माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी पुण्यातील एफटीआयआय, एनएफडीसी-एनएफएआय आणि दूरदर्शन केंद्र येथे भेट दिली
Posted On:
04 APR 2026 9:10PM by PIB Mumbai
पुणे, 4 एप्रिल 2026
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) आणि दूरदर्शन केंद्र या संस्थांना भेट दिली. 1 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर या संस्थांना त्यांनी प्रथमच भेट दिली.

या भेटीदरम्यान कुमार यांनी एफटीआयआयच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि परिसराची व्यापक पाहणी केली. एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी एफटीआयआयमधील नवीन थिएटर संकुल, कॅमेरा स्टोअर, ग्रंथालय, शैक्षणिक विभाग आणि स्टुडिओ यांसारख्या प्रमुख सुविधांना भेट दिली. वरिष्ठ प्राध्यापकांनी त्यांना संस्थेची अत्याधुनिक उपकरणे आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांविषयी माहिती दिली.

या प्रसंगी चंचल कुमार यांनी विविध व्यासपीठांवर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे सादर करण्यात चित्रपट आणि डिजिटल मीडिया शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि एफटीआयआयसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी व्यापक भूमिका बजावावी असे आवाहन केले.
अशा संस्थांनी युवा प्रतिभेला केवळ दर्जेदार चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीसाठीच नव्हे, तर चित्रपट आणि माध्यम उद्योगातील उद्योजकतेसाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांनी पुढे नमूद केले.

या भेटीला विशेष महत्त्व आहे, कारण एफटीआयआय, पुणेने अलीकडेच विद्यापीठ म्हणून नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे, ज्याचा उद्देश शैक्षणिक संधींचा विस्तार करणे आणि विकसित होत असलेल्या माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील सहभाग अधिक वाढवणे हा आहे.
सचिवांनी पुण्यातील एनएफडीसी-एनएफएआयच्या संकुलांनाही भेट दिली. त्यांनी प्रोजेक्शन रूम, थिएटर, व्हॉल्ट आणि ग्रंथालयाची पाहणी केली, तसेच दुसऱ्या टप्प्यातील सुविधेलाही भेट दिली, ज्याठिकाणी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत डिजिटायझेशनचे काम सध्या सुरू आहे.

दूरदर्शन केंद्र, पुणे येथे त्यांनी केंद्राच्या कामकाजाचा आणि कार्यक्रम निर्मिती सुविधांचा आढावा घेतला, तसेच आशय निर्मिती आणि प्रसारासंदर्भात अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249048)
अभ्यागत कक्ष : 46