इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये एआय आणि महिला सक्षमीकरणावर केसबुकचे प्रकाशन
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि यूएन वीमेन यांचा संयुक्त उपक्रम, महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहयोगातून तयार करण्यात आलेल्या केसबुकमध्ये ग्लोबल साउथमधल्या एआय उपायांचा समावेश
Posted On:
27 FEB 2026 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये 17 फेब्रुवारी रोजी एआय आणि महिला सक्षमीकरणावरील केसचे प्रकाशन करण्यात आले. समावेशक आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगतीसाठी भारताच्या वचनबद्धतेत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियाएआय मिशनच्या माध्यमातून यूएन वीमेन सोबतच्या भागीदारीतून आणि महिला व बाल विकास मंत्रालयाच्या साहाय्याने ही केसबुक विकसित केली आहे. या केसबुकमध्ये ग्लोबल साऊथमधले 23 वास्तविक एआय उपाय आहेत, जे लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरणावर लक्षणीय प्रभाव दर्शवितात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन; महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक; आणि यूएन वीमेन आशिया आणि प्रशांत क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक क्रिस्टीन अरब यांनी संयुक्तपणे हे प्रकाशन केले.

परिषदेत जागतिक दखल
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी जनएआय एक्स्पोमध्ये यूएन वीमेन स्टॉलला भेट दिली आणि या केसबुकची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली. भेटीदरम्यान गुटेरस यांनी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांची सरकारे, यूरोपीय महासंघ, मायक्रॉन, नोकिया आणि हेड हेल्ड हाय फाउंडेशन यांच्या सहकार्याने यूएन वीमेन यांनी राबविलेल्या वेस्टेम प्रकल्पांतर्गत स्टेममध्ये करिअर करणाऱ्या ग्रामीण तरुणींशी संवाद साधला.
तरुणींनी एआयचा उपयोग करून आपण कशी नवीन कौशल्ये आत्मसात करत आहोत, शिक्षण कसे सोपे झाले आहे आणि उदयोन्मुख रोजगाराच्या संधींचा कसा शोध घेत आहोत, हे सांगितले. तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यातील अग्रणी बनण्याच्या दिशेने व्यावहारिक मार्ग यातून प्रतिबिंबित होतात. केसबुकची एक प्रत यूएन वीमेनच्या देश प्रतिनिधी कांता सिंहा यांनी सरचिटणीसांना त्यांच्या भेटीदरम्यान दिली. अवर महासचिव आणि सरचिटणिसांचे तंत्रज्ञानावरील दूत अमनदीप सिंग गिल यांच्या उपस्थितीत सादर केली.

लिंगभाव संवेदनशील एआय नवोपक्रमाचे प्रदर्शन
केसबुकमध्ये 50 हून अधिक देशांमधील 233 सबमिशनमधून कठोर बहु-चरणीय मूल्यांकन प्रक्रियेतून निवलेल्या 23 एआय सोल्यूशन्सचा समावेश आहे, आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि यूएन वीमेनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र मूल्यांकन समितीने वास्तविक-जगातील अवलंब, लिंगभाव समानतेचे मोजता येणारे परिणाम आणि पुराव्यावर आधारित परिणाम, यांवर आधारित या सबमिशनचे मूल्यांकन केले.
वैशिष्ट्यीकृत उपायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- मासिक पाळी आरोग्यसेवेचा समावेश असलेली आरोग्यसेवा
- आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन
- डिजिटल सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिंगभाव आधारित हिंसाचाराला प्रतिबंध
- हवामान सक्षमता आणि शाश्वत शेती
- न्याय आणि कायदेशीर सेवांमध्ये प्रवेश
- शिक्षण आणि कौशल्य विकास
धोरणनिर्माते आणि अभ्यासकांसाठी संसाधने
हे केसबुक धोरणकर्ते, तंत्रज्ञान विकासक, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक व्यापक ज्ञान संसाधन म्हणून काम करते. भारत आणि ग्लोबल साऊथ देशांमधील महिला व मुलींशी संबंधित विविध वास्तवांप्रती एआय प्रणाली उत्तरदायी, नैतिक आणि समावेशक असावी, यासाठीच्या व्यावहारिक पर्यायांवर हे केसबुक प्रकाश टाकते.
हे प्रकाशन भारताच्या लोकशाही एआय प्रसाराच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि इंडियाएआय मिशनच्या सात चक्रांमध्ये (कार्यगटांमध्ये) लिंगभाव संवेदनशील तत्त्वे अंतर्भूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे समर्थन करते.
भागीदारी प्रारूप
केसबुकचा विकास भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांमधील प्रभावी सहकार्याचे उदाहरण आहे :
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय : इंडियाएआय मिशन आराखड्याचे नेतृत्व आणि धोरणात्मक दिशा दिली
- यूएन महिला : जागतिक स्तरावर समन्वय साधला, प्रस्तुत शोधपत्रांच्या मूल्यांकनाचे व्यवस्थापन आणि लिंगभाव आणि एआय या विषयांबाबत तांत्रिक कौशल्य प्रदान केले.
या उपक्रमाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाने साहाय्य केले. लिंगभाव समानतेविषयी काम करणारी ही भारताची प्रमुख संस्था असून लैंगिक संवेदनशीलतेशी संबंधित मूल्यांकन मानकांची सुनिश्चिती ती करते.
हे केसबुक https://impact.indiaai.gov.in/events/released-compendium वरून डाउनलोड करता येईल.
पार्श्वभूमी
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 (16-20 फेब्रुवारी,2026)मध्ये जबाबदार, समावेशक आणि प्रभावी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक नेते, धोरणकर्ते, नवोन्मेषक आणि नागरी समाज यांना एका मंचावर आणण्यात आले. ही शिखर परिषद , डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताचे नेतृत्व यावर आधारित आहे आणि भारताला जागतिक एआय प्रशासन चौकटीचा सह-शिल्पकार म्हणून स्थान देते.
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233801)
अभ्यागत कक्ष : 7