इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

नीलीट अमरावती इथे भारतातील पहिले क्वांटम व एआय समर्पित विद्यापीठ स्थापन करणार


नीलीट व आंध्र प्रदेश सरकारमध्ये सामंजस्य करार

Posted On: 21 FEB 2026 1:01PM by PIB Mumbai

 

भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (मेइट) अखत्यारितील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थेने (नीलिट) आंध्र प्रदेश सरकारसोबत 20 फेब्रुवारी 2026 रोजी  अमरावती इथे भारतातील पहिले क्वांटम व कृत्रिम बुद्धीमत्ता समर्पित विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  

भारतातील डीप टेक तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठीचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या प्रस्तावित आंध्र क्वांटम मोहीमेच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेत खरे उतरेल असे क्वांटम नवोन्मेष संकुल उभारण्याच्या आंध्र प्रदेश सरकारच्या विचारांशी सुसंगत आहे. अमरावती शहर राज्याच्या महत्त्वाकांक्षी क्वांटम व्हॅली उपक्रमाचे केंद्र ठरेल.

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, मेइटचे सचिव एस. कृष्णन, नीलिटचे महासंचालक डॉ. एम. एम. त्रिपाठी आणि अमरावती क्वांटम व्हॅली एपीएसक्यूएमचे अभियान संचालक सी. व्ही श्रीधर यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

नीलिटचे महासंचालक डॉ. एम. एम. त्रिपाठी  याप्रसंगी बोलताना म्हणाले, ही भागीदारी भारताच्या डीप टेक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. नीलिटच्या अखत्यारितील अमरावती क्वांटम व एआय परिसर क्वांटम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि नवोन्मेषाचे राष्ट्रीय केंद्र ठरेल.

अमरावती क्वांटम व्हॅली, एपीएसक्यूएमचे प्रकल्प संचालक सी. व्ही. श्रीधर म्हणाले,

अमरावती क्वांटम व्हॅलीतील नीलिट क्वांटम एआय विद्यापीठ भारताच्या डीप टेक कौशल्यातील नव्या लाटेचा पाया रचेल. क्वांटम विज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि उद्योगांशी सुसंगत कौशल्य यांच्या एकत्रिकरणातून जागतिक स्पर्धेसाठी सज्ज अशी नवोन्मेष परिसंस्था उभी राहील.  

नीलिट ही मेईटच्या अखत्यारितील प्रमुख स्वायत वैज्ञानिक संस्था आहे. भारतात उदयोन्मुख तंत्रज्ञानातील शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, प्रशिक्षण, संशोधन व क्षमता बांधणी यांच्या विकासाचे काम ही संस्था करते. देशभरातल्या 12 मान्यताप्राप्त विद्यापीठांसह नीलिटला डीम्ड टू बी विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. 

या आराखड्याअंतर्गत आगामी अमरावती प्रकल्प विशेष क्वांटम व एआय उद्देशित विद्यापीठ परिसर म्हणून विकसित केला जाईल. तो संशोधनातील आघाडीच्या क्षेत्रांना खास समर्पित असेल. नीलिटच्या डीम्ड टू बी विद्यापीठ परिसंस्थेच्या भक्कम पायावर उभा राहिलेला अमरावती विद्यापीठ परिसर भारतातील पहिल्या संस्थात्मकदृष्ट्या समर्पित शैक्षणिक संकुलाचे प्रतिनिधीत्व करतो. या संस्थेचा भर पूर्णपणे क्वांटम व कृत्रिम बुद्धीमत्तेवर असेल. 

या प्रकल्पात खालील अत्याधुनिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येईल

·       क्वांटम कॉम्प्युटींग व क्वांटम अल्गोरिदम्स

·       कृत्रिम बुद्धीमत्ता व यंत्र विद्या

·       क्वांटम दूरसंवाद व सायबर सुरक्षा

·       क्वांटम हार्डवेअर व सिस्टीम इंजिनिअरिंग

·       उच्च क्षमता संगणन

·       एआय – क्वांटम एकत्रित संशोधन 

विद्यापीठात समाविष्ट अभ्यासक्रम

·       पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी

·       आधुनिक संशोधन प्रयोगशाळा

·       उद्योगांशी निगडीत सर्वोत्कृष्टता केंद्रे

·       डीप टेक इनक्युबेशन आणि उद्योजकता पाठबळ

·       जागतिक शैक्षणिक आणि संशोधन व विकास सहकार्य

या उपक्रमामुळे क्वांटम तंत्रज्ञान व एआयमधील भारताची क्षमता उल्लेखनीयरित्या वाढणे अपेक्षित आहे. हा उपक्रम भारताला आधुनिक नवसंशोधन आणि डीप टेक शिक्षण या क्षेत्रात जगात आघाडीचे स्थान मिळवून देईल. 

नीलिट संस्थेविषयी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची (मेईट) एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. कौशल्य विकास व डिजिटल सक्षमीकरण क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. 

नीलिटच्या 56 केंद्रांच्या माध्यमातून, 750 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त संस्थांद्वारे आणि 9000 पेक्षा जास्त सुविधा केंद्रांमधून संस्थेने लाखो विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले आहे. 

शिक्षण मंत्रालयाकडून नीलिटला विशेष श्रेणीतील डीम्ड टू बी विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्य केंद्र पंजाबमध्ये रोपार इथे असून ऐझवाल, अगरतळा, औरंगाबाद, कालिकत, गोरखपूर, इम्फाळ, इटानगर, अजमेर (केक्री), कोहिमा, पाटणा आणि श्रीनगर येथील अकरा केंद्रांचा उद्देश डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा आहे.  

***

हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231253) अभ्यागत कक्ष : 17