इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

भारत आणि स्वीडन यांच्यात एसआयटीएसी आराखड्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ


इंडियाएआय मिशन आणि बिझनेस स्वीडन यांच्या पुढाकाराने होणार स्वीडन-भारत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉर (एसआयटीएसी) ची स्थापना

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे, व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे तसेच जबाबदार, विस्तारक्षम डिजिटल नवोन्मेषाला चालना देणे हे भागीदारीचे उद्दिष्ट

Posted On: 25 FEB 2026 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

इंडियाएआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या निमित्ताने, इंडियाएआय मिशन आणि बिझनेस स्वीडन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी तसेच भारत आणि स्वीडनमधील व्यापार आणि गुंतवणूक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आशय पत्रावर (SoI) स्वाक्षरी केली.

या आशय पत्राद्वारे वास्तविक जगातील औद्योगिक आणि सामाजिक परिणामांवर भर देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता उपाययोजनांचा विकास, अनुप्रयोग आणि अंमलबजावणीसाठी एक संरचित सहकार्य चौकट उपलब्ध होईल. भारत आणि स्वीडन यांच्यातील दीर्घकालीन भागीदारीवर आधारित हे सहकार्य नवोन्मेष, आर्थिक वाढ आणि शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना संबंधित जोखींमींचा विचार करण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक राष्ट्रीय प्राधान्यांना प्रतिबिंबित करते.

या भागीदारीबद्दल बोलताना इंडियाएआय मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कविता भाटिया म्हणाल्या, “भारत आणि स्वीडन हे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेतील भागीदार नाहीत, तर मूल्य-आधारित, शाश्वत आणि विश्वासार्ह एआय भविष्याचे सह-शिल्पकार आहेत”.

"एसआयटीएसीच्या  माध्यमातून आम्ही आमच्या परिसंस्थांना जोडण्याचा आणि दोन्ही देशांमधील सर्वोत्तम एआय आणि डिजिटेक नवोन्मेष एकत्र आणून नवीन व्यवसाय संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत" असे स्वीडनच्या व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त सोफिया होगमन यांनी सांगितले.

दोन्ही देश संयुक्तपणे स्वीडन-भारत तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कॉरिडॉर (एसआयटीएसी) नावाचा एक समर्पित कार्यक्रम विकसित करतील. दोन्ही देशांमधील सरकारी संस्था, उद्योग भागधारक, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संरचित सहभाग सुलभ करण्यासाठी हा कॉरिडॉर एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.

एसआयटीएसी अंतर्गत, पुढील उपक्रम राबविले घेतील:

  • परिषदा, चर्चासत्रे आणि विषय आधारित कार्यशाळांचे आयोजन
  • भारत आणि स्वीडन यांच्या एआय परिसंस्थेमधील आदानप्रदानास प्रोत्साहन  
  • नवोन्मेष केंद्र आणि उत्कृष्टता केंद्रांना भेटी
  • कंपन्या, गुंतवणूकदार, संशोधक आणि धोरणकर्ते यांच्यातील संवाद
  • संयुक्त नवोन्मेष व्यासपीठे आणि गुंतवणूक कॉरिडॉरसाठी संधींची ओळख
  • प्राधान्य क्षेत्रांमध्ये एआय उपाययोजनांच्या द्विपक्षीय अंमलबजावणीला प्रोत्साहन

या सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था यांना विस्तारक्षम आणि समावेशक एआय उपाय विकसित करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232903) अभ्यागत कक्ष : 6