वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याबरोबरच नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यासाठी ‘डीपीआयआयटी’ ने एका डिजिटल मनोरंजन कंपनीबरोबर केला सामंजस्य करार

Posted On: 26 MAR 2026 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2026

 

देशामध्‍ये स्टार्टअप आणि नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्‍यात आले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ‘डीपीआयआयटी’ म्हणजेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  देशभरातील स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एका डिजिटल मनोरंजन कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

डिजिटल मनोरंजन, ऑनलाइन खेळ, ई-क्रीडा, संवादात्मक प्रसार माध्‍यमे आणि कृत्रिम प्रज्ञेवर आधारित तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या उत्पादनांच्या स्टार्टअप्स वाढीला चालना देणे हा या सहकार्याचा उद्देश आहे. याद्वारे संरचित उद्योग सहभागाच्या माध्यमातून स्टार्टअप्सना विस्तारक्षम आणि उद्योगाशी संबंधित उपाय विकसित करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, उद्योगविषयक माहिती, ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी मंच आणि निवडक सहभागाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही भागीदारी स्टार्टअप्सना 'प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट' (पीओसी) विकास, बाजारपेठेत प्रवेश आणि शक्य असेल तिथे उद्योग परिसंस्थेमध्ये एकत्रीकरण यांसारखे महत्त्वाचे टप्पे गाठण्यासही मदत करेल.

या प्रसंगी बोलताना, ‘डीपीआयआयटी’चे सहसचिव संजीव यांनी सांगितले की हे सहकार्य भारताची डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी नमूद केले की अशा भागीदारींमुळे स्टार्टअप्सना उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवनवीन कल्पना आणण्यास, त्या कल्पनांचा, कामांचा विस्तार करण्यास आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उपाययोजना तयार करण्यास मदत होईल.

A group of people standing in a roomAI-generated content may be incorrect.

या सहकार्यांतर्गत, ‘डीपीआयआयटी’ आणि  क्राफ्टन इंडिया प्रा. लि. एकत्रितपणे 'भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज' अंतर्गत नावीन्यपूर्ण आव्हानांचे आयोजन करण्याबाबतची  शक्यता पडताळून पाहणार आहेत. यासोबतच खेळाची रचना करणे, ॲनिमेशन, ‘इमर्सिव्ह तंत्रज्ञान, ई- क्रीडा व्यवस्थापन  आणि कृत्रिम प्रज्ञाचलित  ॲप्लिकेशन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्ष्यित हॅकेथॉन, कार्यशाळा आणि मास्टर क्लासेस आयोजित करण्याचेही नियोजन आहे.

या सहकार्यामुळे उद्योग क्षेत्रातील संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अनुभव मिळण्यासही मदत होईल. या सामंजस्य करारामुळे निवडक स्टार्टअप्सना प्रायोगिक सहकार्याच्या संधी मिळू शकतील.  त्या आधारे त्यांना भविष्यात आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, हा उपक्रम स्टार्टअप क्षेत्रातील सहभागाची पोहोच वाढवण्यासाठीच्या  प्रयत्नांद्वारे आणि 'स्टार्टअप इंडिया' कार्यक्रमांमध्ये  परिसंस्था-बांधणीस समर्थन देईल.

उभय बाजूंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्‍ये हा सामंजस्य करार झाला.  ‘डीपीआयआयटी’चे उपसचिव  टी. एल. के. सिंग आणि क्राफ्टन इंडिया प्रा. लि.चे शासकीय संबंध प्रमुख  विभोर कुकरेती यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

 

* * *

माधुरी पांगे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245678) अभ्यागत कक्ष : 30