अर्थ मंत्रालय
आरोग्य विमा क्षेत्रात जोरदार वाढीच्या गतीसह 2024-25 मध्ये प्रीमियमची एकंदर रक्कम 1.2 लाख कोटी रुपयांच्या वर
आरोग्य विमा दाव्यांचा तत्परतेने आणि रास्त पद्धतीने निपटारा हा विहित कालमर्यादा आणि नियामक उपाययोजना लागू करण्यामागील उद्देश
Posted On:
26 MAR 2026 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2026
भारताच्या आरोग्य विमा क्षेत्राची जवळपास 9%, वृद्धीदरासह जोरदार वाढ होत असल्याचे दिसत असून 2024–25 या वर्षात आरोग्य विमा हप्त्यांची एकूण रक्कम ₹1.2 लाख कोटींच्या वर गेली आहे. या वाढीतून वैद्यकीय खर्च भागवणे शक्य व्हावे याबद्दलची वाढती जागरूकता, आरोग्यसेवांसाठी वित्त पुरवठ्याची वाढलेली उपलब्धता आणि आर्थिक संरक्षणाची मागणी वाढत असल्याचे दिसून येते.
कार्यक्षमता आणखी सुधारावी आणि पॉलिसीधारकांना वेळच्या वेळी आर्थिक आधार मिळावा यासाठी, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) कॅशलेस आरोग्य विमा दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा निर्धारित केल्या आहेत.
कॅशलेस सेटलमेंटसाठी लागणारा वेळ
आयआरडीएआय ने पुढीलप्रमाणे कालमर्यादा निर्धारित केल्या आहेत:-
- कॅशलेस पूर्व-अधिकृतता - एक तासाच्या आत
- अंतिम मंजुरी - तीन तासांच्या आत
विलंब कमी करणे आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळेल हे सुनिश्चित करणे हा या कालमर्यादा निश्चित करण्यामागील उद्देश आहे.
आरोग्य विमा हप्त्यांमध्ये वाढ:
पॉलिसीधारकांचे वाढते वय, अधिक विमा संरक्षण, वाढीव सुविधा अशासारख्या घटकांमुळे आरोग्य विमा हप्त्यांमध्ये वाढ होण्यास चालना मिळत आहे.
आयरडीएआयच्या 2024च्या नियमांनुसार, विमा उत्पादनांसाठी सर्व संबंधित जोखीम घटकांच्या आधारे हप्त्यांची वाजवी रक्कम आकारली जावी, ती व्यवहार्य आणि मूल्य-आधारित असावी, तसेच नियुक्त केलेल्या अॅक्चुअरीद्वारे विश्वसनीय डेटा आणि ग्राहकांच्या अभिप्रायाचा वापर करून त्यांचा ठराविक कालावधीनंतर आढावा घेण्यात यावा असे नमूद केले आहे.
आरोग्य दाव्यांचा निपटारा
2022-23, 2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी रक्कम अदा करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रमाण (दाव्यांच्या संख्येनुसार) पुढीलप्रमाणे:
| आर्थिक वर्ष |
अदा करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रमाण
(दाव्यांच्या संख्येनुसार)
|
| 2022-23 |
85.66% |
| 2023-24 |
82.46% |
| 2024-25 |
87.50% |
याशिवाय, आयआरडीएआयच्या बिमा भरोसा पोर्टलनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात 1,37,361 सामान्य आणि आरोग्य विमा तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी 1,27,755 (93%) तक्रारींचे त्याच आर्थिक वर्षात निराकरण करण्यात आले.
दावा नामंजूर केल्याची किंवा फेटाळण्याचे प्रकार बहुतेकदा विशिष्ट पॉलिसीच्या अटी आणि मर्यादांमुळे होतात. दावे नामंजूर करण्याच्या किंवा फेटाळण्याच्या विविध कारणांमध्ये दाव्याची रक्कम उतरविलेल्या विम्याच्या रकमेपेक्षा जास्त असणे, सह-देयकाचे कलम, पॉलिसीमधील उप-मर्यादा, पूरक पॉलिसींमधील वजावट, खोली भाड्यावरील मर्यादा, प्रमाणनुसार शुल्क, वैद्यकीय व्यतिरिक्त इतर खर्च आदी कारणांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, आयआरडीएआय ने अधिक स्पष्टतेसाठी, दाव्यांची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि पॉलिसीधारकांचा विश्वास दृढ करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. थोडक्यात, पारदर्शक आणि विश्वासार्ह आरोग्य विमा प्रणालीला चालना देण्यासाठी सर्व भागधारकांचा दृष्टिकोन संतुलित आणि माहितीपूर्ण असणे सर्वात महत्त्वाचे असेल.
* * *
नितीन फुल्लुके/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2245622)
अभ्यागत कक्ष : 27