आयुष मंत्रालय
विमानप्रवासात तंदुरुस्त राहा: विमान प्रवाशांसाठी आयुष मंत्रालयाने सादर केली स्मार्ट योगा दिनचर्या
Posted On:
20 MAR 2026 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
जमिनीपासून 35,000 फूट उंचीवर, वेळ जणू मंदावते—अन शरीरही तसेच मंदावते. एका मर्यादित जागेत तासन्तास बसल्याने अगदी अनुभवी प्रवाशालाही अंग आखडल्यासारखे, थकल्यासारखे आणि मानसिक ताण जाणवू शकतो. आधुनिक प्रवासातील या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, एक सोपा पण प्रभावी उपाय आता उपलब्ध झाला आहे: हवाई प्रवाशांसाठी योग—विमान प्रवासात तंदुरुस्तीसाठी विचारपूर्वक तयार केलेली 5 मिनिटांचा प्रोटोकॉल.
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग महोत्सव 2026 दरम्यान सुरू करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम, योगाचे कालातीत ज्ञान विमान प्रवासादरम्यान वापरात आणतो आणि विमानातील तुमच्या आसनालाच पुनरुज्जीवनाच्या स्थानात रूपांतरित करतो. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने विकसित केलेला हा प्रोटोकॉल आजकाल वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आला असून तो विमानात असताना ताजेतवाने राहण्याचा एक जलद, सुरक्षित आणि प्रभावी मार्ग प्रदान करतो.

या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली, “योग हे प्रतिबंधात्मक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी एक शक्तिशाली साधन आहे. हा विमानातील योग प्रोटोकॉल प्रत्येक परिस्थितीत—अगदी 35,000 फूट उंचीवरसुद्धा योग सुलभ करुन प्रत्येक व्यक्तीला प्रवासादरम्यान सक्रिय, शांत आणि संतुलित राहण्यास मदत करतो.”
विमानप्रवासादरम्यान योग का महत्त्वाचा आहे
विमान प्रवास, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात, अनेकदा बराच वेळ एकाच जागी थांबावे लागते. यामुळे स्नायू आखडणे, रक्ताभिसरण कमी होणे, थकवा, जेट लॅग आणि काही प्रकरणांमध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) सारख्या अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हा 5-मिनिटांचा योग प्रोटोकॉल सौम्य हालचाली, सजग श्वासोच्छ्वास आणि अल्पकालीन ध्यानाच्या माध्यमातून या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करतो, परिणामी शरीर आणि मन या दोन्हींमध्ये संतुलन पुनर्संचयित होण्यास मदत होते.
आपल्या जागेवरच करता येणारी एक आरोग्यदायी दिनचर्या
ही एक सोयीस्कर आणि सहज करता येण्याजोगी पद्धत आहे. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही आणि ती बसूनच करता येते. यात शारीरिक हालचाल, श्वासाविषयी जागरूकता आणि मानसिक विश्रांती यांचा सुरेख संगम साधला आहे:
- स्वतःला स्थिर करणे (15 सेकंद): स्वतःला शांत करण्यासाठी काही क्षण शांत राहणे किंवा एकाग्रतेचा संकल्प करणे
- सांध्यांच्या सौम्य हालचाली (45 सेकंद): रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि ताठरपणा कमी करण्यासाठी खांदे फिरवणे, घोट्याला ताण देणे आणि साध्या हालचाली.
- बसून केली जाणारी योगासने: ताण कमी करण्यासाठी आणि शरीराची ठेवण सुधारण्यासाठी ताडासन (ताडवृक्षासन), बसून मार्जार-गो आसन, पाठीला पीळ देणे आणि पायांच्या सौम्य हालचाली यांसारखी सुधारित आसने.
- प्राणायाम (श्वासोच्छ्वासाचे व्यायाम): चेतासंस्थेला शांत करण्यासाठी आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यासाठी दीर्घ श्वास, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि शीतली.
- ध्यान (30 सेकंद): मनाला ताजेतवाने करण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी एक क्षणभराचा विराम.
छोटा सराव, मोठा परिणाम
केवळ पाच मिनिटांत, हा प्रोटोकॉल खालील गोष्टी साध्य करू शकतो:
- रक्ताभिसरण सुधारते
- स्नायूंचा ताठरपणा आणि थकवा कमी करतो
- तणाव आणि चिंता कमी होते
- उत्तम पचनक्रिया आणि शरीरातील पाण्याच्या प्रमाणाबद्दल जागरूकता वाढते
- जेट लॅग व्यवस्थापित करण्यास मदत मिळते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे प्रवाशांना विमानप्रवासातही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम करते.
उत्तम प्रवास करा. शांत श्वास घ्या. संतुलित राहा.


* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242934)
अभ्यागत कक्ष : 112