अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्षेत्रातील भारत -कॅनडा सहकार्य दृढ करण्यासाठी एनआयएफटीईएम -के यांनी कॅनडाच्या सास्काचेवान विद्यापीठाबरोबर केला सामंजस्य करार

Posted On: 03 MAR 2026 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,3 मार्च 2026

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (MoFPI) अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाची संस्था  असलेल्या राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान नवउद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था-कुंडली (NIFTEM-K) ने अन्न विज्ञान क्षेत्रात शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी कॅनडाच्या सास्काचेवान विद्यापीठाबरोबर (USask) एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला.

उच्चस्तरीय सहभागातून कृषी-अन्न क्षेत्रात भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी या भागीदारीचे धोरणात्मक महत्त्व दिसून येते. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत काल जाहीर झालेल्या भारत आणि कॅनडा यांच्या संयुक्त सहकार्याद्वारे ‘पल्स प्रोटीन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा सामंजस्य करार विशेष महत्त्वाचा ठरला आहे. या उपक्रमाचे नेतृत्व भारताकडून एनआयएफटीईएम -के आणि कॅनडाकडून सास्काचेवान विद्यापीठ करणार आहेत.

या पाच वर्षांच्या करारांतर्गत, दोन्ही संस्था अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान, अन्न प्रणाली अर्थशास्त्र आणि व्यवसाय विकास या विषयांमध्ये ऑनलाइन शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी सहकार्य करतील. ही भागीदारी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन देवाणघेवाण कार्यक्रमांना देखील प्रोत्साहन देईल, ज्यामुळे अन्न प्रक्रिया आणि नवोन्मेषातील जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अनुभव आणि ज्ञानविनिमय साधता येईल.

या सामंजस्य करारात संयुक्त संशोधन प्रकल्प, सहयोगी निधी प्रस्ताव सादर करणे तसेच अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानातील एकात्मिक पदवी अभ्यासक्रम विकसित करणे यांचा समावेश आहे. सहभागाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये संयुक्त चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करणे, अल्पकालीन शैक्षणिक देवाणघेवाण, उद्योग-केंद्रित लघु अभ्यासक्रमांचा विकास आणि सहयोगी प्रकल्प नियोजन यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना, दोन्ही संस्थांच्या नेतृत्वाने यावर भर दिला की ही भागीदारी शाश्वत अन्न प्रणालींसाठी नवोन्मेष, क्षमता वृद्धी आणि तंत्रज्ञान आधारित उपाययोजना विकसित करण्यास चालना देईल. गतिमान कृषी-अन्न परिसंस्थांमध्ये कार्यरत असलेल्या दोन आघाडीच्या संस्थांमधील तज्ञांचे संयोजन करून, हे सहकार्य अन्न सुरक्षा वृद्धिंगत करण्यासाठी, अन्न प्रक्रिया मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये संशोधन आधारित औद्योगिक वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे.

हा सामंजस्य करार अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे अन्न तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि व्यवस्थापनात भारताचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याच्या एनआयएफटीईएम-के यांच्या निरंतर प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235188) अभ्यागत कक्ष : 72