औषधनिर्मिती विभाग
भारत "जगाची फार्मसी" कडून "जागतिक नवोन्मेष केंद्र" बनण्याच्या दिशेने अग्रेसर - केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा
Posted On:
23 FEB 2026 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2026
'जगाची फार्मसी' म्हणजे जगाला औषधांचा पुरवठा करणारा देश म्हणून दीर्घकाळापासून ओळखला जाणारा भारत, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'जगातील नवोन्मेषक' बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले. आज एका दूरदृश्य संदेशाद्वारे मुंबई येथे आयोजित 11 व्या जागतिक औषध गुणवत्ता शिखर परिषदेला संबोधित करताना मंत्री म्हणाले की, हे परिवर्तन आरोग्य सेवा सुरक्षा, उत्पादन लवचिकता आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेवर भर दिल्यामुळे घडत आहे.

जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रातील भारताचे वाढते नेतृत्व आणि गुणवत्ता, नवोन्मेष आणि आरोग्य सेवा सुरक्षेप्रति देशाची वचनबद्धता अधोरेखित करताना, मंत्र्यांनी नमूद केले की, भारताने केवळ मोठ्या प्रमाणावर औषधांची उपलब्धता करून नव्हे तर गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवोन्मेषाद्वारे देखील जागतिक पुरवठा साखळी मजबूत करायला हवी.
प्रमुख सरकारी उपक्रमांचा संदर्भ देवून मंत्री नड्डा यांनी अधोरेखित केले की, या परिवर्तनाशी भारताची धोरणात्मक चौकट सुसंगत आहे. त्यांनी सांगितले की, 10,000 कोटी रुपये खर्चाची तरतूद बायोफार्मा शक्ती उपक्रमासाठी केली आहे; यामुळे जागतिक स्तरावर भारत ‘बायोफार्मास्युटिकल’ उत्पादन केंद्र म्हणून स्थान निर्माण करेल. यासाठी देशांतर्गत उत्पादन व्यवस्था मजबूत करेल आणि संशोधन क्षमताही वाढवणार आहे. तसेच पीआरआयपी म्हणजेच ‘फार्मा मेडटेक’मध्ये संशोधन आणि नवोपक्रमाविषयी प्रचार योजना नवीन औषधे, प्रगत जेनेरिक औषधे, लस आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये नवोपक्रमांना चालना देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री नड्डा यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाची, विशेषतः कृत्रिम प्रज्ञेच्या जबाबदार वापराची भूमिका देखील अधोरेखित केली, जी भविष्यसूचक निदान, औषध शोधण्याची क्षमता, औषधोपचारासंबंधी देखरेख आणि एकूण गुणवत्ता प्रणाली मजबूत करण्यात उपयोगी आहे. औषध उद्योगातील भागधारकांना आवाहन करताना, त्यांनी केवळ अनुपालन आवश्यकता म्हणून न पाहता गुणवत्तेला मुख्य संघटनात्मक मूल्य म्हणून अंतर्भूत केले पाहिजे, यावर भर दिला. शाश्वत "गुणवत्ता-प्रथम" परिसंस्था तयार करण्यासाठी मानवी संसाधने, प्रणाली आणि पायाभूत सुविधांमध्ये निरंतर गुंतवणूक करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मंत्र्यांनी जागतिक औषधनिर्माण क्षेत्रातले नेतृत्व म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर विश्वासार्ह औषध निर्मिती, नवोपक्रम सहकार्यासह, जबाबदारीने विकास करणे शक्य होईल आणि जागतिक आरोग्यसेवा परिणामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देता येईल असेही नड्डा यावेळी म्हणाले.
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2231901)
अभ्यागत कक्ष : 12