इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
चिप्स टू स्टार्टअप्स (C2S), या मोहिमेअंतर्गत 85,000 सेमीकंडक्टर्स अभियंते प्रशिक्षित करण्याच्या उद्दिष्टाकडे भारताची घोडदौड सुरु
Posted On:
07 MAR 2026 1:39PM by PIB Mumbai
भारत सेमीकंडक्टर मिशन (ISM) च्या चिप्स टू स्टार्टअप्स (C2S) उपक्रमांतर्गत प्रशिक्षण, कौशल्यवर्धन आणि मनुष्यबळ विकास कार्यक्रमाद्वारे प्रतिभा विकासाला प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या उपक्रमाबद्दल, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारताने 85,000 अभियंत्यांना 10 वर्षांत सेमीकंडक्टर आरेखनामध्ये प्रशिक्षण देण्याच्या उद्दिष्टात गेल्या केवळ 4 वर्षात लक्षणीय प्रगती केली आहे.
सायनोप्सिस, कॅडन्स, सीमेन्स, रेनेसास, अँसिस आणि एएमडी या कंपन्यांनी देशभरातील 315 शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन (ईडीए) साधने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. या साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर चिप्स डिझाइन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, आज आसामपासून गुजरातपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. भारताला तांत्रिक क्षमतावर्धन आणि स्वावलंबनाच्या दिशेने नेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
यावेळी वैष्णव यांनी जागतिक उद्योगाच्या गरजांबद्दल माहिती दिली. सेमीकंडक्टर उद्योग सध्या 800-900 अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्याचा असून त्याची वाढ 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी जवळजवळ 20 लाख कुशल तंत्रज्ञांची गरज लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भारतातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे ते म्हणाले.
भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 अंतर्गत, C2S या उपक्रमाची व्याप्ती सध्याच्या 315 शैक्षणिक संस्थांवरून 500 शैक्षणिक संस्थांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे देशातील प्रत्येक राज्यात सेमीकंडक्टर डिझाइन, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि चाचणीमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञांचा एक मोठा व सातत्यपूर्ण पुरवठा करणारा समूह तयार होण्यास मदत होईल.
***
सुषमा काणे/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2236344)
अभ्यागत कक्ष : 73