कृषी मंत्रालय
200 कोटी रुपयांचे "बनाना क्लस्टर": कृषी क्षेत्रातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठे पाऊल - केंद्रीय कृषी मंत्री
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे शेतकऱ्यांना आवाहन
Posted On:
19 MAR 2026 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांशी अनौपचारिक संवाद साधला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच कृषी संबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. खानदेशची भूमी असलेले जळगाव, 'सुवर्ण नगरी' आणि 'केळीचे शहर' म्हणून ओळखले जाते आणि देशाच्या फलोत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
जळगावमध्ये दीर्घकाळ प्रस्तावित असलेल्या ‘बनाना क्लस्टर’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, 200 कोटी रुपये खर्चासह तो विकसित केला जात आहे, असं चौहान यांनी सांगितलं. या क्लस्टर अंतर्गत सर्वोत्तम कृषी पद्धती, यांत्रिकीकरण, जैविक नियंत्रण, फळ आच्छादने आणि पूर्व-शीतकरण यांसारख्या सुविधा विकसित केल्या जातील. त्याचबरोबर शीतगृह, फळे पिकवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, रेफ्रिजरेटेड व्हॅन, प्रक्रिया आणि निर्यातीशी संबंधित पायाभूत सुविधाही विकसित केल्या जातील. एमआयडीएच आणि कृषी पायाभूत निधी अंतर्गत या सुविधांसाठी अनुदान दिले जाईल, ज्याचा शेतकऱ्यांना थेट लाभ होईल.
शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव आणि शहरांमधील चढे दर यांमधील प्रचंड तफावतीबद्दल चिंता व्यक्त करत चौहान म्हणाले, की अनेकदा शेतकऱ्यांना टोमॅटोसारखी उत्पादने अतिशय कमी दरात विकावी लागतात, तर तेच उत्पादन शहरांमध्ये कित्येक पटींनी जास्त भावाने विकले जाते. केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे ही दरातील तफावत कमी करण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करतील, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळू शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
केळीसारखी पिके किमान हमीभावाने खरेदी करून दीर्घकाळ साठवता येत नाहीत, त्यामुळे सरकार अशा एका पर्यायी मॉडेलचा विचार करत आहे, ज्यामध्ये बाजारभाव खूप कमी असल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्च किंवा निर्धारित मॉडेल मूल्य आणि बाजारभाव यातील फरक देता येऊ शकेल, असं त्यांनी सांगितलं. मिरची आणि आंबा यांसारख्या पिकांमध्ये असे प्रयोग करण्यात आले आहेत आणि 'पीएम-आशा' योजनेअंतर्गत नवीन मॉडेलदेखील विकसित केले जात असल्याची माहितीही चौहान यांनी दिली.
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत चौहान म्हणाले की, यामुळे सेंद्रिय कार्बनचा ऱ्हास होत आहे, उपयुक्त कीटकांचा नाश होत आहे आणि जमिनीची सुपीकता कमी होत आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आणि छोट्या प्रमाणावरील प्रयोगांपासून सुरुवात करण्याचे आवाहन केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास उत्पादन घटत नाही, उलट जमिनीची क्षमता आणि उत्पादकता वाढते.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांकडून मिळालेल्या सूचना आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यापक आराखडा तयार केला जाईल आणि जळगावच्या केळ्यांना जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्वाचा उल्लेख करत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व समृद्ध बनवण्याप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
राधिका अघोर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242757)
अभ्यागत कक्ष : 18