रसायन आणि खते मंत्रालय
सरकारने गॅस पुरवठा वाढवला: युरिया उत्पादन 23% ने वाढले
खरीप हंगाम 2026 सुरक्षित: भारतीय शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी खत आयातीत वैविध्य
मार्च अखेरपर्यंत भारतीय गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा साठा असेल
Posted On:
19 MAR 2026 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर,केंद्र सरकारने खरीप हंगाम 2026 साठी खतांची उपलब्धता स्थिर करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एक बहुआयामी धोरण यशस्वीरित्या राबवले आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ आणि प्रगत जागतिक खरेदी धोरणाच्या माध्यमातून, खते विभागाने भारतीय शेतकऱ्यांचे जागतिक पुरवठा साखळीतील अस्थिरतेपासून संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जागतिक निविदेद्वारे गॅस पुरवठा
केंद्र सरकारने नैसर्गिक वायूसाठी ईपीएमसी (सक्षम साठा व्यवस्थापन समिती) बोली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यामुळे देशात अधिक युरिया उपलब्ध होणार आहे. स्पॉट खरेदीच्या माध्यमातून अतिरिक्त 7.31 एमएमएससीएमडी (Million Metric Standard Cubic Meters per Day) गॅस मिळवल्यामुळे, युरिया प्रकल्पांना होणारा एकूण पुरवठा 23% ने (32 एमएमएससीएमडी वरून 39.31 एमएमएससीएमडी पर्यंत) वाढला आहे.
या तांत्रिक हस्तक्षेपाचे तात्काळ परिणाम दिसून येणार आहेत: देशांतर्गत युरिया उत्पादन जवळपास 23 टक्क्याने म्हणजेच 54,500 मेट्रिक टन प्रति दिन वरून वाढून 67,000 मेट्रिक टन प्रति दिन पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
साठ्याची समाधानकारक स्थिती
सरकारच्या सक्रिय भूमिकेला सध्याच्या साठ्याच्या पातळीतून आणखी दुजोरा मिळतो. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत साठ्याची लक्षणीयरीत्या मजबूत स्थिती आहे. एकूण युरियाचा साठा सध्या 61.14 लाख मेट्रिक टन आहे, जो मार्च 2025 मध्ये 55.22 लाख मेट्रिक टन होता. विशेष म्हणजे डीएपीचा साठा दुप्पटीहून अधिक वाढून 24.24 लाख मेट्रिक टन झाला आहे, ज्यामुळे आगामी पेरणी हंगामासाठी एक भक्कम आधार मिळाला आहे.
* * *
राधिका अघोर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242735)
अभ्यागत कक्ष : 19