रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उन्हाळी अंतर्वासिता कार्यक्रम 2026 साठी मागविले अर्ज

Posted On: 26 MAR 2026 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2026

 

राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भविष्यातील व्यावसायिकांना घडवण्याच्या उद्देशाने‌ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन महिन्यांच्या ‘उन्हाळी अंतर्वासिता कार्यक्रम 2026’ साठी अर्ज मागवले आहेत. मे ते जुलै 2026 या कालावधीत नियोजित असलेला हा कार्यक्रम प्राधिकरणाच्या यशस्वी ‘हिवाळी अंतर्वासिता कार्यक्रमा’ची आणि सध्या सुरू असलेल्या सहा महिन्यांच्या अंतर्वासिता कार्यक्रमाची पुढची पायरी आहे; ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारतातील राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या या विशाल कार्यक्षेत्रात अर्थपूर्ण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे हा आहे. प्राधिकरणाने आता आपल्या ‘अंतर्वासिता कार्यक्रमा’चा विस्तार केला असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रासोबतच इतरही अनेक विविध शाखांचा समावेश करण्यात आला आहे.

विस्तारित आराखड्यांतर्गत, 'उन्हाळी अंतर्वासिता कार्यक्रम' शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार अंदाजे 4 मे ते 5 जुलै 2026 या कालावधीत नियोजित केला जाईल. या कार्यक्रमात स्थापत्य अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी, डेटा सायन्स/कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित शाखा अशा अभियांत्रिकी व तांत्रिक क्षेत्रांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश असेल.

याव्यतिरिक्त, हा कार्यक्रम आता विधी (बीए, एल एल बी ), वाणिज्य आणि विज्ञान (बीए/बीकॉम/ बीएससी), व्यवस्थापन (मनुष्यबळ, वित्त, विपणन मधील एमबीए), जनसंवाद आणि ग्रंथालय शास्त्र यांसारख्या अतांत्रिक शाखांपर्यंतही विस्तारण्यात आला आहे; ज्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक व्यापक झाला आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्राधिकरणाच्या निर्धारित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये किंवा नवी दिल्ली येथील प्राधिकरणाच्या मुख्यालयात प्राधिकरणाच्या अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केले जाईल.

पात्र उमेदवारांमध्ये प्रमुख संस्थांमधील ज्यामध्ये 'राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्या'अंतर्गत अव्वल दर्जाच्या संस्था, अग्रगण्य विधी विद्यापीठे, व्यवस्थापन संस्था आणि प्रतिष्ठित जनसंवाद संस्थांच्या पूर्णवेळ पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होतो. निवडल्या गेलेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा 20,000 रुपयांचे मानधन दिले जाईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना 'प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र' देखील प्रदान केले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांना 15 एप्रिल 2026 पर्यंत 'Internship Portal' द्वारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध प्रकल्पांविषयीची माहिती एन एच ए आय च्या Internship Portal वर उपलब्ध आहे:  https://internshipsatnhai.digitalindiacorporation.in/

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245741) अभ्यागत कक्ष : 12