गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ  (आरआरयु) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अकॅडमी यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा प्रशिक्षण आणि मान्यता अधिक बळकट करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षा उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार (एमओयू)


या धोरणात्मक भागीदारीद्वारे एक औपचारिक चौकट निर्माण करण्यात आली असून, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) हे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अकॅडमीमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना शैक्षणिक मान्यता प्रदान करणार आहे.

या सहकार्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेतील शैक्षणिक संशोधन आणि सीमारेषेवर कार्यरत दलांच्या प्रत्यक्ष, भौतिक गरजांमधील दरी कमी करणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) द्वारे चालविण्यात येणाऱ्या विद्यमान आणि आगामी अभ्यासक्रमांना शैक्षणिक मान्यता प्रदान करणे होय.

उच्च दर्जाच्या व्यावसायिक विकासाची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) आपल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि क्षेत्राधारित कार्यशाळांद्वारे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देणार आहे.

या उपक्रमामुळे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण होण्याची अपेक्षा असून, सीमारेषा निरीक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आव्हानांसाठी तंत्रज्ञानाधारित उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे.

दोन्ही संस्थांच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून, या उपक्रमाचा उद्देश सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी सक्षम आणि मजबूत परिसंस्था निर्माण करणे हा आहे.

Posted On: 21 MAR 2026 11:01AM by PIB Mumbai

 

भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अकॅडमी तसेच तिच्या प्रशिक्षण संस्थांनी विशेष सुरक्षा अभ्यासक्रमांना संलग्नता व शैक्षणिक मान्यता देण्यासाठी आज अधिकृतपणे सामंजस्य करार (एमओयू) केला. या करारावर स्वाक्षरी सोहळा दिल्ली येथील एसएसबी मुख्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला आरआरयु चे प्र-उपकुलगुरू प्रा. (डॉ.) कल्पेश एच. वांद्रा, संलग्नता व मान्यता विभागाचे डीन अविनाश खरेल तसेच एसएसबी चे महासंचालक संजय सिंघल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या धोरणात्मक भागीदारीद्वारे एक औपचारिक चौकट निर्माण करण्यात आली असून, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा असलेले राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) हे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अकॅडमीमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना शैक्षणिक मान्यता प्रदान करणार आहे.या कराराच्या अटींनुसार, दोन्ही संस्थांनी प्राध्यापकांचे कौशल्य, अध्यापन साधने आणि विशेष प्रशिक्षण सुविधा यांसह विविध संसाधनांच्या व्यापक देवाणघेवाणीला वचनबद्धता दर्शविली आहे.या सहकार्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेतील शैक्षणिक संशोधन आणि सीमारेषेवर कार्यरत दलांच्या प्रत्यक्ष, भौतिक गरजांमधील दरी कमी करणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान प्रा. (डॉ.) कल्पेश एच. वांद्रा यांनी सांगितले की, हे सहकार्य आधीपासूनच सकारात्मक परिणाम देत असून, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) ने अलीकडेच सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अधिकाऱ्यांसाठी “स्मार्ट बॉर्डर मॅनेजमेंट” या विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे.उच्च दर्जाच्या व्यावसायिक विकासाची खात्री करण्यासाठी आरआरयु आपल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि क्षेत्राधारित कार्यशाळांद्वारे एसएसबी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देणार आहे.या उपक्रमामुळे एसएसबी च्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण होण्याची अपेक्षा असून, सीमारेषा निरीक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आव्हानांसाठी तंत्रज्ञानाधारित उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे.

संजय सिंघल, सशस्त्र सीमा बल (एसएसबी) चे महासंचालक, यांनी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त करताना सांगितले की, दलासाठी आवश्यक शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आरआरयुमहत्त्वाची भूमिका बजावेल.त्यांनी पुढे नमूद केले की, बदलत्या सीमाव्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा परिस्थितीनुसार अधिकाऱ्यांचे “अपस्किलिंग आणि रिस्किलिंग” यावर या भागीदारीत विशेष भर दिला जाईल.दोन्ही संस्थांच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून, या उपक्रमाचा उद्देश सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी सक्षम आणि मजबूत परिसंस्था निर्माण करणे हा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि पोलीसिंग क्षेत्रासाठी अग्रगण्य शैक्षणिक व संशोधन परिसंस्था म्हणून कार्य करणे होय. जागतिक स्तरावरील तज्ज्ञांच्या नेटवर्कचा उपयोग करून, शिस्तबद्ध चौकटीत विशेष व्यावसायिक शिक्षण देणे हे याचे ध्येय आहे.

या सामंजस्य करारानुसार, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) हे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) द्वारे राबविण्यात येणाऱ्या विद्यमान आणि भविष्यातील अभ्यासक्रमांना शैक्षणिक मान्यता प्रदान करणार आहे. आरआरयुच्या संयुक्त मान्यता व प्रमाणपत्र मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या अभ्यासक्रमांमुळे प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदव्युत्तर डिप्लोमा, अॅडव्हान्स्ड डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी प्रदान होण्याची शक्यता आहे.

या भागीदारीत अंमलबजावणीसाठी एक सुसूत्र चौकट निश्चित करण्यात आली आहे —

• अभ्यासक्रम मूल्यांकन: राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) हे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या प्रशिक्षण केंद्रांमधील विद्यमान अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करून प्रशिक्षण तास आणि विषयवस्तू यांची शैक्षणिक क्रेडिट्सशी समतुल्यता निश्चित करेल.

• अभ्यासक्रम उन्नतीकरण: विशिष्ट पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी आवश्यक “अतिरिक्त क्रेडिट्स” पूर्ण करण्यासाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे नवीन अभ्यासक्रम सामग्री आणि अभ्यासक्रम (सिलॅबस) विकसित करतील.

• मानकीकृत मूल्यमापन: प्रत्येक मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी सशक्त मूल्यांकन प्रक्रिया आणि गुणांकन प्रणाली विकसित केली जाईल, ज्यामुळे आरआरयुच्या नियमांनुसार उच्च दर्जा कायम राखला जाईल.

उच्च दर्जाच्या अध्यापन गुणवत्तेची खात्री करण्यासाठी या भागीदारीत विद्यमान तसेच नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे नियमित परीक्षण आणि प्रमाणीकरण (व्हेटिंग व व्हॅलिडेशन) अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे अभ्यासक्रम सतत अद्ययावत राहून बदलत्या सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकतील.

तसेच, या कराराअंतर्गत सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अकॅडमीमध्ये राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयु) चे एक विशेष ‘डेस्क’ स्थापन करण्यात येणार आहे. हा प्रशासकीय केंद्र डेटा व्यवस्थापन, दैनंदिन संवाद सुलभ करणे आणि मान्यता प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी यावर देखरेख ठेवेल, ज्यामुळे विद्यापीठ आणि अर्धसैनिक दल यांच्यात सुसंवाद आणि समन्वय सुनिश्चित होईल.

हे सहकार्य गृह मंत्रालयाच्या “इंटिग्रेटेड ट्रेनिंग” संकल्पनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, सैद्धांतिक संशोधन आणि प्रत्यक्ष सीमाव्यवस्थापन यामधील दरी कमी करण्यास मदत करणार आहे. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कठोर प्रशिक्षणाला औपचारिक शैक्षणिक मान्यता मिळाल्यामुळे त्यांच्या करिअर प्रगतीच्या संधी वाढतील आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत शैक्षणिक ओळख मिळेल.

अग्रगण्य अंतर्गत सुरक्षा विद्यापीठ आणि सीमारेषेवर कार्यरत दल यांच्यातील ही समन्वयात्मक भागीदारी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक व्यावसायिक बनविण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क (एनसीआरएफ ) शी प्रशिक्षण संलग्न केल्यामुळे सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे योगदान औपचारिक शैक्षणिक यशात प्रतिबिंबित होणार आहे.

***

 अंबादास यादव/हेमांगी केणेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243295) अभ्यागत कक्ष : 18