गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाने नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) या 8 स्थानकांसह 11.56 किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गिकेला दिली मान्यता
Posted On:
14 FEB 2026 1:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) या 11.56 किलोमीटर विस्तारित मार्गाला मंजुरी दिली आहे. या मार्गावर 8 उन्नत स्थानके असतील. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नॉयडा आणि ग्रेटर नॉयडा शहरांमध्ये 61.62 किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभे राहील.
फायदे व विकासाला चालना
नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) हा विस्तारित मार्ग शहराच्या पायाभूत सुविधा विकासातील सुधारणांचे प्रतिनिधित्व करतो. हा प्रकल्प शहरातील मेट्रो रेल्वे जाळ्याचा महत्त्वाचा विस्तारित मार्ग आहे.
सुधारित संपर्कव्यवस्था
नॉयडा मेट्रो प्रकल्पातील नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) हा विस्तारित मार्ग सुमारे 11.56 किलोमीटर लांबीचा आहे. नॉयडा शहरात सध्या कार्यक्षम दळणवळण व्यवस्था अस्तित्वात नाही. या विस्तारित मार्गामुळे नॉयडा शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच यामुळे जास्त मागणी असणाऱ्या मार्गिकांची थेट संपर्कव्यवस्था उपलब्ध होईल. यात बोटॅनिकल गार्डन स्थानकाजवळ निळा व मॅजेन्टा रेल्वेमार्ग बदलता येतील.
नॉयडामधील महत्त्वाची क्षेत्रे सुरळीतपणे एकमेकांशी जोडली जाणे हा प्रकल्पाच्या या टप्प्याचा उद्देश आहे. यात समाविष्ट असलेले महत्त्वाचे भाग पुढीलप्रमाणे आहेत
· सेक्टर 142 मधील एडव्हान्ट बिझनेस पार्कसारखे व्यापारी संकुल, सेक्टर 98 मधील स्कायमार्क वन मॉल, सेक्टर 93 मधील मॉल ऑफ नॉयडा
· सेक्टर 145 मधील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मायक्रोसॉफ्टसारख्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या, सेक्टर 157 मधील टीसीएस कंपनी, सेक्टर 126 मधील हॅवेल्स कंपनी, सेक्टर 132 मधील इन्फोसिस, सेक्टर 135 मधील कॉग्निझंट, सेक्टर 132 मधील ऍडोब, सेक्टर 127 मधील ओरॅकल
· सेक्टर 125 मधील ऍमिटी विद्यापीठ, सेक्टर 91 मधील पंचशील बलाक इंटर कॉलेज, सेक्टर 44 मधील महामाया बालिका इंटर कॉलेज यासारख्या शैक्षणिक संस्था
· सेक्टर 128 मधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या प्रमुख आरोग्य सुविधा
· सेक्टर 93 मधील बोटॅनिकल गार्डन सारखे पर्यटन स्थळ
हे महत्त्वाचे भाग मेट्रो सेवेशी जोडून नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) हा विस्तारित मार्ग संपर्कव्यवस्थेत सुधारणा घडवण्यासह आर्थिक घडामोडींना चालना देईल. स्थानिक नागरिक तसेच रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि सामान्य कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी शहरातून प्रवास करणे सोपे होईल.
· वाहतूक कोंडीत घट – मेट्रो रेल्वे हा रस्त्यावरील वाहतुकीचा कार्यक्षम पर्याय आहे आणि नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) या विस्तारित मेट्रो रेल्वे मार्गामुळे नॉयडा व ग्रेटर नॉयडा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, एकंदर रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होईल.
· पर्यावरणीय फायदे – नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पातील नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) या विस्तारित मार्गामुळे नॉयडा व ग्रेटर नॉयडा शहरातील एकंदर मेट्रो सेवेत वाढ होईल, परिणामी पारंपरिक जैव इंधनावर आधारित वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल
· आर्थिक विकास – वाहतुकीचा वेळ कमी झाल्यामुळे आणि शहराच्या विविध भागात पोहोचणे सोपे होईल. तसेच दिल्ली विमानतळ, दिल्ली रेल्वे स्थानक व विविध बस स्थानकांवर जाणे सुलभ होईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि अपेक्षित स्थळी वेळेत, कार्यक्षमपणे पोहोचता येईल. सुधारित वाहतूक व्यवस्थेमुळे स्थानिक व्यवसायांमध्ये वाढ होईल, विशेषतः मेट्रो स्थानकांजवळच्या भागात व्यवसायात वाढ होऊन गुंतवणूकही वाढेल. आधी दुर्लक्षित असलेल्या भागात विकास होईल.
· सामाजिक परिणाम - नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पातील नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) या विस्तारित मार्गामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध होईल. याचा फायदा विविध सामाजिक आर्थिक स्तरातील घटकांना होईल आणि वाहतूक असमानता कमी होईल. प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे आणि गरजेच्या सेवांपर्यंत पोहोचणे सुलभ झाल्यामुळे जीवनाचा दर्जा उंचावेल.
नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पातील नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) हा विस्तारित मार्ग शहराच्या विकासातील महत्त्वाचा बदल ठरणार आहे. सुधारित संपर्कव्यवस्था, वाहतूक कोंडीत घट, पर्यावरणीय लाभ, आर्थिक विकास आणि जीवनमानात सुधारणा यांची हमी या प्रकल्पामुळे मिळेल. शहरी भागाच्या प्रमुख समस्या सोडवून आणि भविष्यातील विस्तारासाठी मजबूत पाया रचून हा प्रकल्प शहराच्या विकासाची दिशा ठरविण्यात आणि शाश्वततेत महत्त्वाची भूमिका बजावेल.
***
शैलेश पाटील/ सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228173)
अभ्यागत कक्ष : 8