संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तरकाशी इथले नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, आणि पहलगाम इथल्या ‘जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स’ च्या अर्जेंटिनातील माऊंट अकोनकागुआ संयुक्त मोहीमेला दाखवला हिरवा झेंडा


शारीरिक सहनशिलता, नेतृत्व, सांघिक कार्य आणि मानसिक लवचिकता हे भारताच्या उत्कृष्ट गिर्यारोहकांचे वैशिष्ट्य : राजनाथ सिंह

Posted On: 05 FEB 2026 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 05 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथून, अर्जेंटिनातील माऊंट अकोनकागुआ इथे जाणाऱ्या संयुक्त गिर्यारोहण मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. हा पर्वत 6,961 मीटर उंचीचा असून ते, दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर आणि आशिया खंडाबाहेरील जगातील सर्वात उंच पर्वत आहे. उत्तरकाशी इथले नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, आणि पहलगाम इथल्या जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स (JIM&WS)  यांच्या वतीने  ही संयुक्त मोहीम राबवली जात आहे.

कोणत्याही आव्हानाला धैर्याने आणि निर्धाराने सामोरे जाण्यासाठी जवानांना तयार केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले. या कठीण शिखरावर चढाई करणे ही केवळ शारीरिक क्षमतेचीच नाही तर नेतृत्व, सांघिक कार्य आणि मानसिक लवचिकतेचीही ही खरी परीक्षा आहे, हीच भारताच्या उत्कृष्ट गिर्यारोहकांची ओळख आहे असे ते म्हणाले. या मोहीमेसाठी त्यांनी पथकाला शुभेच्छाही दिल्या. दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च आणि आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर चढाईची ही मोहीम हे सदस्य यशस्वीपणे पूर्ण करतील आणि राष्ट्राची मान उंचावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सहा सदस्यीय पथकामध्ये कर्नल हेमचंद्र सिंह, कॅप्टन जी. संतोष कुमार, दीप बहादूर साही, विनोद गुसैन, नायब सुभेदार भूपिंदर सिंह आणि हवालदार रमेश कुमार यांसारख्या उच्च प्रशिक्षित प्रशिक्षकांचा समावेश आहे. हा प्रवास 06 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल, आणि  या महिन्याच्या अखेरीला मोहीमेचा समारोप होईल,  अशी अपेक्षा आहे.

माऊंट अकोनकागुआ या मोहिमेतून मिळालेले ज्ञान, अनुभव आणि आत्मविश्वासामुळे देशभरातील तरुण, सशस्त्र दलाचे जवान आणि साहसी क्रीडा प्रेमींना अधिक सुरक्षित आणि प्रभावी प्रशिक्षण मिळण्यास थेट मदत होणार आहे. या मोहीमेतून जागतिक साहसी खेळांच्या क्षेत्रात आणि गिर्यारोहणातील भारताचे वाढते अस्तित्व अधोरेखित होणार आहे.

सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2223880) अभ्यागत कक्ष : 7