दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये बोलताना दूरसंवाद राज्यमंत्री डॉ.पेम्मासानी चंद्रशेखर यांनी भारताच्या एआय क्रांतीचा पाया म्हणून दूरसंवादाचे महत्त्व केले अधोरेखित

Posted On: 17 FEB 2026 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

दूरसंवाद पायाभूत सुविधा हा भारताच्या एआय परिसंस्थेचा पाया आहे, असे मत केंद्रीय दूरसंवाद आणि  ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.पेम्मासानी चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. "कनेक्टिव्हिटी ही चैन नसून, कनेक्टिव्हीटी हे सार्वभौमत्व आहे", असे सांगत मंत्रिमहोदयांनी असे अधोरेखित केले की- सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हीटी ही भारताच्या तंत्रज्ञानात्मक नेतृत्वाच्या आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या केंद्रस्थानी आहे.

दिल्लीत भारत मंडपम येथे सुरु असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद  2026 मध्ये दूरसंवाद आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलच्या सत्रात बीजभाषण देताना डॉ.पेम्मासानी चंद्रशेखर यांनी भारताची दूरसंवाद क्षेत्रातील वेगवान प्रगती अधोरेखित केली. ब्रॉडबँड ग्राहकांची  संख्या 2014 मध्ये 6 कोटी होती, ती आता 2025 मध्ये 100 कोटी झाली आहे. तर मोबाईल डेटाचा मासिक सरासरी उपभोग आता दरडोई 24 जीबी च्या पुढे गेला आहे. भारतनेट सारख्या उपक्रमांद्वारे सर्वात दुर्गम भागातील सर्वात वंचित व्यक्तीपर्यंत संदेशवहन सुविधा पोहोचवण्यात सातत्याने गुंतवणूक सुरु असून, त्यामुळे एआय-सक्षम सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे, ज्यायोगे उगवत्या तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्याचे  लोकशाहीकरण  करण्यात येत आहे.

मंत्र्यांनी सांगितले की भारत आता कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराकडून क्षमता वाढीकडे संक्रमण करत आहे. यामध्ये उच्च-क्षमतेचे फायबर बॅकहॉल, कमी-विलंब अनुप्रयोगांसाठी एज कंप्यूटिंग, क्लाउड पायाभूत सुविधांचा विस्तार आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील स्टार्टअप्स आणि उद्योग नवोन्मेष करण्यास समर्थ होत जातात. त्यांनी नमूद केले की सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा अवलंब  वेगाने होत आहे, सक्रिय उत्पादन वातावरणात एआय वापरणाऱ्या मोठ्या उद्योगांची संख्या वाढत आहे.

विश्वास आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर यांनी, मजबूत दूरसंवाद सुरक्षा चौकटी, 1,200 हून अधिक संस्थांना जोडणारा एआय-सक्षम डिजिटल प्रतिभा मंच, 86 लाखांहून अधिक फसवे सिम कार्ड ओळखणारे आणि डिस्कनेक्ट करणारे एएसटीआर टूल आणि 1,400 कोटींहून अधिक किमतीचे फसवे व्यवहार रोखणारे वित्तीय फसवणूक जोखीम निदर्शक यावर प्रकाश टाकला. एआय-चालित स्पॅम ओळख आणि फसवणूक प्रतिबंधक प्रणाली सक्रियपणे नागरिकांचे रक्षण करत आहेत आणि डिजिटल विश्वास मजबूत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

जागतिक पातळीवरील भारताच्या स्थानाविषयी, मंत्री म्हणाले की जागतिक स्तरावरील सर्वोच्च एआय परिसंस्थांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे, आणि ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आहे. इंडियाएआय मिशन अंतर्गत आर्थिक वितरण आणि अर्धवाहक उत्पादनातील लक्षणीय गुंतवणूक यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्वयंपूर्ण आणि नाविन्यपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या दीर्घकालीन धोरणाचा हा एक भाग आहे.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. पेम्मासानी म्हणाले की दूरसंचारचा संबंध आता केवळ कॉल  जोडणीपुरता मर्यादित नाही तर संधी जोडण्यासाठीही त्याचे महत्त्व आहे. सर्वसमावेशक, सुरक्षित आणि एआय-सज्ज डिजिटल भविष्य घडवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

दूरसंवाद विभागाने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हे सत्र आयोजित केले. 


निलीमा चितळे/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2229399) अभ्यागत कक्ष : 6