आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि ब्राझील यांनी औषधनिर्माण आणि वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनात सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य कराराची केली देवाणघेवाण

Posted On: 21 FEB 2026 6:57PM by PIB Mumbai

 

औषधनिर्माण आणि वैद्यकीय उत्पादनांच्या नियमन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी भारत आणि ब्राझीलने आज सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आणि ब्राझिलियन हेल्थ रेग्युलेटरी एजन्सी (एएनव्हीएसए) यांच्यात हा सामंजस्य करार झाला असून दोन्ही देशांमधील दृढ नियामक सहकार्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एएनव्हीएसएचे संचालक-अध्यक्ष लिऑंद्रो सफातले आणि ब्राझीलमधील भारताचे राजदूत दिनेश भाटिया यांनी आज हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली.

हा सामंजस्य करार औषधनिर्माण घटक, औषधे, जैविक उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय उत्पादनांच्या क्षेत्रात सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एक संरचित चौकट स्थापित करतो. नियामक पद्धतींमध्ये सुसंगती वाढवणे, नियामक प्रणालींची परस्पर समज वाढवणे तसेच वैद्यकीय उत्पादनांवर प्रभावी आणि समन्वित देखरेख सुलभ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

या सामंजस्य कराराची देवाणघेवाण भारत आणि ब्राझील यांच्यातील लोकांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, सर्वोत्तम नियामक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपाययोजनांना पाठबळ देण्यात देखील या कराराचे योगदान अपेक्षित आहे.

CDSCO आणि ANVISA यांच्यातील सामंजस्य करार आरोग्य क्षेत्रातील व्यापक भारत-ब्राझील सहकार्यावर आधारित असून द्विपक्षीय सहभागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थात्मक यंत्रणांना पूरक आहे. ग्लोबल साऊथ मधील अग्रणी भागीदार म्हणून दोन्ही देशांच्या सामायिक प्राधान्यांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, औषधनिर्माण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही देशांमधील वाढत्या सहकार्याला हा करार अधोरेखित करतो.

या सामंजस्य कराराद्वारे, दोन्ही बाजूंनी त्यांच्या संबंधित राष्ट्रीय कायदे आणि नियमांनुसार माहिती देवाणघेवाण, नियामक क्षमता निर्माण तसेच औषधनिर्माण आणि वैद्यकीय उत्पादन नियमनाशी संबंधित बाबींमध्ये सहकार्य यासारख्या क्षेत्रात जवळून काम करण्याचा आपला हेतू पुन्हा एकदा स्पष्ट केला.

या सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीमुळे भारत-ब्राझील संबंध अधिक मजबूत होतील तसेच आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या सुधारित परिणामांना हातभार लागेल.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231403) अभ्यागत कक्ष : 7