संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल गोव्यातल्या नौदल युद्ध महाविद्यालयात आयोजित करणार गोवा सागरी परिषद 2026

Posted On: 17 FEB 2026 2:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

पाचवी जीएमसी  म्हणजेच गोवा सागरी परिषद, 21 फेब्रुवारी 2026 या दिवशी गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयात भरवली जाणार आहे. भारतीय नौदलाचा हा महत्त्वपूर्ण असा धोरणात्मक उपक्रम असून, त्याला आता हिंदी महासागर क्षेत्रा (आयओआर)तील सागरी सुरक्षाकर्मींच्या सामूहिक बुद्धिमत्ता  आणि कार्यान्वयनाचा अनुभव यांचा परिपोष करणाऱ्या मंचाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समकालीन सागरी आव्हानांवर परिणामकारक आणि व्यावहारिक तोडगे काढण्यासाठी तो उपयुक्त ठरत आहे.

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे या परिषदेचे प्रमुख अतिथी असतील.

बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, केनिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड आणि टांझानिया या 14 देशांचे नौदलप्रमुख, सागरी सेनाप्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी या सर्वांसाठी, भारताचे नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यजमानपद भूषवतील. 'हिंदी महासागर क्षेत्रातील सामायिक सागरी सुरक्षा आव्हाने - अवैध-अनियंत्रित मासेमारी आणि अन्य अवैध सागरी कृतींपासून उद्भवणाऱ्या धोक्यांचा प्रतिकार करण्यासाठीचे प्रयत्न  विस्तारणे'-- अशी यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. हिंदी महासागर क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या सागरी राष्ट्रांमध्ये सहयोग आणि समन्वय साधण्याची महत्त्वाची गरज यातून प्रतिबिंबित होते.

2016 आणि 2017 मध्ये अनुक्रमे गोवा सागरी परिसंवाद  (जीएमएस) ) आणि गोवा सागरी परिषद (जीएमसी) यांची स्थापना करण्यात आली. भारत आणि हिंदी महासागरी प्रदेशातील महत्त्वाच्या देशांमध्ये समन्वयात्मक विचार आणि परस्पर सामंजस्य वाढीस लागावे या उद्देशाने ही स्थापना केली गेली. महासागर (MAHASAGAR-  प्रादेशिक सुरक्षा आणि विकास यांसाठी परस्पर आणि समग्र प्रगती)-- या दृष्टिकोनाशी हे सुसंगत आहे. जीएमसीच्या माध्यमातून, सहकार्याची महत्त्वाची क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि समग्र क्षमता बांधणीसाठी सामायिक मार्गांची आखणी करण्यासाठी सागरी शेजारी देशांशी संपर्क साधला जातो. जीएमसीचे आयोजन द्वैवार्षिक पद्धतीने केले जाते आणि त्यापूर्वी जीएमएसचे आयोजन होते. सहभागी राष्ट्रांमध्ये कार्य-स्तरीय बैठकांच्या माध्यमातून  साहाय्यभूत कार्यक्रम म्हणून ते काम करते.

हिंदी महासागर क्षेत्राला पारंपरिक आणि अपारंपरिक दोन्ही  प्रकारच्या आव्हानांचा  सामना करावा लागत आहे, ज्याचे  प्रादेशिक सुरक्षा आणि उपजीविकेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतात. सागरी दहशतवाद, तस्करी, बेकायदेशीर, अनियमित आणि अप्रमाणित  मासेमारी, चाचेगिरी, सशस्त्र दरोडा आणि अनियमित स्थलांतर यासारख्या धोक्यामुळे सुरक्षित समुद्राच्या उद्दिष्टासमोर अडचणी येत आहेत. हवामान बदल, सायबर धोके आणि छुप्या पद्धतीने होणारी सागरी वाहतूक यासारख्या नवनव्या आव्हानांमुळे हे धोके आणखी वाढतात.

या परिषदेत प्रख्यात वक्ते आणि विषयतज्ज्ञ सागरी माहितीच्या वास्तविक वेळेच्या देवाणघेवाणीवर आणि क्षमता आणि क्षमता बळकट करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतील. माजी नौदलप्रमुख (निवृत्त) अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश हे मुख्य भाषण देतील. हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा आव्हानांवर सहयोगी उपाय तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी गोवा सागरी परिषद हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

निलीमा चितळे/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2229179) अभ्यागत कक्ष : 16