रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने ‘रिफॉर्म एक्प्रेस’ अंतर्गत पाच नव्या सुधारणांची केली घोषणा; मालवाहतूक, बांधकाम तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधेवर अधिक भर
Posted On:
24 MAR 2026 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
वर्ष 2026 दरम्यान नव्या सुधारणा हाती घेण्याच्या भारतीय रेल्वेच्या निर्धारानुसार पाच नव्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे अशी घोषणा केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. या नव्या सुधारणांच्या मंजुरीनंतर 2026 मध्ये जाहीर झालेल्या एकूण सुधारणांची संख्या नऊ वर पोचली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की सध्या सुरु असलेल्या ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ उपक्रमांतर्गत चार सुधारणा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असून पाच नव्या सुधारणा आता लागू होत आहेत. या पाच सुधारणांपैकी दोन सुधारणा मालवाहतुकीशी, एक बांधकामाशी तर उर्वरित दोन सुधारणा प्रवाशांच्या सोयीसुविधेशी संबंधित आहेत.
मीठ वाहतुकीतील सुधारणा
केंद्रीय मंत्री म्हणाले की मीठ उत्पादक तसेच वाहतूकदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली. अभ्यासातून वॅगनची अनुपयुक्त रचना, मिठामुळे वॅगनला गंज येणे, ताडपत्रीने झाकून ठेवले तरीही खुल्या वॅगनमध्ये पाणी झिरपणे अशा अधिक खर्चाला आणि नुकसानाला कारणीभूत ठरणाऱ्या कारणांसह इतर महत्त्वाच्या समस्या निश्चित करण्यात आल्या.
या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, पोलादापासून बनलेली, झाकणातून मीठ भरता येईल आणि बाजूने उतरवता येईल अशी कंटेनर प्रणाली आता यशस्वीपणे विकसित करण्यात आली आहे. हा कंटेनर पोलादापासून बनलेला असल्यामुळे त्याला गंज लागत नाही आणि वरुन मीठ भरण्यासाठी त्याला झाकण आहे तसेच हायड्रॉलिक साईड डिश्चार्ज यंत्रणेमुळे गंतव्य स्थानकावर पोहोचल्यावर ट्रकमध्ये माल उतरवून घेणे सोपे होते.

वाहनांच्या वाहतुकीतील सुधारणा
केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की रेल्वेने केलेल्या नव्या सुधारणेमुळे उद्योगांना लवचिकता प्रदान करत वॅगनची विशेष संरचना करता येणार आहे .उत्पादकांना आता उच्च क्षमतेसह विशिष्ट मूळ आणि गंतव्य स्थान यादरम्यानच्या मार्गाच्या आधारावर वॅगनची रचना करता येईल.

बांधकामाचा दर्जा सुधारणे
अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुढील सुधारणा रेल्वे प्रकल्पांमधील बांधकामाचा दर्जा उंचावण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यात सात प्रमुख बदल सादर केले जात आहेत.
तिकिट रद्द करणे आणि परतावा
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आठवी सुधारणा प्रवाशांच्या सोयीशी निगडित आहे ज्यामध्ये तिकीट प्रणालीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
तिकिटांचा काळाबाजार आणि 'तत्काळ' प्रणालीचा गैरवापर ही एक मोठी चिंतेची बाब ठरली होती, असे त्यांनी सांगितले.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रवासाच्या वेळेपूर्वी 48, 12 आणि 4 तास अशी जी पूर्वीची रद्द करण्याची मुदत होती, ती आता 72, 24 आणि 8 तास अशी सुधारण्यात आली आहे. हा बदल आरक्षण तक्त्यांच्या तयारीच्या सुधारित प्रक्रियेशी सुसंगत ठेवण्यात आला आहे; कारण या तक्त्यांची तयारी आता प्रवासाच्या 4 तास आधी न होता, त्याऐवजी 9 ते 18 तास आधीच केली जाते. ही प्रक्रिया प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता केली जाईल.
केंद्रीय मंत्र्यांनी अशीही घोषणा केली की, आता लवकरच देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून 'काउंटर तिकिटे' रद्द करता येतील; यामुळे यापूर्वी केवळ मूळ स्थानकावरच तिकीट रद्द करता येत असे, हे बंधन आता संपुष्टात आले आहे. त्यांनी सांगितले की, 'ई-तिकिटां'साठी 'तिकीट डिपॉझिट रिसीट' (टीडीआर) दाखल करण्याची अट आता रद्द करण्यात आली असून, तिकीट रद्द केल्यावर परताव्याची प्रक्रिया आपोआप पूर्ण केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेल्या आणखी एका पावलांतर्गत, आता गाडी सुटण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा वर्ग अपग्रेड करू शकतील. यापूर्वी तक्ता तयार होण्यापूर्वीच हे बदल करण्याची मर्यादा होती.
गाडीमध्ये चढण्याच्या स्थानकात बदल
केंद्रीय मंत्री म्हणाले की, सुधारणा क्रमांक नऊमुळे प्रवाशांना गाडी मूळ स्थानकावरून सुटण्याच्या 30 मिनिटांपर्यंत आपले चढण्याचे स्थानक डिजिटल पद्धतीने बदलता येईल. त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी प्रवासी केवळ तक्ता तयार होण्यापूर्वीच चढण्याचे स्थानक बदलू शकत होते. नवीन तरतुदीनुसार, जर एखादा प्रवासी मूळ स्थानकावरून गाडीमध्ये चढू शकला नाही, तर तो आपली निश्चित जागा न गमावता पुढील सोयीस्कर स्थानक निवडून गाडीमध्ये चढू शकतो.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244733)
अभ्यागत कक्ष : 21