वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योगांना भारत-ईएफटीए टीईपीए चा लाभ घेण्याचे केले आवाहन; 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची एफडीआयची वचनबद्धता आणि 10 लाख रोजगारांची क्षमता केली अधोरेखित
भारताच्या व्यापार करारांमध्ये दुग्धव्यवसायासारख्या संवेदनशील क्षेत्रांना संरक्षण; जीएम उत्पादनांसाठी कोणत्याही सवलती नाहीत: पियुष गोयल
Posted On:
13 MAR 2026 5:44PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज उद्योग क्षेत्रातील नेत्यांना भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यातील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीईपीए) अंतर्गत निर्माण झालेल्या संधींचा पूर्णपणे लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ईएफटीए मधील चार राष्ट्रांकडून 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या कायदेशीररित्या बंधनकारक परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) वचनबद्धता मिळाल्याचे आणि भारतात 10 लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित केले.
नवी दिल्ली येथे असोचॅम तर्फे आयोजित भारत–भारत-ईएफटीए टीईपीए कराराच्या स्वाक्षरीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित स्मरणीय सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना गोयल यांनी या कराराला ऐतिहासिक क्षण आणि युरोपशी भारताच्या आर्थिक सहभागातील महत्त्वाचा टप्पा असे वर्णन केले.
गोयल यांनी नमूद केले की भारत-ईएफटीए टीईपीए हा युरोपसोबत भारताच्या घनिष्ट आर्थिक संबंधाची सुरुवात आहे. ईएफटीए करार पूर्ण झाल्यानंतर, भारताने युनायटेड किंग्डमसोबत करार यशस्वीरित्या पूर्ण केला आणि त्यानंतर 27 देशांच्या युरोपियन युनियनसोबत व्यापार करार अंतिम केला, असेही ते म्हणाले. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या कराराला "सर्व करारांची जननी" असे संबोधले होते.
मंत्र्यांनी उद्योग संघटनांना “डीलपासून डिलिव्हरीकडे” या संक्रमणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की व्यापार करारांचा खरा अर्थ तेव्हा सिद्ध होतो जेव्हा ते व्यापार वाढ, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवतात.
गोयल यांनी स्वित्झर्लंड, नॉर्वे, लिकटेंस्टीन आणि आइसलँडकडून मिळालेल्या 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूक वचनबद्धतेवर भर दिला आणि जागतिक व्यापार वाटाघाटींमध्ये ही एक अभूतपूर्व कामगिरी असल्याचे वर्णन केले.
या गुंतवणुकीमध्ये भारतातील परिसंस्थेत 10 लाख रोजगार निर्मितीचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले..
त्याचवेळी मंत्र्यांनी स्पष्ट केले की मुक्त व्यापार करार (एफटीए) करताना सरकारने भारतातील संवेदनशील क्षेत्रांचे काळजीपूर्वक संरक्षण केले आहे. कृषी आणि इतर संवेदनशील उद्योगांना कोणतीही हानी होऊ नये म्हणून आवश्यक ते संरक्षण दिले आहे आणि अशा सवलती देण्यात आल्या नाहीत जिथे त्यांचा देशांतर्गत भागधारकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल.
त्यांनी पुढे सांगितले की सर्व व्यापार करारांमध्ये सरकारने शेतकरी, मच्छीमार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या हितांचे सातत्याने संरक्षण केले आहे. दुग्ध व्यवसायासारखी संवेदनशील क्षेत्रे संरक्षित ठेवण्यात आली आहेत आणि जनुकीय बदल केलेल्या (जीएम) उत्पादनांना कोणतीही सवलत किंवा बाजारपेठ प्रवेश दिलेला नाही.
मंत्र्यांनी आसोचॅमला महिल उद्योजक, युवक, शेतकरी, अन्न प्रक्रिया उद्योग, समुद्री अन्न निर्यातदार, समुद्री अन्न प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना या करारामुळे निर्माण झालेल्या संधींशी जोडण्याचे आवाहन केले.
गोयल यांनी व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचाही उल्लेख केला. यात आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, परिचारिका, अभियंते, माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवा क्षेत्रातील व्यावसायिक, ऑडिओव्हिज्युअल सेवा पुरवठादार तसेच शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे.
भारताच्या व्यापार करारांमधून निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेत भारतीय उद्योग अधिक वाढतील, विस्तारतील आणि मोठे यश मिळवतील, असा विश्वास पियुष बोयल यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.
***
नेहा कुलकर्णी / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2239980)
अभ्यागत कक्ष : 8