इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डीएलआय योजना समर्थित चिप डिझाइन स्टार्टअप्सकडे आघाडीच्या गुंतवणूकदारांचे सातत्यपूर्ण आकर्षण
पीक XV पार्टनर्सच्या नेतृत्वाखाली C2i सेमीकंडक्टर्सने $15 दशलक्ष सिरीज A उभारले - भारतीय सेमीकंडक्टर स्टार्टअपचा सर्वात मोठा निधीचा टप्पा
C2i ही उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या विश्वासार्ह आधुनिक पॉवर मॅनेजमेंट चीप तयार करण्यावर काम करत आहे
Posted On:
16 FEB 2026 2:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
डीएलआय अर्थात डिझाईन संलग्न अनुदान योजनेचा आधार लाभलेल्या स्टार्टअप्सच्या सहाय्याने भारताचे सेमीकंडक्टर चीप डिझाईन क्षेत्र हे स्थिर गतीने विकसित होत आहे तसेच गुंतवणूकदार आणि वापरकर्त्या समूहाचे लक्ष वेधून घेत आहे. साधारणपणे सेमीकंक्टर व्यवसायाला विकासासाठी जास्त कालावधी, संशोधन आणि विकास यासाठी पुरेशी गुंतवणूक आणि उत्पन सुरु होण्याआधी तंत्रज्ञानाशी संबधित जोखीम या कसोट्या पार कराव्या लागतात आणि 2021च्या आधी भारताची या क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक मर्यादित होती.
भारताची डिझाइन संबधित प्रोत्साहन योजना 2022मध्ये जाहीर झाली. या योजनेने आर्थिक सहाय्य, ईडीए म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन टूल्स चा वापराची उपलब्धता, आयपी कोर याची प्रामुख्याने जाणवणारी आव्हानांचा बोजा या योजनेमुळे हलका झाला.
तंत्रज्ञान आणि औद्योगिक विशेषज्ञ यांच्या प्रभावी तज्ञ समितीकडून होणारी सखोल चाचणी आणि मूल्यमापन प्रकिया तसेच विश्वासार्ह डीप-टेक कंपन्याकडून सहाय्याची खात्री यामुळे स्टार्टअप्सना चांगलेच प्रोत्साहन मिळत गेले. हा संरचनात्मक पाठिंबा गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि बाजारात टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरत गेला. आणि त्यामुळे डीएलआय- योजनेतून आलेल्या स्टार्टअप्सची गुंतवणूकदारांकडून प्रामुख्याने मुल्यमापनासाठी निवड होऊ लागली.
C2i सेमीकंडक्टर्स
ही कंपनी बंगळुरु येथे 5 जून 2024 रोजी स्थापन झाली. स्थापना करणाऱ्यांमध्ये टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, नॅशनल सेमीकंडक्टर आणि मॅक्झिम इंटीग्रेटेड यासारख्या जागतिक स्तरावरच्या मोठ्या कंपन्यांमधला दशकांचा अनुभव घेतलेल्यांचा समावेश आहे. C2i सेमीकंडक्टर्सला कालांतराने 1 नोव्हेंबर 2024 पासून डीएलआय योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य आणि आधुनिक चीप डिझाईन टूल्स वापरासाठी मंजुरी मिळाली.
सेमीकंडक्टर उद्योगातील अनुभवी, याली कॅपिटलचे संस्थापक व्यवस्थापकीय भागीदार गणपती सुब्रमन्यम हे या कंपनीच्या बोर्डवर आहेत. C2i ही भावी काळातील एआय-डेटासेंटर्स आणि क्लाउडसंबधित पायाभूत सुविधा यासाठी पॉवर मॅनेजमेंट सेमीकंडक्टर विकसित करते.
थोड्याच कालावधीत 65 अभियंत्यांचा समावेश असलेला अभियांत्रिकी चमू असलेल्या C2i ची गणना सध्या काही महिन्यातच सेंट्रलाईज्ड आधुनिक चीप डिझाईन टूल्सचा वापर करणाऱ्या अग्रणी तीन कंपन्यांमध्ये होऊ लागली आहे. तिला ChipIn सेंटरचे सेंट्रलाईज्ड ईडीए टूल ग्रीड वापर करण्याची अनुमती मिळाली आहे.
आव्हान — आधुनिक डेटा केंद्रांमध्ये ऊर्जा हा मर्यादित करणारा घटक ठरत आहे:
कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढत असताना आधुनिक डेटासेंटर्सना जास्त आणि खूप स्थिर अश्या ऊर्जा स्रोताची गरज असते. जुन्या पद्धतीच्या उर्जा व्यवस्था या उच्च दर्जाच्या गणनासाठी डिझाइन केलेल्या नसतात त्यामुळे उर्जेचे नुकसान, जास्त उष्मा वापर ही आव्हाने उभी राहतात आणि कायमस्वरुपी जोडणींच्या वाढत्या गरजांच्या दृष्टीने त्या अडचणीच्या ठरतात.
नवोन्मेष - ग्रिड ते कोअर पर्यंत ऊर्जेचा पुनर्विचार
C2i सेमीकंडक्टर्स ‘ग्रिड टू कोअर’ या दृष्टिकोनातून सर्व्हरमध्ये येणाऱ्या वीज स्रोतापासून प्रोसेसर चिपपर्यंत वीज कशी प्रवाहित होते याची पुनर्रचना करत आहे. प्रत्येक स्वतंत्र घटकात सुधारणा करण्यापेक्षा ही कंपनी एक स्मार्ट, स्वतःच्या गरजेनुसार सेट करता येण्याजोगे ऊर्जा व्यासपीठ विकसित करत आहे जे प्रत्यक्ष कालावधीत वीज वितरणाचे स्वयंचलित व्यवस्थापन करते आणि वीज वितरणाची कार्यक्षमता वाढवते. हे तंत्रज्ञान अगदी अवजड कृत्रिम बुद्धिमत्ता वर्कलोड्सना स्थिर ऊर्जा पुरवते, ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा करते, उष्णता आणि बिघाड होण्याचे प्रमाण कमी करते, उपकरणाचे आयुष्य वाढवते, सर्व्हरची रचना सुलभ करते, जलद तैनाती शक्य करते आणि मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटरच्या विस्ताराला समर्थन देते.
सोप्या भाषेत - एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक बुद्धिमान पॉवर ब्रेन
C2i तंत्रज्ञान डेटा केंद्रांसाठी एक बुद्धिमान ऊर्जा नियंत्रण प्रणाली म्हणून कार्य करते तसेच उच्च-कार्यक्षमता असलेल्या एआय सिस्टमना पुढील पिढीच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी विश्वसनीय, कार्यक्षम आणि सतत कार्य करण्यास मदत करते. C2i ला अपेक्षा आहे की त्यांची पहिली सिलिकॉन डिझाइन्स वर्षाच्या मध्यापर्यंत तयार होतील आणि त्यानंतर कंपनी त्यांची कार्यक्षमता पडताळण्याचे काम करेल.
गुंतवणूकदारांचा विश्वास - भारतातील डीप-टेक नावोन्मेषाला पाठिंबा
C2i च्या प्रगत सोल्युशनची क्षमता ओळखून पीक XV पार्टनर्स (पूर्वीचे सेक्वोइया कॅपिटल इंडिया आणि SEA) ने पुढील पिढीच्या, उच्च-घनता आणि अति-विश्वसनीय सिस्टम-स्तरीय वीज वितरण उपायांच्या विकासाला गती देण्यासाठी 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूक राउंडचे नेतृत्व केले. 2024 मध्ये याली कॅपिटलच्या नेतृत्वाखाली 4 दशलक्ष डॉलर्सच्या निधी राउंडनंतर हे साध्य झाले असून त्यामुळे डिझाइन-आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत मिळालेल्या पाठिंब्याव्यतिरिक्त, आजपर्यंत अंदाजे 170 कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक झाली आहे.
पीक XV चे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी सांगितले की C2i चा ऊर्जा व्यवस्थापन दृष्टिकोन ग्राफिक्स प्रक्रिया यंत्रणेचे आयुष्यमान लक्षणीयरीत्या वाढवू शकतो आणि त्यामुळे उद्योगात अब्जावधी डॉलर्सची बचत होऊ शकते.
धोरणात्मक सुसंगती — भारताच्या डिझाइन-केंद्रित सेमीकंडक्टर दृष्टिकोनाला पाठबळ
भारताचा सेमीकंडक्टर कार्यक्रम हा डिझाईन आणि उत्पादकता या दोघांना सक्षम करणारा असून देशांतर्गत बौद्धिक संपदा निर्मिती आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादक कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेल्या दृष्टिकोनाशी अग्रणी गुंतवणूकदार कंपन्यांनी दाखवलेला दृढ विश्वास सुसंगत आहे. भारताकडे आधीच चिप डिझाइन तंत्रज्ञांचा एक मजबूत आधार आहे आणि स्टार्टअप्सना डिझाइनविषयी प्रोत्साहन देणे, प्रगत डिझाइन साधनांचा पुरवठा करणे तसेच बौद्धिक संपत्ती आणि परिसंस्थेचा पाठिंबा प्रदान करणे, ज्यामुळे ते जागतिक तंत्रज्ञान नेत्यांमध्ये रुपांतरित होऊ शकतील आणि भारताला जगासाठी विश्वासार्ह सेमीकंडक्टर भागीदार बनवता येईल अशी सरकारची भूमिका आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
नितीन फुल्लुके/विजया सहजराव/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228641)
अभ्यागत कक्ष : 19