ऊर्जा मंत्रालय
भारत विद्युत शिखर परिषदेत भारत- आफ्रिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीविषयक बैठकीचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
21 MAR 2026 1:52PM by PIB Mumbai
भारत विद्युत शिखर परिषद 2026 च्या आजच्या तिसऱ्या दिवशी नवी दिल्ली येथे भारत आणि आफ्रिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीविषयक बैठक पार पडली. केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मलावीचे ऊर्जा व खाण मंत्री डॉ. जीन मथांगा, आफ्रिका 50 चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलायन ईबुबिस, विविध आफ्रिकी देशांचे मंत्री, आफ्रिकी संघ आणि आफ्रिका 50 चे प्रतिनिधी, तसेच राजदूत, उच्चायुक्त, विद्युत क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे अधिकारी, वित्तीय संस्था, विकास भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल यांनी सांगितले की आर्थिक वाढीस चालना देणे, सन्मान्य जीवनमान सुनिश्चित करणे आणि नव्या संधी निर्माण करणे यासाठी वीज अत्यंत आवश्यक आहे. ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड’ ही संकल्पना जागतिक ऊर्जा एकात्मतेसाठी परिवर्तनकारी दृष्टीकोन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
श्रीपाद नाईक यांनी सांगितले की भारत–आफ्रिका भागीदारीने आता हेतूपासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. ऊर्जा उपलब्धता ही केवळ पायाभूत सुविधा पुरविण्यापुरती मर्यादित नसून ती आर्थिक परिवर्तनाचा एक प्रमुख चालक घटक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वांसाठी विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा सुनिश्चित करण्याची दोन्ही बाजूंची सामायिक बांधिलकी आहे, जी समावेशक विकासाची पायाभरणी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. ही भागीदारी समावेशक, समताधिष्ठित आणि भविष्याभिमुख दृष्टिकोनाने दिशादर्शित आहे. तिचा उद्देश दीर्घकालीन परिणाम साधणे तसेच भारत आणि आफ्रिका या दोन्ही प्रदेशांतील समुदायांना सक्षम करणे हा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि आफ्रिका आपले सहकार्य अधिक संरचित आणि कृती-केंद्रित भागीदारीच्या माध्यमातून पुढे नेणार आहेत, ज्याचा मुख्य उद्देश ठोस परिणाम साधणे हा आहे, असे या बैठकीतील चर्चांमधून स्पष्ट झाले. हा दृष्टीकोन भविष्याभिमुख असल्याचेही यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.

नवीकरणीय ऊर्जेचा विस्तार, परस्पर संलग्न ग्रिड प्रणालींचा विकास, ऊर्जा साठवण व लवचिकता उपायांचा प्रगतीशील विकास, तसेच संस्थात्मक बळकटीकरणाद्वारे क्षमता वृद्धी या क्षेत्रांमध्ये भारत आणि आफ्रिका एकत्रितपणे सहकार्य करतील, याचा पुनरूच्चार बैठकीत करण्यात आला.
भारताच्या अनुभवाचा आणि आफ्रिकेच्या वाढत्या क्षमतेचा उपयोग करून विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी गुंतवणूक-आधारित सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सार्वजनिक–खासगी भागीदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. या सहकार्याच्या माध्यमातून दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक परिवर्तनाला चालना देणारी समावेशक, समताधिष्ठित आणि भविष्याभिमुख ऊर्जा परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2243365)
आगंतुक पटल : 84