संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारत रणभूमि दर्शन मोहिमेला झेंडा दाखवून रवाना केले

Posted On: 25 FEB 2026 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकात आज लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारत रणभूमि दर्शन मोहिमेला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी नागरी आणि संरक्षण क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटने या मोहिमेचे नेतृत्व केले. यावेळी लष्करप्रमुखांनी राष्ट्रीय महत्त्व आणि सामरिक व्याप्ती या दृष्टीने या उपक्रमाची प्रशंसा केली. अशा प्रयत्नांमुळे भारताच्या समृद्ध वारशाची जपणूक होण्याबरोबरच, राष्ट्रसेवेचे सर्वोच्च आदर्श उरी बाळगण्याची प्रेरणा विद्यमान पिढीला आणि भावी पिढ्यांना मिळते. या मोहिमेने रणभूमी दर्शन उपक्रमाला प्रोत्साहित केले. भारताच्या सुरक्षाविषयक तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या रणभूमी आणि सीमाक्षेत्रे यांकडे देशाचे लक्ष वेधून घेण्याचा उद्देश यामागे ठेवण्यात आला आहे.

गुजरातमध्ये द्वारका या किनारी नगरातून 03 फेब्रुवारी 2026 या दिवशी सुरु झालेली ही एसयूव्ही मोहीम 3,400 किलोमीटर प्रवास करत, गुजरात आणि राजस्थानमधील- कच्छचे रण आणि थरचे वाळवंट यांसह महत्त्वाच्या रणभूमी आणि अग्रिम क्षेत्रे यांना भेट देत, समारोपासाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्धस्मारकावर पोहोचली. या मार्गात द्वारका, भुज, कच्छचे रण, मुनाबाओ, गडरा, लोंगेवाला, जैसलमेर, बिकानेर,अंबाला आणि नवी दिल्ली या स्थानांचा समावेश होता. सीमावर्ती रस्ते आणि वाटांवरून या मोहिमेने प्रवास केला आणि सीमाक्षेत्रांतील वाहतूक-दळणवळणात सुधारणा झाल्याचे सप्रमाण सिद्ध केले. युद्धसज्जता आणि नागरी उपलब्धता या दोन्हींना पाठबळ देणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याचे यातून अधोरेखित झाले.

या मोहिमेत 35 सदस्यांनी भाग घेतला. यात तोफखाना रेजिमेंटचे तोपची (Gunners), भारतीय नौदलाचे आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान यांचा समावेश होता. सीमांपर्यंत पोहोचण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जो राष्ट्रीय दृष्टिकोन आहे, त्याच्याशी सुसंगत पद्धतीने ही मोहीम आखण्यात आली होती. संपूर्ण प्रवासात या तुकडीने पश्चिमी सीमेलगतच्या रणभूमींवर आणि ठिकठिकाणच्या महत्त्वाच्या युद्धस्मारकांमध्ये देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली अर्पण केली. सीमावर्ती भागांतील वीर नारी, वीरांगना, निवृत्त सैनिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र, विद्यार्थी आणि रहिवासी या साऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी उत्तम संपर्क प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे. प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी नागरी अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक समाजाने व्यक्त केलेल्या जिव्हाळ्यातून आणि आदरातून, सैन्यदले आणि त्यांनी रक्षण केलेले नागरिक यांच्यातील खोलवर रुजलेला बंधच दृग्गोचर झाला.

पहिल्या भारत रणभूमी दर्शन मोहिमेची यशस्वी सांगता म्हणजे, भूतकाळाचा आदर करण्याच्या, वर्तमानात जगण्याच्या आणि भविष्याला प्रेरणा देण्याच्या सशस्त्र दलांच्या मजबूत वचनबद्धतेचा पुरावाच होय. भारताच्या वीरश्रीपूर्ण बलिदानांना सुरक्षित, ऐक्यपूर्ण आणि लवचिक भविष्याच्या आकांक्षेशी जोडण्याचे कार्यही यातून घडले आहे.  

 

* * *

सुषमा काणे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232830) अभ्यागत कक्ष : 10