नागरी उड्डाण मंत्रालय
विमान अपघात तपास संस्थेचे स्पष्टीकरण : एआय-171 अपघात प्रकरणाचा तपास अद्याप सुरू; प्रसारमाध्यमांमधील वृत्ते काल्पनिक
Posted On:
12 FEB 2026 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2026
एअर इंडियाच्या एआय-171 (AI-171) या विमान अपघाताचा तपास पूर्ण झाल्याचा दावा करणारी वृत्ते चुकीची आणि काल्पनिक असल्याचे विमान अपघात तपास संस्थेने ( एएआयबी) स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
विमान अपघात तपास संस्थेच्या वतीने विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2025 आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) परिशिष्ट 13 अंतर्गतच्या भारताच्या वचनबद्धतेनुसार अत्यंत काटेकोरपणे तपास केला जातो. विमान अपघाताचा तपास ही एक तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित प्रक्रिया आहे. अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि भविष्यात सुरक्षा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात केवळ त्या टप्प्यापर्यंत उपलब्ध असलेली वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. तपासाचे निष्कर्ष आणि सुरक्षिततेशी संबंधित शिफारसी असलेला अंतिम तपास अहवाल दिला जाईल. प्रस्थापित आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपास पूर्ण झाल्यानंतरच असा अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
प्रसारमाध्यमांनी संयम राखावा तसेच, अपरिपक्वतेने कोणतेही तर्कवितर्क मांडणे टाळावे, असे आवाहनही विमान अपघात तपास संस्थेने केले आहे. कोणत्याही असत्यापित वृत्तांकनामुळे जनतेमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होते आणि व्यावसायिक निष्ठेने सुरू असलेल्या तपासाच्या विश्वासार्हतेवरही त्याचा विपरित परिणाम होतो, असे संस्थेने म्हटले आहे. विमान अपघात तपास संस्था पारदर्शकता, प्रक्रियेची वस्तुनिष्ठता आणि तपासाच्याबाबतीत विमान सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांविषयी पूर्णतः वचनबद्ध आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2227310)
अभ्यागत कक्ष : 11