आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वजन कमी करणाऱ्या औषधांच्या पुरवठा साखळीवर नियामक देखरेख करणार
Posted On:
24 MAR 2026 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
वजन कमी करणाऱ्या औषधाच्या (GLP-1) पुरवठा साखळीमध्ये, औषध-व्यवहार सुयोग्य पद्धतीने होत आहेत याची खात्री करण्यासाठी, भारताच्या औषध नियंत्रकांनी अशाप्रकारच्या औषधांची अनधिकृत विक्री आणि जाहिरात यांविरुद्धची आपली नियामक देखरेख अधिक तीव्र केली आहे.
भारतीय बाजारपेठेत अलीकडेच GLP-1-आधारित वजन कमी करण्याच्या औषधांचे अनेक जेनेरिक प्रकार दाखल झाल्यामुळे, किरकोळ औषध दुकाने, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, घाऊक विक्रेते आणि वजन कमी करण्यासाठी असलेल्या व्यावसायिक (वेलनेस क्लिनिक्स) यंत्रणांमार्फत होणाऱ्या त्यांच्या मागणीनुसार उपलब्धतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. योग्य वैद्यकीय देखरेखीशिवाय अशी औषधे वापरल्यास, त्यांचे गंभीर दुष्परिणाम होतात तसेच संबंधित आरोग्य धोके उद्भवू शकतात.
ही परिस्थिती लक्षात घेऊन औषध प्रतिबंधक साखळीतील संभाव्य गैरव्यवहारांना आळा घालणे, तसेच अशा औषधांची अनधिकृत विक्री करणे, यासाठी भारताच्या औषध नियंत्रकांनी - विविध राज्य नियामक संस्थांचे सहसमर्थन घेऊन लक्ष्यित प्रयत्न सुरू केले आहेत.
यासंदर्भात 10 मार्च 2026 रोजी, सर्व उत्पादकांना एक सर्वसमावेशक सूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांची दिशाभूल करू शकणाऱ्या किंवा ऑफ-लेबल वापरास प्रोत्साहन देऊ शकणाऱ्या जाहिराती किंवा कोणत्याही प्रकारच्या अप्रत्यक्ष प्रचारावर स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या काही आठवड्यांत, मोठ्या प्रमाणात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात ऑनलाइन फार्मसी गोदामे, घाऊक औषधविक्रेते, किरकोळ विक्रेते, वेलनेस आणि स्लिमिंग क्लिनिक्स यांसह 49 संस्थांचे लेखापरीक्षण आणि तपासणी करण्यात आली. ही तपासणी देशभरातील अनेक विभागांमध्ये करण्यात आली आणि अनधिकृतपणे होणारी विक्री, चुकीच्या औषध लिहीण्याच्या पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या मार्केटिंगशी संबंधित केलेले उल्लंघन ओळखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. याव्यतिरिक्त, दोषी संस्थांना नोटिसा देखील पाठवण्यात आल्या आहेत.
रुग्णांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, यावर नियामक मंडळाचा भर आहे. वैद्यकीय देखरेखीशिवाय वजन कमी करण्याच्या औषधांचा गैरवापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तरी केवळ पात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखालीच अशी औषधे वापरावीत, असा असा सल्ला नागरिकांना दिला जात आहे.
भारतात अंत:स्त्रावग्रंथी तज्ञ आणि इंटर्नल मेडिसिन तज्ञांच्या, तसेच काही विशिष्ट आजारांसाठी केवळ ह्रुदयरोग तज्ञांच्या औषधचिट्ठी आधारे ही औषधे देण्यास काही अटींवर मान्यता देण्यात आली आहे, यांचा नियामक मंडळ येथे पुनरूच्चार करत आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये ही नियामक देखरेख अधिक तीव्र केली जाईल आणि नियमांचे पालन न केल्यास परवाने रद्द करणे, दंड आकारणे आणि कायद्यांन्वये खटला चालवणे यांसारखी कठोर पावले उचलली जातील.
* * *
नितीन फुल्लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244560)
अभ्यागत कक्ष : 32