आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या युनानी संशोधन केंद्राचे उद्घाटन, मुंबईत आयोजित युनानी दिन 2026 सोहळ्याचे अध्यक्षपदही भूषवले
नवोन्मेष आणि पुरावे या दोन स्तंभांच्या आधारे युनानी औषधशास्त्राच्या भविष्यकालीन युगाला आकार मिळेल : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
सरकार सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंध आणि दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी युनानी औषधशास्त्राची एक बळकट परिसंस्था उभारत आहे : प्रतापराव जाधव
युनानी औषधशास्त्रामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरातली आणि परिणामकारक उपाचार सेवा सुविधा उपलब्ध होते, या व्यवस्थेच्या विस्ताराला महाराष्ट्र सातत्यपूर्ण पाठबळ देत राहील : महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
युनानी औषधशास्त्र हे आधुनिक, तथ्यांवर आधारित आणि जागतिक पातळीवर प्रमाणित आरोग्य सेवा म्हणून विकसित होत आहे : सचिव वैद्य राजेश कोटेचा
युनानी औषधशास्त्रातून आरोग्य सेवेमधील भारताची विविधतेतील एकता दिसून येते : भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष डॉ. मनीषा व्ही. कोठेकर
मुंबईतील प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सह उपचार केंद्रामुळे पुराव्यावर आधारित संशोधन आणि एकात्मिक आरोग्य सेवेला बळकटी मिळेल
Posted On:
14 FEB 2026 1:47PM by PIB Mumbai
केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या संकुलातील प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेंच्या (RRIUM) नूतनीकरण केलेल्या सह उपचार केंद्र अर्थात को लोकेशन सेंटरचं उद्घाटन झाले. मुंबईत आयोजित युनानी दिन 2026 सोहळा आणि इनोव्हेशन अँड एव्हिडन्स इन युनानी प्रॅक्टिस अर्थात युनानी औषधोपचारातील नवोन्मेष आणि सिद्धता या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते अध्यक्ष म्हणूनही सहभागी झाले. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील युनानी औषध संशोधन केंद्रीय परिषदेने (CCRUM) केले आहे.
प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेंच्या या नूतनीकृत सह उपचार केंद्राची स्थापना 1984 मध्ये झाली होती. सुमारे 3.84 कोटी रुपये खर्चून आता या केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. एकात्मिक वातावरणात वैद्यकीय सेवा, संशोधन सुविधा आणि रुग्ण सेवांचा विस्तार करणे हा यामागचा उद्देश आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेल्या जे.जे. रुग्णालय संकुलातील युनानी औषधोपचार सुविधेला बळकटी देणे आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थांच्या सहकार्याने तथ्याधारित संशोधनाला चालना देणे, हे या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट आहे.
यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला प्रतापराव जाधव यांनी संबोधित केले. जे.जे. रुग्णालयातील युनानी संशोधन केंद्राचे अद्ययावतीकरण म्हणजे, पारंपरिक औषधोपचार व्यवस्थांना आधुनिक, रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा आराखड्याचा एक अत्यावश्यक स्तंभ बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे असे ते म्हणाले. या नूतनीकरण केलेल्या सह-उपचार केंद्रामुळे युनानी आणि पारंपरिक औषधोपचार एकाच छताखाली आले आहेत. यातून रुग्णांना विज्ञानाधिष्ठीत संशोधन आणि तथ्यांचा आधार असलेल्या सुरक्षित, परिणामकारक आणि सर्वांगीण उपचार विषयक सुविधांचा सेवा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे आयुष व्यवस्थेला मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवांसोबत एकात्मिकरण घडवून आणण्याच्या तसेच, सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्यविषयक सेवा सुविधांना चालना देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाला अधिक बळकटी मिळेल असे ते म्हणाले.
आपल्या संबोधनातून प्रतापराव जाधव यांनी नवोन्मेष आणि संशोधनाचे महत्त्वही अधोरेखित केले. युनानी औषधशास्त्र ही समृद्ध वैद्यकीय अनुभवांतून रुजलेली आणि काळाच्या कसोटीवर उतरलेली व्यवस्था आहे. मात्र आपण जगासमोर किती प्रभावीपणे विज्ञाननिष्ठ पुरावे मांडतो, त्यावरच या व्यवस्थेचे भविष्य अवलंबून असल्याचे ते म्हणाले. आरोग्यविषयक समस्यांवर युनानी व्यवस्थेअंतर्गतच्या उपाययोजना आखता याव्यात यासाठी, युनानी औषध संशोधन केंद्रीय परिषद (CCRUM) आणि प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेसारख्या संस्थांनी उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय संशोधन, औषध प्रमाणीकरण आणि ते प्रत्यक्ष अमलात आणल्यासंबंधीच्या अभ्यासाचे काम हाती घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय परिषदेच्या संकल्पनेचा संदर्भ देताना, जाधव म्हणाले, " नवोन्मेष आणि पुरावे हे दोन आधारस्तंभ युनानी औषधांचे पुढील युग आकाराला आणेल. प्रत्येक युनानी औषधाचे सूत्र, प्रक्रिया आणि उपचार नियमावली सबळ डेटाद्वारे समर्थित केलेली असेल आणि गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या जागतिक मापदंडांशी सुसंगत असेल,असा आमचा प्रयत्न आहे. संशोधकांना युनानी संकल्पना आणि उपचारांची वैज्ञानिक समज वाढवण्यासाठी जीनोमिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत निदान यासारख्या आधुनिक सुविधांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एकात्मिक आरोग्यसेवेचे यशस्वी प्रारुप यशस्वीपणे सिद्ध करण्यात महाराष्ट्र, मुंबईतील प्रमुख वैद्यकीय संस्था आणि युनानी सुविधांची भूमिका आहे,असे मंत्रिमहोदयांनी अधोरेखित केले. "आरआरआययूएम मुंबई सारख्या केंद्रांना बळकटी देऊन तसेच आघाडीची रुग्णालये आणि विद्यापीठांशी सहयोग करून, आम्ही एक उत्तम परिसंस्था तयार करत आहोत जिथे, सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंधात्मक काळजी आणि दीर्घकालीन आजार व्यवस्थापन यात युनानी औषधे त्यांची पूर्ण क्षमता प्रदर्शित करू शकतील," अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे युनानी दिनाचे केलेले आयोजन आणि जे.जे. रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या सह-युनानी विभाग सुविधेच्या उद्घाटन याची प्रशंसा केली. हे परवडणाऱ्या, जनकेंद्रित रुग्णसेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. युनानी औषधोपचारांद्वारे केलेल्या उपचारांच्या त्यांच्या स्वतःच्या सकारात्मक अनुभवाचे स्मरण त्यांनी केले आणि पारंपरिक पद्धतींचे उपचार, जेव्हा शिस्त आणि रुग्णांच्या अनुपालनाने पाळले जातात, तेव्हा दीर्घकालीन आणि उपचार कठीण होऊन उद्भवणाऱ्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण परिणाम देऊ शकतात असे अधोरेखित केले. विशेषतः गरीब आणि वंचित समुदायांसाठी याचा अधिक योग्य उपयोग होतो.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, महाविद्यालये आणि रुग्णालये मजबूत करून आणि शहरी तसेच ग्रामीण भागात व्यापक प्रवेश प्रदान करून युनानीसह भारतीय औषध प्रणालींच्या वाढीस पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे यावर त्यांनी भर दिला. "आरोग्य ही खरी संपत्ती आहे" असे सांगत,त्यांनी नागरिकांना आयुष प्रणालींद्वारे केले जाणारे प्रतिबंधात्मक आणि समग्र दृष्टिकोन असलेले उपचार स्वीकारण्याचे आवाहन केले; जेणेकरून रुग्णालयांवरील भार कमी होईल आणि लोक निरोगी, अधिक उत्पादक जीवन जगू शकतील. "विशेषतः युनानी औषधे सामान्य लोकांसाठी परवडणारी आहेत आणि प्रभावी उपचार देते आणि महाराष्ट्र चांगल्या सुविधा आणि व्यापक प्रवेशाद्वारे त्याच्या विस्ताराला पाठिंबा देत राहील," असे पाटील यांनी सांगितले
दहावा युनानी दिन समारंभ आणि "युनानी पद्धतीतील नवोन्मेष आणि पुरावा" या विषयावरील राष्ट्रीय परिषद गेल्या दशकात संशोधन उत्पादन, रुग्णसेवा आणि संस्थात्मक विकासाच्या बाबतीत विशेष करून युनानी औषधांच्या वापरात झालेल्या असाधारण वाढीचे प्रतिबिंबि दर्शवते, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी अधोरेखित केले. विषयकेंद्रित धोरणात्मक समर्थन, वाढीव अर्थसंकल्पीय निधी आणि मंत्रालय स्तरावरील शाश्वत नेतृत्वाद्वारे, CCRUM आणि राष्ट्रीय संस्थांअंतर्गत युनानी संस्थांनी त्यांच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, अलिकडच्या वर्षांत रुग्णांची संख्या,माहिती पत्रके आणि मान्यताप्राप्त सुविधांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे अधोरेखित केले की आयुष मंत्रालय हे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) तसेच इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत युनानी शिक्षण, संशोधन, नैदानिक प्रशिक्षण आणि उपचार पद्धतींसाठी आंतरराष्ट्रीय निकष निश्चित करण्यासाठी निकट सहकार्याने कार्य करत आहे.
युनानी औषधोपचारांमध्ये प्रशिक्षण व व्यवहारासाठी डब्ल्यूएचओ मानदंड दस्तऐवजांचे प्रकाशन, आयसीडी-11 च्या पारंपरिक औषध विभागात युनानी आजार वर्गीकरण कोड्सचा समावेश, तसेच आरोग्य हस्तक्षेपांचे वर्गीकरण करण्याचे सुरू असलेले कार्य या महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की या घडामोडींमुळे केवळ आयुष प्रणालींमधील समन्वय सुलभ होणार नाही, तर जगभरातील देशांना अधिक विश्वासार्ह व प्रमाणित स्वरूपात युनानी पद्धती स्वीकारण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय भारतीय चिकित्सा प्रणाली आयोग (एनएसआयएसएम) च्या अध्यक्षा मनीषा व्ही. कोठेकर यांनी अधोरेखित केले की युनानी, आयुर्वेद, सिद्धा आणि सोवा-रिग्पा या सर्व भारतीय चिकित्सा प्रणालींमधील “विविधतेत एकता” या तत्त्वाचे प्रतीक आहेत. वेगवेगळ्या वैद्यकीय परंपरा आरोग्य व मानवी शरीराकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहतात, मात्र समाजाच्या कल्याणासाठी सर्वांचा अंतिम उद्देश समान आहे. त्यांनी जे. जे. रुग्णालयातील युनानी सह-स्थापन केंद्राच्या नूतनीकरण व उद्घाटनाचे कौतुक केले तसेच सीसीआरयूएम, आरआरआययूएम आणि आयोजकांचे अभिनंदन करत युनानी पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि संशोधन बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
उद्घाटन कार्यक्रमात विविध संस्थात्मक उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. त्यामध्ये युनानी औषधोपचारांवरील व्हिडीओ टीझर, सीसीआरयूएम प्रकाशनांचे व परिषद स्मरणिकेचे प्रकाशन, सीसीआरयूएमच्या सहकार्यात्मक वेब पोर्टल व मोबाइल अॅप्लिकेशन्सचे उद्घाटन, एक आंतरराष्ट्रीय आणि आठ राष्ट्रीय सामंजस्य करारांचे आदान-प्रदान, तसेच मिजाज-ए-इन्सान (मानवी प्रकृती) मूल्यमापनासाठी प्रश्नावलीचे सादरीकरण यांचा समावेश होता. याशिवाय आरआरआययूएम, मुंबई येथील जैवरसायनशास्त्र व पॅथॉलॉजी प्रयोगशाळेला एनएबीएल प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, त्यामुळे युनानी संशोधनातील गुणवत्ता हमी अधिक मजबूत झाली आहे.
राष्ट्रीय युनानी दिनाच्या उद्घाटन सत्राला मोनालिसा दास (संयुक्त सचिव, आयुष मंत्रालय), एम. ए. कासमी (सल्लागार -युनानी, आयुष मंत्रालय), सैयद शाह आलम (संचालक, राष्ट्रीय युनानी वैद्यक संस्था) आणि एन. झहीर अहमद (महासंचालक, सीसीआरयूएम) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या संदर्भातील कर्टन-रेझर प्रसिद्धीपत्रक पुढील लिंकवर उपलब्ध आहे: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2227528®=3&lang=1.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/संपदा पाटगावकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228122)
अभ्यागत कक्ष : 31