संरक्षण मंत्रालय
सौदी अरेबियातील रियाध इथे आयोजित जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026 मध्ये भारताने घडवले स्वदेशी संरक्षण क्षमतेचे दर्शन
Posted On:
10 FEB 2026 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026
8-9 फेब्रुवारी 2026 दरम्यान सौदी अरेबियातील रियाध इथे आयोजित जागतिक संरक्षण प्रदर्शनात (World Defence Show - WDS) संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वात भारताचे उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ सहभागी झाले. राज्यमंत्री संजय सेठ जागतिक स्तरावरील मान्यवरांसह या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी या आयोजनातील भारताच्या पहिल्या-वहिल्या दालनाचे उद्घाटनही केले. या दालनाअंतर्गत संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून भारताच्या उत्पादन क्षमतेचे दर्शन घडवण्यात आले. संरक्षण राज्यमंत्र्यांनी सौदी अरेबिया मिलिटरी इंडस्ट्रीज आणि सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनांनाही भेट दिली आणि त्यांच्या अलिकडच्या स्वदेशी तांत्रिक घडामोडींचा आढावा घेतला.
यानिमित्ताने संजय सेठ यांनी सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी व्यवहार विषयक सहाय्यक मंत्री डॉ. खालिद बिन हुसेन अल-बियारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील सहकार्य आणि परस्पर सहभाग वाढवण्यावर भर दिला गेला. संजय सेठ यांनी सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर डिफेन्स डेव्हलपमेंटचे (GADD) गव्हर्नर डॉ. फालेह बिन अब्दुल्ला अल-सुलैमान यांचीही भेट घेतली. भारत कशारितीने जागतिक निर्यात केंद्र म्हणून उदयाला येऊ लागला आहे याबद्दलची माहिती त्यांनी दिली. संयुक्तपणे संरक्षण विषयक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संधी चाचपडून पाहता याव्यात यासाठी जनरल अथॉरिटी फॉर डिफेन्स डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या संशोधन आणि विकास विषयक केंद्रांना भेट द्यावी असे निमंत्रणही संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिले.
संजय सेठ यांनी सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीजचे (GAMI) गव्हर्नर अहमद बिन अब्दुलअजीज अल-ओहाली यांचीही भेट घेतली. यावेळी धोरणात्मक सहकार्यासंबंधीची परस्पर समान क्षेत्रे आणि दोन्ही देशांच्या पुरवठा साखळी परिसंस्थेला बळकटी देण्याच्या मुद्यांवर चर्चा झाली. भारताच्या संरक्षण क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखालील एका संयुक्त शिष्टमंडळाने भारताला भेट द्यावी असा प्रस्तावही संरक्षण राज्यमंत्र्यांनी मांडला.
भारतीय दूतावासात आयोजित भारतीय आणि सौदी संरक्षण कंपन्यांच्या प्रमुखांच्या बैठकीलाही संजय सेठ यांनी संबोधित केले. संरक्षण विषयक गरजांच्या बाबतीत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातले संयुक्त सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनेअंतर्गत जागतिक स्तरावर सहकार्य करण्याची भारताची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2225825)
अभ्यागत कक्ष : 15