आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

योग महोत्सव - 2026


आंतरराष्ट्रीय योग दिन हा आरोग्य विषयक कल्याणाचा एक जागतिक महोत्सव बनला आहे : केंद्रीय आयुष मंत्री

केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते नवीन योग प्रोटोकॉल अर्थात योग साधनेच्या  मानक नियमावलीचे प्रकाशन

योग महोत्सव-2026 च्या प्रारंभाने या वर्षी साजरा होणार असलेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वीच्या 100 दिवसांच्या उलटगणतीला सुरुवात

Posted On: 13 MAR 2026 6:24PM by PIB Mumbai


केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली इथे आयोजित योग महोत्सव-2026 चे उद्घाटन केले. या वर्षी साजरा होणार असलेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वीच्या 100 दिवसांच्या उलटगणतीची सुरुवात म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. यावेळी राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विविध वयोगटातील व्यक्ती आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन आखण्यात आलेल्या असंर्गजन्य रोगांसाठी आणि लक्ष्यित गटांसाठीच्या 10 योग प्रोटोकॉल अर्थात योग साधनेची मानक नियमावलीही प्रकाशित केली. 
या योग महोत्सव-2026 च्या प्रारंभाने या वर्षी साजरा होणार असलेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वीच्या 100 दिवसांच्या उलटगणतीची औपचारिक सुरुवात झाली. योगसाधनेच्या विविधांगी पैलू विषयक प्रचार प्रसार करणे आणि आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जागतिक चळवळीला प्रेरणा देणे हा यामागचा उद्देश आहे.
यावेळी राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेल्या 11 वर्षांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी  नेतृत्वाखाली, आंतरराष्ट्रीय योग दिन हा आरोग्यविषयक कल्याणाचा एक जागतिक महोत्सव बनला असल्याचे ते म्हणाले. योग साधना म्हणजे केवळ जीवनशैलीअंतर्गतची एक पद्धत नाही, तर योगसाधना म्हणजे  मानसिक पातळीवरील स्पष्टता, शारीरिक आरोग्य आणि भावनिक संतुलनात वृद्धी घडवून आणणारी एक सामर्थ्यशील ज्ञानशाखा असल्याचे ते म्हणाले. योगसाधनेमुळे मिळणारा लाभांमुळे कोरोना साथरोगासारख्या आव्हानात्मक काळातही कोट्यवधी लोकांना लवचिकता आणि आणि आरोग्यविषयक कल्याण राखण्यात मोठी मदत झाली असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय आयुष मंत्र्यांनी 10 योग मानक नियमावली   जाहीर केली. ही नियमावली असंसर्गजन्य आजारांसाठी (जसे मधुमेह, हृदयविकार), वेगवेगळ्या गटांसाठी,  वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि विविध टप्प्यांसाठी तयार केलेली आहे. लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, शरीर आणि मनाची ताकद वाढवावी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारावी यासाठीची ही तत्त्वे आहेत.
मंत्र्यांनी हवाई प्रवासासाठी योग ही मानक नियमावलीही  जारी केली. हा 5 मिनिटांचा कार्यक्रम आहे. यात बसून करता येणारा योगाभ्यास, श्वसन क्रिया आणि थोडे ध्यान समाविष्ट आहे. तज्ञांनी तयार केलेला हा कार्यक्रम प्रवासातील ताण कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे, स्नायूंचा त्रास कमी करणे आणि मानसिक शांतता मिळवणे यासाठी आहे.
कार्यक्रमात सौरभ बोथरा यांनी 1800-315-7008 हा टोलमुक्त क्रमांक दिला. या क्रमांकावरून योग 365 अभियाना साठी ऑनलाइन नोंदणी करता येईल.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी योगाचा प्रसार करण्यासाठी अनेक डिजिटल उपक्रमांची माहिती दिली.
दिवसाची सुरुवात सकाळी 7 वाजता मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेत झाली. सामान्य योग  प्रोटोकॉल  (सीवायपी) प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. या उपक्रमात 1000 पेक्षा जास्त योगप्रेमी सहभागी झाले. लवचिकता, ताकद, संतुलन आणि मन:शांती वाढवणारी आसने प्राणायाम आणि ध्यान यांचा त्यात समावेश होता.
योग महोत्सव–2026 हा एक दिवसाचा कार्यक्रम होता. यात 3 विषयांवर सत्रे झाली:
वृद्धांसाठी योग
योगावर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या योजना, मार्गदर्शक तत्त्वे आणि व्यवहार्य उपाय
योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
या कार्यक्रमात योगगुरू, विद्वान, धोरणकर्ते, अधिकारी, व्यावसायिक, योग साधक आणि संबंधित विज्ञानातील तज्ञ असे सुमारे 1500 जण सहभागी झाले.

 

***
 

निलिमा चितळे/तुषार पवार/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2240011) अभ्यागत कक्ष : 6