उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नागपूर येथे भारतीय युवा संसदेच्या 29 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला केले संबोधित
Posted On:
21 MAR 2026 1:43PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्रात नागपूर येथील महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित केले. हे अधिवेशन “भारतीय भाषा आणि विकसित भारत – 2047” या संकल्पनेवर आधारित आहे.
नागपूरचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी नमूद केले की 1925 मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थान म्हणून या शहराला राष्ट्रीय चेतनेत महत्त्वाचे स्थान आहे. ते म्हणाले की एका लहान उपक्रमापासून ते राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित एका मोठ्या चळवळीपर्यंतचा संघटनेचा हा प्रवास “राष्ट्र प्रथम” ची भावना आणि राष्ट्राप्रती असलेले समर्पण प्रतिबिंबित करतो.
भारतीय युवा संसद राष्ट्रीय न्यासाच्या दोन दशकांहून अधिक काळातील कार्याची प्रशंसा करताना ते म्हणाले की या संघटनेने विविध प्रदेशांमधील युवकांना जोडण्यात आणि त्याद्वारे 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची भावना अधिक बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
“भारतीय भाषा आणि विकसित भारत – 2047” या संकल्पनेबाबत बोलताना उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की भारताची भाषिक विविधता ही एक मोठी ताकद आहे आणि जेव्हा आपण आपल्या मातृभाषेत बोलतो, तेव्हा आपण “प्रादेशिक” (रिजनल) नव्हे, तर “अस्सल” (ओरिजिनल) असतो. प्रत्येक भाषेला स्वतःचा वारसा असतो आणि त्या सर्व मिळून राष्ट्राचे सांस्कृतिक ऐक्य निर्माण करतात, यावर त्यांनी भर दिला. भारताचे संविधान अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या अलिकडच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की राष्ट्रीय विकासासाठी भाषिक विविधतेला प्रोत्साहन देणे आणि तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
2047 पर्यंत ‘विकसित भारत’चे ध्येय उसन्या विचारांनी साध्य करता येणार नाही, त्यासाठी भारताला आपल्या मुळांपासून नवनिर्मिती करावी लागेल, आपल्या मूळ भाषा आणि लिपींमध्ये विचार करावा लागेल आणि आपल्या सांस्कृतिक अस्मितेवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जावे लागेल, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
संस्कृत आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याच्या कामी केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि नमूद केले की संस्कृत अनेक भारतीय भाषांना जोडते आणि भारताच्या ज्ञान परंपरेचा ती एक महत्त्वाचा भाग आहे.
लोकशाही समाजात संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना, उपराष्ट्रपतींनी राज्यसभेचे सभापती म्हणून आपल्या अनुभवाचा आणि अधिवेशनांच्या वाढत्या उत्पादकतेचा उल्लेख केला. ते म्हणाले की मतभेदांमधून विधायक संवाद घडायला हवा. तोडगा निघायला हवा, संघर्ष होता कामा नये त्यांनी नमूद केले. युवा संसदेसारखी व्यासपीठे आदरयुक्त चर्चा करणे, विविधांगी विचार ऐकून घेणे आणि चर्चा व एकमताने तोडगा काढण्याचे महत्त्व शिकवतात असे ते म्हणाले.
युवा संसद हे जीवन आणि नेतृत्वासाठीचे प्रशिक्षण मैदान आहे असे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की चारित्र्यनिर्मिती हा खऱ्या नेतृत्वाचा पाया आहे. अशा व्यासपीठांचा वापर नेतृत्व, शिस्त व राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की जग भारताकडे पाहत आहे आणि आजची तरुण पिढी ही ‘अमृत पिढी’ आहे, जी 2047 सालापर्यंत भारताला एक पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून उदयास येताना पाहील. युवा संसद या राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी नागपूर येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनमधील आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक कार्यकर्ते कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी, आणि इतर मान्यवरांसह देशभरातून मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243350)
अभ्यागत कक्ष : 34