संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकायन 26 मोहिमेअंतर्गत भारत आणि ओमान सागरी संबंधांना बळकटी देत आयएनएस सुदर्शिनीच्या पहिल्या बंदर भेट यात्रेची सांगता

Posted On: 08 FEB 2026 11:30AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली: 08 फेब्रुवारी 2026

भारतीय नौदलाची नौकानयन प्रशिक्षण नौका ‘आयएनएस सुदर्शिनी’ने 05 फेब्रुवारी 2026 रोजी ओमानमधील सलालाह येथे आपला पहिला बंदर भेटीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. ही भेट ‘लोकायन 26’ या नौकेच्या, वेगवेगळे महासागर पार करण्याच्या, दहा महिन्यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या समृद्ध सागरी वारश्याचे आणि “वसुधैव कुटुंबकम” या परंपरेचे जगाला दर्शन घडविणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

या भेटीत, आयएनएस सुदर्शिनीच्या कमांडिंग ऑफिसरनी ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ (आरएनओ) च्या सदर्न नेव्हल एरियाचे कमांडर कॅप्टन मोहम्मद अल घैलानी आणि रॉयल नेव्ही ऑफ ओमानच्या ‘अल मोअझर’ या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन मोहम्मद अल महारी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेच्या माध्यमातून भारत आणि ओमान यांच्यातील ऐतिहासिक काळापासून सागरी संबंध अधोरेखित होण्यासोबतच उभय देशांच्या नौदलांदरम्यानचे मैत्रीचे पूल मजबूत झाले. व्यावसायिक भेटीगाठींचाच एक भाग म्हणून रॉयल नेव्ही ऑफ ओमानच्या अधिकाऱ्यांना नौकेची सहल घडविण्यात आली.

नौकानयन प्रशिक्षण जहाज पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले असता दोन्ही देशांमधील लोकांदरम्यानच्या उत्कृष्ट संबंधाचे दर्शन घडले. शाळकरी मुलांसह 600 हून अधिक अभ्यागतांना तीन डोलकाठ्या असलेल्या जहाजाचे दर्शन घडविण्यात आले तसेच, त्यांना सागरी नौकानयनाची तपशीलवार माहिती देण्यात आली.

भारताच्या कालातीत सागरी प्रवासाचा वारसा महासागरांमधून घेऊन जाणारी आयएनएस सुदर्शिनी लोकायन 26 च्या पुढच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाली आहे. सागरी सफरीच्या जय्यत तयारीसह अत्यंत उत्साहाच्या भावनेने निघालेली ही नौका सागरी उत्कृष्टता, मैत्री आणि सद्भावना यांचे यापुढेही प्रतीक म्हणून काम करत राहील.

***

शिल्पा पोफळे/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2225100) अभ्यागत कक्ष : 12