आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कॅसानूर फॉरेस्ट डिसीजवरील सुधारित लस विकसित करण्याच्या दिशेने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने साधली प्रगती
Posted On:
07 FEB 2026 7:00PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाच्या अखत्यारीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR), कॅसानूर फॉरेस्ट डिसीज (KFD) या आजाराविरोधात सुधारित लस विकसित करण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे. कॅसानूर फॉरेस्ट डिसीज हा महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोवा यांसारख्या राज्यांमधील पश्चिम घाट क्षेत्रात स्थानिक पातळीवर आढळणारा एक महत्त्वाचा संसर्गजन्य रोग आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या विनंतीवरून भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने ही लस विकसित करण्याचे काम हाती घेतले. भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था (NIV) आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), ही पूर्णतः स्वदेशी बनावटीची, दोन मात्रा असलेली पूरक घटकयुक्त निष्क्रिय लस (adjuvanted inactivated vaccine) विकसित करण्यासाठी परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत काम करत आहेत. या लसीच्या दोन मात्रा 28 दिवसांच्या अंतराने दिल्या जाणार आहेत.
ही लस यशस्वीरित्या विकसित करण्यात आली असून, लसीची प्राण्यांवरील चाचणी आणि लसीच्या घातकपणासंबंधीचा अभ्यासही पूर्ण झाला आहे. याअंतर्गत प्रमाणित प्रयोगशाळा कार्यपद्धतीच्या दर्जाच्या (GLP-grade) लस साहित्याची निर्मिती करण्यात आली असून, केंद्रीय औषध मानके नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) मंजुरीनंतर मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिला टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे.
वैद्यकीय चाचणीचा हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर, पुढच्या चाचण्या सुरू केल्या जातील. त्यानंतर ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास सक्षम असल्याचे आढळून आल्यावर, केंद्रीय औषध मानके नियंत्रण संस्थेची अधिकृत मंजुरी घेतली जाईल.
आरोग्यविषयक आव्हानात्मक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारांना सातत्याने पाठबळ देण्यास केंद्र सरकार सदैव वचनबद्ध आहे.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2225026)
अभ्यागत कक्ष : 9