कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 03 APR 2026 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने येत्या  11, 12 आणि 13  एप्रिल, 26  असे तीन दिवस मध्‍य प्रदेशातील रायसेन येथील दसरा मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील 'प्रगत कृषी महोत्सव - प्रदर्शन आणि प्रशिक्षण' आयोजित करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवामध्‍ये 'प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत' आणि 'बियाण्यापासून बाजारापर्यंत' या संपूर्ण प्रवासाचे एकाच मैदानावर दर्शन घडवून, देशातील शेतकऱ्यांना विकासाच्या मार्गावर नेले जाईल. या महोत्सवाविषयी शिवराज सिंह  चौहान यांनी सांगितले की, हा केवळ एक मेळावा नाही, तर कृषी क्षेत्रावर आधारित तीन दिवसांचा एक भव्य महाकुंभ आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे  नशीब बदलण्याची सर्वात मोठी संधी मिळेल.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज या कार्यक्रमाच्या संदर्भात परिसरातील तज्ज्ञ व्यक्ती, प्रगतशील शेतकरी, पदाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, रायसेन (मध्य प्रदेश) येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान होणारा हा राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सव, शेती आणि कृषी क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' म्हणजे क्रांतिकारी बदल घडवून आणणारा  ठरेल. रायसेन येथील दसरा मैदानावर आयोजित होणाऱ्या या भव्य राष्ट्रीय कृषी मेळाव्यामध्‍ये , शेतीची नवीन तंत्रे, सुधारित बियाणे, ड्रोन आणि आधुनिक यंत्रसामग्री, सूक्ष्म सिंचन, पशुसंवर्धन-मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, शेतकरी -कृषी  उत्पादक संस्था  आणि ग्रामीण उपजीविका या विषयांवर आधारित शेकडो दालने  उभारण्यात येणार आहेत.  येथे शेतकरी केवळ या गोष्टी पाहणारच नाहीत, तर त्यांचा त्वरित लाभ घेण्याचे मार्गही शिकून घेतील आणि समजून घेतील.

मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये :-

यावेळी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, सुमारे तीनशे दालनांचा समावेश असलेले हे बहु-क्षेत्रीय प्रदर्शन, शेतीच्या प्रत्येक टप्प्यासाठी — अगदी  प्रक्रिया आणि विपणनापर्यंत — एकाच ठिकाणी उपाय  उपलब्ध करून देईल. यामध्ये कृषी, फलोत्पादन, सूक्ष्म सिंचन, कृषी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान, खते, कीटकनाशके, बियाणे कंपन्या, डिजिटल शेती, पीक विमा, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर ), राज्य कृषी विद्यापीठे, केव्हीके म्हणजेच कृषी विज्ञान केंद्रे , नाफेड, एफपीओ आणि स्टार्ट-अप्स यांचा सक्रिय सहभाग असेल.

प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि सुविधा

मेळाव्याविषयी अधिक माहिती देताना शिवराज सिंह  म्हणाले की, या तीनही दिवसांत विविध सभागृहांमध्ये चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रे सातत्याने आयोजित केली जातील. यामध्ये पिकांच्या काढणीपश्चात धान्याचे  व्यवस्थापन, कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ करणे,  मृदा आरोग्य, नैसर्गिक शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश असणार आहे.

कृषी आराखडा आणि भविष्यातील दिशा

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, समारोप सत्रात रायसेन, विदिशा, सिहोर आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी एक सर्वसमावेशक कृषी आराखडा सादर केला जाईल. या आराखड्यात पीक वैविध्य, जलसंधारण, सूक्ष्म सिंचनाचा विस्तार, एकात्मिक शेती, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था आणि बाजारपेठ जोडणी बळकट करणे या बाबींसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जातील.

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर /प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 2248912) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati