पंतप्रधान कार्यालय
“सबका साथ, सबका विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष संबोधन
Posted On:
09 MAR 2026 12:00PM by PIB Mumbai
मित्रांनो,
अर्थसंकल्पानंतर आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनार मालिकेतील आजचा हा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा वेबिनार आहे. Fulfilling aspirations of people म्हणजेच जनतेच्या आकांक्षांची पूर्तता हा केवळ चर्चेचा विषय नाही; तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे आणि या सरकारचा संकल्पही आहे. या जनआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती अशी मूलभूत क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या वेबिनारमध्ये आपण या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा करत आहोत. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या क्षेत्रांशी संबंधित सर्व तज्ञ, धोरणनिर्माते, संशोधक, उद्योजक आणि माझे तरुण सहकारी – आपले विचार आणि सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या चौथ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या सत्रात मी आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारत आज प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण आरोग्यसेवा या व्यापक दृष्टिकोनावर काम करत आहे. गेल्या काही वर्षांत देशातील आरोग्य पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्या आहेत. देशातील शेकडो जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. आयुष्मान भारत योजना आणि आरोग्य मंदिरांद्वारे आरोग्यसेवा गावोगावी पोहोचविण्यात आल्या आहेत. आपले योग आणि आयुर्वेद आज संपूर्ण जगात लोकप्रिय होत आहेत. या सर्व विषयांवर आपण या वेबिनारमध्ये चर्चा करालच, परंतु मी एका महत्त्वाच्या विषयाचा विशेष उल्लेख करू इच्छितो — तो म्हणजे केअर इकॉनॉमी. येत्या काही दशकात देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढणार आहे. त्याचबरोबर आज जगातील अनेक देशांमध्ये केअरगिव्हर्सची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात लाखो तरुणांसाठी कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या आरोग्य क्षेत्रातील तज्ञांना मी आवाहन करतो की त्यांनी नवीन प्रशिक्षण मॉडेल्स आणि भागीदारी विकसित करण्याबाबत सूचना द्याव्यात, ज्यामुळे देशातील प्रशिक्षण परिसंस्था अधिक सक्षम होईल.
मित्रांनो,
याच्याशी संबंधित दुसरा विषय म्हणजे टेली-मेडिसिन. आज दूरदूरच्या भागातील अनेक लोकही या सुविधेचा लाभ घेत आहेत आणि त्यावरचा विश्वासही वाढत आहे. मात्र मला वाटते की याबाबत जागरूकता आणि वापराची सुलभता अजूनही वाढविण्याची गरज आहे.
मित्रांनो,
गेल्या दशकात देशाच्या विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. आज गाव, कसबे आणि शहरांच्या सीमा ओलांडून भारतातील प्रत्येक तरुण काहीतरी नवीन करण्याची इच्छा बाळगतो; त्याच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. नव्या पिढीचा हा बदललेला दृष्टिकोन देशाची सर्वात मोठी ताकद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचे सर्वात मोठे भांडवल आहे. या क्षमतेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था सतत आधुनिक आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाने यासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था तयार केली आहे. आता अत्यंत गरजेचे आहे की आपले अभ्यासक्रम बाजारपेठेच्या गरजांनुसार अद्ययावत असावेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेला वास्तविक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डिजिटल इकॉनॉमी आणि डिझाइन-आधारित उत्पादन अशा विषयांवर आपल्याला अधिक भर द्यावा लागेल.
मित्रांनो,
देशात शिक्षणाला रोजगार आणि उद्योजकतेशी जोडण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युनिव्हर्सिटी टाउनशिप सारख्या नव्या मॉडेल्समध्ये या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसून येते. आज भारत ए. व्ही. जी. सी म्हणजेच ॲनिमेशन व्हिडिओ गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. भारत नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. आज या वेबिनारमध्ये देशातील अनेक शिक्षणतज्ञ आणि शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. मी आपणास आवाहन करतो की या वेबिनारमध्ये आपल्या कॅम्पसला उद्योग सहकार्य आणि संशोधनाधारित शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत गंभीर चर्चा करावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगाचा अनुभव मिळेल आणि देशातील कौशल्य परिसंस्था अधिक मजबूत होईल.
मित्रांनो,
एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे STEM, म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित. या क्षेत्रांमध्ये, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशात स्टेममध्ये रुची असलेल्या मुलींची संख्या सातत्यानं वाढत आहे. सध्या आपण भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार होत असताना, कोणतीही मुलगी केवळ संधी नाही म्हणून थांबणार नाही, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. वेबिनारमध्ये आपण या अनुषंगानं अवश्य चर्चा केली पाहिजे. आपण महिलांचा सहभाग वाढवण्यावर आणखी भर देणं आवश्यक आहे. आपण संशोधनाची अशी परिसंस्था तयार केली पाहिजे, जिथे तरुण संशोधकांना प्रयोग करण्याची आणि नव्या कल्पनांवर काम करण्याची पुरेपूर संधी मिळेल.
मित्रांनो,
युवा शक्ती तेव्हाच राष्ट्रीय शक्ती बनते जेव्हा ती सशक्त असेल, तिच्यामध्ये शिस्तही असेल आणि तिच्यात पूर्णपणे आत्मविश्वास असेल. म्हणूनच गेल्या काही वर्षात खेळांकडे राष्ट्रीय विकासाचा महत्त्वाचा भाग या स्वरुपात पाहिलं गेलं आहे. खेलो इंडिया सारख्या उपक्रमांनी देशात क्रीडा परिसंस्थेला नवी ऊर्जा दिली आहे. देशभर क्रीडाविषयक पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. या वेबिनारमध्ये आपण सर्वांनी काही प्रश्नांवर अवश्य विचारमंथन करावं. म्हणजे उदाहरणार्थ, छोट्या-छोट्या भागातील प्रतिभावंत ओळखणं अधिक नेमकेपणानं कसं करता येईल, हजारो खेळाडूंना रचनात्मक आर्थिक पाठबळ कसं सुधारता येऊ शकेल, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या क्रीडा संस्था अधिक व्यावसायिक कशा बनविता येऊ शकतील? येत्या काही वर्षात देशामध्ये राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा होणार आहेत, देश ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी जोरात प्रयत्न करत आहे, अशा स्थितीत आपण लहान वयात असतानाच तरुण खेळाडूंना हेरून त्यांची घडण केली पाहिजे, तरच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला आपली विजयपताका फडकवता येऊ शकेल .
मित्रांनो,
पर्यटन आणि संस्कृती, रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करण्यात मोठी भूमिका बजावतात. एखाद्या ठिकाणी जेव्हा पर्यटनाचे प्रमाण वाढते, तेव्हा ते स्थळ किंवा त्या शहराच्या ब्रँडिंगमध्येही वाढ होते. यामुळे त्या शहराचा सर्वांगीण विकासही खूप वेगाने होतो. भारतात अशा ऐतिहासिक स्थळांची अजिबात कमतरता नाही. तरीपण दीर्घ काळपर्यंत पर्यटन ठराविक स्थळांपुरतेच मर्यादित राहून गेले. आता आम्ही देशाच्या काना-कोपऱ्यातील पर्यटन स्थळांचा नव्याने विकास करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
मित्रांनो,
आपण सर्वांनी, या वेबिनारमध्ये, भारताची पर्यटन परिसंस्था बळकट करण्यासाठी समग्र दृष्टिकोन अवलंबण्यासंदर्भात अवश्य चर्चा करावी. प्रशिक्षित गाईड्स, आदरातिथ्य कौशल्ये, डिजिटल संपर्क सुविधा, सामुदायिक सहभाग, स्वच्छता आणि याच्याशी संबंधित विषयांवर तुम्ही केलेल्या सूचना खूप मोलाच्या असतील.
मित्रांनो,
जेव्हा संस्था, उद्योग, शिक्षण क्षेत्र एकत्रितपणे काम करतात, तेव्हा परिवर्तनाचा वेग खूप वाढतो. अर्थसंकल्पानंतर एका पाठोपाठ झालेल्या वेबिनारच्या या मालिकेमुळे आगामी काळासाठी निश्चित दिशा मिळेल अशी मला खात्री आहे. अशा प्रयत्नांमुळेच विकसित भारताचा पाया आणखी भक्कम होईल. आणि मित्रांनो, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वेबिनारच्या आयोजनाच्या या परंपरेमुळे विशेषतः अंमलबजावणी करून, या वर्षी लाखोंच्या संख्येने या विषयांशी संबंधित असलेले लोक, ज्यामध्ये तज्ज्ञ आहेत, त्याचे लाभार्थी देखील आहेत, त्या व्यवस्थेशी जोडले गेले आहेत, ही सुखद बाब आहे, म्हणजे एक प्रकारे जे - जे लोक चालक शक्ती आहेत, ते सर्वजण वेबिनारशी अत्यंत सक्रियपणे जोडले गेले. आमचे अधिकारी मला सांगत होते की, अतिशय उत्तम सूचना मांडल्या जात आहेत, खूपच व्यावहारिक सूचना येत आहेत, म्हणजे एका अर्थाने समस्यांवर उपायच नाहीत तर नवी ऊर्जा, नव्या गतीनं पुढे जाण्याचा हुरुपदेखील बघायला मिळत आहे. मी तर म्हणतो की, या वेबिनारचा अनुभव खूपच सुखद आहे. या सर्व वेबिनारमध्ये जे सहभागी झाले आहेत ते सर्व लोक अभिनंदनास पात्र आहेत, धन्यवाद देण्यास पात्र आहेत, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा, खूप-खूप आभार.
नमस्कार.
***
NehaKulkarni / ShraddhaMukhedkar / ManjiriGanoo /DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237360)
अभ्यागत कक्ष : 12