्किंग शुल्कात अंदाजे 400 कोटी रुपयांची कपात होण्याची अपेक्षा आहे.


सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250305) अभ्यागत कक्ष : 31